वृत्तसंस्था - सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी अशा आरोग्यविषयक तक्रारी नियमितपणे जाणवत असतात. त्यावर सुरुवातीला घरगुती उपचार केले जातात. पण स्थती अधिक बिघडल्यावर डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. पण आता अशा नियमित तक्रारींवर हमखास घेतल्या जाणाऱ्या किंवा डॉक्टरांकडून लिहून दिल्या जाणाऱ्या एका औषधावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. या औषधाचं १०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त सेवन आरोग्यासाठी हानीकारक असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे या मयदितच या औषधाचं सेवन करता येईल, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार निमेस्युलाईड (Nimesulide) या घटकाची १०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त मात्रा असणाऱ्या सर्व औषधांवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. "निमेस्युलाईडचं प्रमाण १०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त असणाऱ्या औषधांचं सेवन केल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो याबाबत केंद्र सरकारची खात्री पटली आहे. या औषधांना पर्यायी औषधं उपलब्ध आहेत. त्यामुळे जनहितार्थ निमेस्युलाईडचं १०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त प्रमाण असणारी औषधं निर्माण करणं, विक्री करणं किंवा वितरित करणं यावर बंदी घालण्यात येत आहे", असं आरोग्य मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. Nimesulide वर बंदी घालण्याची शिफारस इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्च अर्थात ICMR नं केंद्र सरकारला केली होती. या औषधामुळे यकृतामध्ये इन्फेक्शन होत असल्याची काही प्रकरणं समोर आली होती. यासंदर्भात आयसीएमआरनं केलेल्या शिफारशी केंद्रीय औषध नियंत्रक संस्थेकडून मान्य करण्यात आल्यानंतर ही बंदी घालण्यात आली आहे.
याशिवाय, आयसीएमआरनं निमेस्युलाईडचा वापर कोणत्या परिस्थितींमध्ये करण्यास परवानगी असेल, याबाबतही नियमावली दिली आहे. जेव्हा इतर सर्व प्रकारची औषधं निष्प्रभ ठरली असतील, तेव्हाच शेवटचा पर्याय म्हणून निमेस्युलाईडचा वापर केला जावा असं आयसीएमआरनं म्हटलं आहे. शिवाय, अशा प्रकरणात गर्भवती, बाळंतीण माता किंवा गर्भधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या मातांना हे औषध दिलं जाऊ नये, असंही आयसीएमआरनं स्पष्ट केलं आहे. शिवाय, यकृताचा आजार असणाऱ्या रुग्णांना हे औषध दिलं जाऊ नये. तसेच, पर्याय नसताना हे औषध देण्याची वेळ आली तरी १२ वर्षांखालील मुलांना हे औषध दिलं जाऊ नये, असंही आयसीएमआरनं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने निमेस्युलाईडवर बंदी घालण्याबरोबरच डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मेडिकलमधून थेट कफ सिरपच्या विक्रीवरदेखील बंदी घातली आहे. जी औषधं अशा प्रकारे मेडिकलमधून थेट विकली जाऊ शकतात, अशा औषधांच्या 'परिशिष्ट क'मधून कफ सिरपना वगळण्यात आलं आहे. त्यामुळे वास्तवात ही औषधं आता थेट मेडिकलमधून मिळणं किंवा त्यांची मागणी करणं बेकायदेशीर ठरवण्यात आलं आहे. ही औषधं डॉक्टरांच्या प्रस्क्रिप्शननेच घेता येतील. मात्र, यासाठीच्या गोळ्या किंवा टॅबलेट्स अद्याप या परिशिष्ट यादीतच असल्यामुळे त्यांच्याबाबतच्या नियमांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मध्य प्रदेशमध्ये नुकतीच हानीकारक घटकांचा समावेश असलेल्या कफ सिरपचं सेवन केल्यामुळे २२ मुले दगावल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. याशिवाय राजस्थानमध्ये मुलांसाठी नसलेलं कफ सिरप मुलांना दिल्यामुळे लहान मुले दगावल्याच्याही काही घटना समोर आल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारने कफ सिरपसंदर्भातील नियम अधिक कठोरपणे राबवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.