सुशांत पोवार (कोल्हापूर विशेष वृत्त) - सर्वांनी मिळून पीएम मोदी यांचा पराभव करूया, नाही तर देशामध्ये हुकूमशाही येईल, असे प्रतिपादन शरद पवार यांच्या बहिण सरोज पाटील यांनी कोल्हापुरातील निर्भय बनो सभेच्या निमित्ताने भाषण करताना केले होते. निर्भय बनोच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, विधीज्ञ असीम सरोदे तसेच ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी महाराष्ट्रभर दौरे करून नागरिकांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही बुलंद करण्यासाठी जागृत केले होते. निर्भय बनो कार्यक्रम मार्चमध्ये कोल्हापूरमधील दसरा चौकामध्ये पार पडला होता. या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते. यावेळी त्यांनी व्यासपीठावर न जाता प्रेक्षकांमध्ये बसणे पसंत केले होते.
निर्भय बनो सभेमध्ये बोलताना शरद पवार यांच्या बहिण सरोज पाटील यांनी यावेळी, बोलताना सांगितले राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर कुटुंबावर आलेल्या संकटावर भाष्य केलं. त्या म्हणाल्या की, जेव्हा आमचे घर फोडलं त्यावेळी अत्यंत वाईट वाटलं. दिवसभर माझ्या डोळ्यांमधील पाणी हटत नव्हतं. तेव्हा शरदचा (शरद पवार) फोन आला. शरद म्हणाला की, रडत काय बसतेस आपल्या आईने आपल्याला लढायला शिकवलं, रडायला नाही. त्यामुळे जीवात जीव असेल तोपर्यंत लढायचं असं शरद म्हणाला. त्यामुळे सर्वांनी मिळून मोदींना हरवू, नाहीतर या देशांमध्ये हुकूमशाही येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले होते.
फक्त कोल्हापूरच नव्हे तर राज्यसह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. शाहू महाराज यांनी निर्णायक आघाडी घेण्यास सुरुवात केली आहे. शाहू महाराज यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांकडून मान गादीला आणि मत मोदीला अशा पद्धतीने प्रचार करण्यात आला होता. मात्र, शाहू महाराजांनी विजयाकडे केलेली वाटचाल पाहता कोल्हापुरात मान आणि मत गादीला दिल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, निर्णायक आघाडीकडे वाटचाल सुरू केल्यानंतर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूरच्या जनतेचे आभार मानले आहेत. त्यांनी कोल्हापूर शाहू महाराजांचा कोल्हापुरातून विजय निश्चित असल्याचे म्हटलं आहे. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी सुद्धा महाराजांच्या विजयाविषयी विश्वास व्यक्त केला आहे.