सुशांत पोवार - कोल्हापूर शहरातील वृक्षांच्या विविध प्रश्नांबाबत स्वरा फौंडेशनने वेळोवेळी सनदशीर मार्गाने निवेदने देऊन वृक्षतोडीबाबत तक्रारी कोल्हापूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागास दिले आहे तसेच आयुक्त तथा प्रशासक यांच्याशी पाठपुरावा केला आहे. कोल्हापुरातील वनस्पती तज्ञांनी - अभ्यासकांनी वनस्पती संपदेबाबत विविध प्रश्न आणि मागण्या लिखित स्वरुपात तसेच ईमेलद्वारे उपस्थित केल्या होत्या तरी प्रशासनाने या प्रश्नी कोणतीही भूमिका आजतागायत घेतली नाही किंवा त्याचे उत्तरही दिले नाही. विविध वृक्षतोडीबाबत गुन्हा नोंद करण्यासही विलंब लावला आहे आणि काही तक्रारींवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही उद्यान विभाग व आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडून झालेली नाही त्यामुळे सदर प्रश्नी स्वरा फौंडेशनने सनदशीर पद्धतीने लेखी अर्ज करून कोल्हापूर महानगरपलिका प्रशासनास विचारणा केली होती परंतु कोणतेही समाधानकारक उत्तर न आल्याने आज दिनांक २६ रोजी कोल्हापूर महानगरपलिकासमोर आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता पण मनपा प्रशासनाकडून वृक्षांच्या विविध प्रश्नावर समाधानकारक व योग्य कारवाईच्या लेखी आश्वासनानंतर स्वरा फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगावकर यांनी तूर्तास आजचे उपोषण स्थगित करत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले.
साईक्स एक्सटेशन येथील प्रकरणाबाबत बोलताना स्वरा फौंडेशनचे अध्यक्ष यांनी त्या ठिकाणी वृक्षांच्या फांद्या कोणतीही परवानगी न घेता तोडणे सुरु होते त्याची लेखी माहिती व तक्रार कोल्हापूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागात करण्यात आली होती पण त्यावर वेळेत कोणतीही कारवाई न झाल्याने फांद्या तोडणारेनी कारवाई होत नसल्याचे पाहून सदरचा वृक्षच तोडून टाकला त्यामुळे सदरचा वृक्ष वेळेत मनपाने कारवाई केली असती तर त्याला जीवनदान देता आले असते पण मनपाच्या भोंगळ कारभाराचा बळी गेला त्यामुळे मनपाच्या कारवाईच्या आश्वासनानंतर आजचे उपोषण जरी तूर्तास स्थगित करण्यात आले असले तरी वेळेत योग्य कारवाई न केल्यास उच्च न्यायालयात कोल्हापूर महानगरपलिकेच्या विरोधात लढा उभा करण्याचा इशारा हि प्रमोद माजगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.