सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत मनाई आदेश जारी
schedule18 Nov 24
person by
visibility 122
categoryसांगली
संजय तोडकर (सांगली) - भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी दि. 15 ऑक्टोबर 2024 पासून आचारसंहिता लागू केलेली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार सांगली जिल्ह्यातील 281-मिरज, 282-सांगली, 283-इस्लामपूर, 284- शिराळा, 285-पलूस कडेगाव, 286-खानापूर-आटपाडी, 287-तासगांव-कवठेमहांकाळ, 288-जत या 8 विधानसभा मतदारसंघांमध्ये दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होत आहे. जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ही विनाअडथळा व भयमुक्त वातावरणात आणि निःपक्षपातीपणे पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हा दंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत दि. 18 नोव्हेंबर 2024 रोजीचे 18:00 वाजल्यापासून ते दि. 21 नोव्हेंबर 2024 रोजीचे 18:00 वाजेपर्यंत पुढील कृत्ये करण्यास मनाई केली आहे.
आदेशात म्हटले आहे, मनाई केलेल्या कालावधीत बेकायदेशीर सभा आणि सार्वजनिक बैठक आयोजित करण्यास मनाई करण्यात आली आहे. पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास / गटागटाने फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.
हा आदेश निवडणूक कर्तव्य बजावित असणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच, धार्मिक विधी, अंत्यविधी व लग्नविधी यांना लागू असणार नाही. तसेच दारोदारी प्रचार करण्याच्या अनुषंगाने घरोघरी भेट देण्यास प्रतिबंध असणार नाही.