Breaking : bolt
सुनेत्रा पवार यांच्या निवडीची पहिली इच्छा व्यक्त करणारे नरहरी झिरवाळ यांचा एसीपीचा ट्रॅप आणि आत्ताचा व्हीडीओ काढून मिडियाला देणारा झारीतले शुक्राचार्य कोण ?आमदार राहुल आवाडे यांचे आमदार सतेज पाटील यांच्याबद्दलचे वक्तव्य राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारे - संजय पोवारदिनांक ४ जानेवारी ते १० जानेवारी २०२६ चे साप्ताहिक राशिभविष्यनिमेस्युलाईडचं प्रमाण १०० ग्रॅमहून अधिक असणाऱ्या औषधांवर बंदी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आदेशपालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाचे भूमिपूजनमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचारासाठी पुणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांचा विशेष जनजागृती कार्यक्रमआचारसंहितेची कडक अंमलबजावणी करा – प्रशासक के. मंजूलक्ष्मीमाजी आरोग्यमंत्र्यांना नडलेल्या अधिकाऱ्याची लाचेसाठी मध्यस्थामार्फत लावलेली सेटिंग लाचलुचपतने उधळलीघसादुखी, टॉन्सिलदुखी वर घरगुती आयुर्वेदिक उपायअपुऱ्या पायाभूत सुविधेचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर, स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याचे कारण पुढे करत माय-लेकांच्या पार्थिवाची हेळसांड

जाहिरात

 

ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि अमेरिकेच्या आरोग्य विभागाने भारतातील रेबीजची लस घेतलेल्या नागरिकांना केले सावध, बनावट बॅचेसची २०२३ पासून भारतात विक्री ?

schedule01 Jan 26 person by visibility 261 categoryक्राइम न्यूजआरोग्य विभाग

वृत्तसंस्था - ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य विभागाने भारतातील रेबीजची लस घेतलेल्या आपल्या नागरिकांना सावध केले आहे. त्यांना रेबीजची नवीन लस घेण्याची गरज आहे का, हे तपासून पाहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. ब्रिटन आणि अमेरिकेनेही अशाच प्रकारच्या सूचना जारी केल्या आहेत. ‘अभयरॅब’ या लसीच्या बनावट बॅचेसची २०२३ पासून भारतात विक्री होत असल्याने हा इशारा देण्यात आला आहे. ही लस ‘इंडियन इम्युनोलॉजिकल्स’ या सार्वजनिक क्षेत्रातील संस्थेच्या ‘ह्युमन बायोलॉजिकल इन्स्टिट्यूट’ या विभागाद्वारे तयार केली जाते. रेबीजची लागण झाल्यानंतर हा आजार जवळजवळ १०० टक्के जीवघेणा ठरतो, त्यामुळे या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ऑस्ट्रेलियाचे आरोप काय ? ‘अभयरॅब’ लस खरंच बनावट आहे का ? रेबीजमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण का वाढत आहे ? त्याविषयी जाणून घेऊयात...

          रेबीज हा विषाणू संसर्ग बाधित प्राण्यांच्या लाळेतून पसरतो. ताप, डोकेदुखी आणि मळमळ ही याची सुरुवातीची लक्षणे असतात. त्यानंतर लाळ गळणे, पाण्याची भीती वाटणे (हायड्रोफोबिया), भास होणे आणि अर्धांगवायू होण्यापर्यंतची लक्षणे दिसू शकतात. संसर्ग झाल्यानंतर त्वरित लसीकरण करून हा आजार रोखता येतो. त्यामुळेच कुत्री, मांजरी, माकडे किंवा वटवाघळांनी चावा घेतल्यास, ओरखडल्यास किंवा जखमेवर त्यांची लाळ लागल्यास रेबीजची लस घेणे आवश्यक असते. नॅशनल रेबीज कंट्रोल प्रोग्रामच्या अहवालानुसार, २०१२ ते २०२२ दरम्यान रेबीजच्या ६,६४४ संशयित केसेस आणि मृत्यूची नोंद झाली आहे, परंतु ही संख्या प्रत्यक्ष आकड्यापेक्षा कमी असू शकते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, दरवर्षी रेबीजमुळे साधारण १८,००० ते २०,००० मृत्यू होतात, त्यापैकी एक तृतीयांश ते दोन तृतीयांश मृत्यू १५ वर्षांखालील मुलांचे असतात. जगातील एकूण रेबीज मृत्यूंपैकी सुमारे ३६ टक्के मृत्यू एकट्या भारतात होतात.

