युवराज खराडे (कोल्हापूर) - सध्या वाहन चालकाविरुद्ध मोटर वाहन कायद्यानुसार कारवाईला कोल्हापुरात चांगलीच सुरूवात झाली आहे. वाहतूक पोलिसांच्या या कारवाईबद्दल नागरिकांसह वाहन चालकांतून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. त्याला कारण हि तसेच आहे शहरात इतर ठिकाणी फुटपाथवर सामान्य नागरिकांची वाहने लागल्यास तत्काळ शहर वाहतूक विभागाकडून कारवाई केली जाते परंतु व्हीनस कॉर्नर चौकात सराफी मॉल धारकांकडून फुटपाथचा पार्किंगसाठी गैरवापर केला जातो आणि फुटपाथवर अलिशान गाड्या अवैद्य पार्क केल्या जातात त्यामुळे पादचाऱ्यांना व्हीनस कॉर्नर चौकात जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालावे लागते त्या ठिकाणी आतापर्यंत किती वाहनांवर शहर वाहतूक शाखेकडून कारवाई झाली ? हा संशोधनाचा विषय ठरू शकतो आणि कारवाईचा सुद्धा. त्यामुळे सामान्य नागरिक विरुद्ध मोठी धेंडे हा न्याय कुठला ? अशा कारणांमुळे सामान्य नागरिकांच्या मनात वाहतूक शाखेविषयी संतापाची लाट उसळत आहे.
कोल्हापूर शहरात सध्या नियमानुसार कारवाई वाहतूक पोलिस करीत आहेत. वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी त्यांचा हा खटाटोप आहे. मात्र, शिस्तीच्या नावाखाली करण्यात येणारी दंडात्मक कारवाई ही रझाकारी जुलुमांचा आठवण करून देणारी अशी आहे. नियमांची अंमलबजावणी करताना वाहन चालकांच्या सोयीच्या गोष्टीचेही पालन होणे गरजेचे आहे. बाजारपेठेत किंवा भरवस्तीत रहदारीच्या ठिकाणी दुचाकी किंवा चार चाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था करणे गरजेचे आहे. जागोजागी नो पार्किंग फलक लावणे आवश्यक आहे. सिग्नल व्यवस्था नियमित व सुरळीत चालू ठेवणे अपेक्षित आहे. मात्र, या सर्व सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष करून केवळ नियमाचा धाक दाखवून अवाच्या सव्वा दंड आकारायचा आणि बड्या व्यक्तीचा कॉल आल्यावर सोयीस्कर सोडायचे आणि सामान्य नागरिकांवर दंडाची सक्ती करायची असे दृश्य सध्या कोल्हापुरात पहावयास मिळत आहे.
वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहतुक पोलिसांकडून सुरू असलेले प्रयत्न जनहिताच्या दृष्टीने उपयुक्त असले तरी त्याची अंमलबजावणी करताना करण्यात येणारी दंडात्मक कारवाई, या वेळी त्यांची अरेरावीची भाषा, वाहनचालकांना मिळणारी अपमानास्पद वागणूक या सर्व बाबी जनतेचा रोष ओढावून घेण्यास कारणीभूत ठरत आहेत. प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा व वडाप जीप्समधून होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीकडे मात्र शहर वाहतूक विभाग सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात.
सिंगल जंम्पींग, झेबरा, हेल्मेट न वापरणे, नो एंट्री, परवानाशिवाय वाहन चालविणे, कागदपत्र सोबत न ठेवणे, गतिसंदर्भातील नियमांचा भंग करणे, नो पार्किंगमध्ये वाहन लावणे, फुटपाथवर वाहन उभारणे अशा नियमाचे भंग केल्यास मोटारवाहन कायद्यानुसार दंड आकारण्याचे प्रस्तूत आहे. मात्र, करवसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोल्हापुरात वाहतुक पोलिस सध्या यापैकी एकाही नियमाचा भंग केल्यास त्यास विविध कलमे दर्शवित आणि दंड वसूल करीत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना एक न्याय आणि बड्या धेंडांना व्हीआयपी वागणूक अशी परिस्थिती झाल्याने याकडे गांभीर्याने दखल घेण्याची गरज असून वाहतूक पोलिसांच्या या मनमानी कारभाराची गृह विभाग मुंबई आणि जिल्हा पोलिस अधिक्षकांनी दखल घ्यावी, अशी मागणी लवकरच राष्ट्रीय समाज पक्षाचे कोल्हापूर जिल्हा व कोकण विभाग प्रसिद्धी प्रमुख सुशांत पोवार यांनी निवेदनाद्वारे करणार असल्याचे सांगितले आहे.