आरोग्याकडे दुर्लक्ष करत बजेटमध्ये ४४ टक्के कपात, आरोग्य विभाग 'राम भरोसे'
schedule27 Mar 26
person by
visibility 126
categoryआरोग्य विभाग
सुशांत पोवार - सरकार एकीकडे मोठ्या योजनांच्या जाहिराती करत आहे, मात्र दुसरीकडे राज्यातील विशेषतः दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे. रिक्त पदे, निधीमधील कपात आणि औषध खरेदीतील भ्रष्टाचाराने आरोग्य विभाग 'राम भरोसे' सुरू आहे, अशा शब्दांत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आरोग्य विभागावर टीका केली.
विधानसभेत विरोधकांच्या २९३ च्या प्रस्तावावर बोल ताना वडेट्टीवार म्हणाले, की 'कॅग'च्या अहवालानुसार राज्यात २७टक्के डॉक्टर आणि ३५ टक्के नर्सची पदे रिक्त आहेत. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात डॉक्टरांची कमतरतेमुळे रुग्णांना देवाच्या भरवशावर राहावे लागते. सरकार पायाभूत सुविधांवर, मोठ्या मोठ्या महामार्गाच्या प्रकल्पांवर बजेटच्या ४० टक्के खर्च करत असताना आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करत आहे. ग्रामीण आरोग्यासाठी गेल्यावर्षी २,६६० कोटींची तरतूद होती, ती आता थेट १,४३० कोटींवर आली आहे म्हणजे आरोग्याच्या बजेटमध्ये ४४ टक्के कपात झाली आहे. अशी स्थिती असेल तर मग गरिबांना उपचार कसे मिळणार? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
नाशिक आणि मालेगाव येथील रुग्णालयांच्या कामात बोगस परवाना असलेल्या कंपन्यांना कोट्यवधींची कंत्राटे देण्यात आली आहेत. रायगडमध्ये पुरवठा करण्यात आलेले ७१ हजार सिरपच्या बाटल्या निकृष्ट दर्जाच्या होत्या, असेही ते म्हणाले.