           ऑस्ट्रेलियाने आणि ब्रिटन व अमेरिकेनेही आपल्या आरोग्य सूचनांमध्ये इशारा दिला आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस ब्रिटनने जारी केलेल्या सूचनेत म्हटले होते की, “नोव्हेंबर २०२३ पासून भारतात प्राण्यांच्या चाव्यानंतर रेबीजची लस घेतली हे सांगणाऱ्या प्रवाशांची ओळख पटवण्यासाठी ब्रिटनमधील आरोग्य यंत्रणा तपासणी करत आहेत. त्यांना पुन्हा लस देण्याची गरज आहे की नाही, हे ठरवणे यामागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.” अमेरिकेच्या ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन’ने (सीडीसी) नोव्हेंबरमध्ये इशारा देताना म्हटले, “भारतातून आलेल्या एका प्रवाशामध्ये रेबीजची केस आढळून आली आहे. भारतातील प्रमुख शहरांमध्ये बनावट ‘अभयरॅब’ लस विकली जात असल्याची माहिती मिळाली आहे. बनावट लसी रेबीज रोखण्यासाठी प्रभावी नाहीत आणि त्यामध्ये हानिकारक घटकदेखील असू शकतात.” संबंधित कंपनीने शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे की, “जानेवारी २०२५ मध्ये, बाजारपेठेत एक विशिष्ट बॅच (#KA24014) ओळखली, ज्याचे पॅकेजिंग मूळ लसीपेक्षा वेगळे होते. कंपनीकडून त्वरित भारतीय नियामक आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना याची माहिती देण्यात आली. बाजारपेठेत इतर कोणतीही बनावट बॅच नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले. दिल्ली, मुंबई, आग्रा, लखनऊ, कानपूर आणि पाटणा यांसह अनेक शहरांमध्ये या बनावट लसी आढळून आल्या. तक्रारींच्या आधारे दिल्ली, मुंबई आणि आग्र्यात छापे टाकण्यात आले.

          या प्रकरणाची माहिती असलेल्या एका तज्ज्ञाने सांगितले की, “बनावट उत्पादने जप्त करून त्यांची कसौली येथील सरकारी ‘सेंट्रल ड्रग टेस्टिंग लॅबोरेटरी’मध्ये चाचणी करण्यात आली. तिथे भारतातील सर्व लसींची बाजारात येण्यापूर्वी तपासणी केली जाते. विशेष म्हणजे, चाचणी अहवालात त्या लसींमध्ये मूळ औषधच असल्याचे आढळले. याचा अर्थ असा की, सरकारी पुरवठ्यातील माल खुल्या बाजारात वळवण्यासाठी केवळ उत्पादनाचे बाहेरील पॅकेजिंग बदलले गेले होते.” भारतात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या रेबीज लसींचे अनेक ब्रँड असले तरी ‘अभयरॅब’ ही सर्वात सहज उपलब्ध होणारी लस आहे. देशातील बाजारपेठेत या लसीचा वाटा सुमारे ४० टक्के आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही जगातील रेबीज लसीचे सर्वात मोठे उत्पादक आहोत आणि गेली २५ वर्षे हे उत्पादन करत आहोत. अशा सूचनांमुळे देशात लसीकरणाबाबत भीती किंवा संकोच निर्माण होऊ शकतो. समजा, एखाद्या गावात ‘अभयरॅब’ ही एकमेव उपलब्ध लस असेल आणि या बातमीमुळे कोणी ती घेतली नाही, तर ते धोकादायक ठरेल. आमची लस सुरक्षित आणि प्रभावी आहे, हे आम्हाला लोकांना पटवून द्यायचे आहे.”

           ‘असोसिएशन फॉर प्रिव्हेंशन अँड कंट्रोल ऑफ रेबीज इन इंडिया’चे (APCRI) संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. के. सुदर्शन यांनी भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, “सुदैवाने भारतात प्राण्याने चावा घेतल्यावर पाच डोस दिले जातात. आता जरी एका लसीच्या प्रभावीतेबद्दल शंका असली तरी जर व्यक्तीने इतर डोस आणि ‘इम्युनोग्लोब्युलिन’ घेतले असेल, तर ती व्यक्ती सुरक्षित राहील.” डॉ. सुदर्शन यांनी स्पष्ट केले की, जागतिक आरोग्य संघटनेच्या वेळापत्रकानुसार लोकांनी किमान तीन इंट्रा-मस्क्युलर डोस किंवा दोन इंट्रा-डर्मल डोस आणि चाव्याच्या दिवशी इम्युनोग्लोब्युलिन घेणे आवश्यक आहे. ज्यांनी आधीच लसीकरण केले आहे, त्यांना फक्त दोन बूस्टर डोसची गरज असते.

           २०२२ मध्ये केरळमध्ये रेबीजच्या केसेसमध्ये मोठी वाढ झाली होती आणि काहींना लसींच्या निष्फळतेबद्दल शंका होती. मृत झालेल्या अनेकांनी रेबीजची लस घेतली होती, त्यावरून हा निष्कर्ष काढण्यात आला होता. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीला असे आढळले की, जखम स्वच्छ करण्याची चुकीची पद्धत आणि इम्युनोग्लोब्युलिन न घेतल्यामुळे हे मृत्यू झाले होते. जेव्हा शरीरावर अनेक जखमा होतात किंवा त्वचा फाटते आणि त्या ठिकाणी प्राण्याने चाटलेले असते, तेव्हा त्याला ‘कॅटेगरी ३’चे चावणे मानले जाते. समितीने असेही निदर्शनास आणून दिले की, इम्युनोग्लोब्युलिन आणि लसींची उपलब्धता हे एक मोठे आव्हान होते. डॉ. सुदर्शन यांनी स्पष्ट केले, “क्वचित प्रसंगी, जखम वेळेवर आणि योग्यरित्या स्वच्छ न केल्यास लसीकरणानंतरही रेबीज होऊ शकतो. जर चावा मज्जातंतूंनी भरलेल्या भागात असेल आणि विषाणू थेट मज्जासंस्थेत गेला असेल तर संसर्ग होऊ शकतो.”

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes