सचिन तळेकर (लातूर) - ग्रंथासारखा दुसरा मित्र नाही. या जगात ज्याला कोणी नाही, त्याच्या पाठीशी ग्रंथ उभे राहतात. ग्रंथामध्ये ज्ञानाचे झरे असतात, ज्यांना ज्ञान मिळवायचे आहे, त्यांनी ग्रंथालयात जायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत तथा माजी कुलगुरू डॉ. जनार्धन वाघमारे यांनी केले. तसेच ग्रंथ हे जीवनात यशस्वी होण्याची प्रेरणा देतात, ग्रंथाचे मानवी आयुष्यातील मोल मोठे आहे. त्यामुळे प्रत्येकाने पुढील पिढीपर्यंत वाचन संस्कृतीचा ठेवा पोहचविला पाहिजे. यासाठी मुलांना ग्रंथाशी मैत्री करायला शिकविण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे म्हणाल्या.
‘लातूर ग्रंथोत्सव २०२४’चे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. वाघमारे हे होते. छत्रपती संभाजीनगर विभाग ग्रंथालय संघाचे कार्यवाह राम मेकले, लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रभाकर कापसे, साने गुरुजी शिक्षण संकुलचे अध्यक्ष कालिदास माने, साहित्यिक डॉ. जयद्रथ जाधव, आत्माराम कांबळे, माधव बावगे, हावगीराव बेरकिळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी वंदना काटकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
ग्रंथांचे मोल पैसा, संपत्तीमध्ये होवू शकत नाही. ग्रंथांमुळे आपला इतिहास समजला. आपल्या संस्कृतीचा ठेवा ग्रंथामध्ये सापडतो. संस्कृतीचे उज्ज्वल भवितव्य भाषेवर आणि ग्रंथावर अवलंबून असते. शिक्षणाचा प्रसार झाल्यानंतर वाचन संस्कृतीचा विकास होतो. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी चांगले ग्रंथ निर्माण झाले पाहिजेत. तसेच गाव तिथे ग्रंथालय ही चळवळ रुजविली गेली पाहिजे. ‘ग्रंथ तिथे सौख्य’ असे एका कवीने म्हटले आहे, त्यानुसार ज्या घरात ग्रंथ असतात, वाचन संस्कृती रुजलेली असते, तिथे शांतता आणि समृद्धी येते, असे डॉ. वाघमारे यावेळी म्हणाले.
ग्रंथ हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. ग्रंथांमुळे मला आयुष्यात यशस्वी होण्याची प्रेरणा मिळाली. मराठी ही आपली माय माऊली असून आपल्या मराठीला केंद्र शासनाने नुकताच अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, ही प्रत्येक मराठी भाषिकासाठी अभिमानाची बाब आहे. डिजिटल युगात वाचन संस्कृती टिकविण्याचे आव्हान असले तरी प्रत्येकाने यासाठी पुढाकार घेवून आपल्या मुलांना वाचनाची आवड लावणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या.
लातूर ग्रंथोत्सवनिमित्त उभारण्यात आलेल्या ग्रंथ दालनाचे यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीमती काटकर यांनी केले. सूत्रसंचालन सी. पी. पाटील यांनी केले, राम मोतीपवळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
बुके ऐवजी बुक भेट द्यावे, या आवाहनाला प्रतिसाद देत लातूर जिल्हा ग्रंथालय संघामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला ५०० ग्रंथ भेट दिले जाणार असून यापैकी प्रातिनिधिक स्वरुपात ५ ग्रंथ ग्रंथालय संघामार्फत जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांना सुपूर्द करण्यात आले.
ग्रंथदिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद
राज्य शासनाचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय व लातूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्यावतीने लातूर येथील कम्युनिटी हॉल येथे आयोजित दोन दिवसीय 'लातूर ग्रंथोत्सव'निमित्त लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथून ग्रंथदिंडी काढण्यात आली. मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाचे सदस्य नरसिंग कदम, साने गुरुजी शिक्षण संकुलचे अध्यक्ष कालिदास माने, ज्ञानदान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव दिलीप गुंजरगे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी वंदना काटकर, साहित्यिक जयद्रथ जाधव, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे एच. बी. पाटील यावेळी उपस्थित होते.
ग्रंथदिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी पारंपरिक वेशभूषा केलेले विद्यार्थी, झांज पथक, लेझीम पथक यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. ढोल ताशे, टाळ मृदुंगाच्या गजरात ग्रंथ पालखी घेवून कम्युनिटी हॉल येथे आल्यानंतर या दिंडीचा समारोप करण्यात आला.