सुशांत पोवार (संपादकीय) - विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुती मधून अनेक इच्छुकांची नावे समोर आली. ज्यांच्या वाट्याला दोन जागा आल्या आहेत अशा शिंदेच्या सेनेतही पक्षात काम करणाऱ्या अनेक इच्छुकांची नावे पुढे येऊ लागली. इच्छुक उमेदवार आपापली ताकद लावून एकनाथ शिंदे यांच्या पर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहेत पण या सगळ्यात शिवसेनेच्या बाहेरचे असलेल्या बच्चूभाऊ कडू यांचे नाव विधान परिषदेच्या एका जागेसाठी समोर येऊ लागले आहे. आता बच्चूभाऊ कडू एकनाथ शिंदे यांच्या किती जवळचे आहेत हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. त्याच जवळीकमुळे शिंदेनी बच्चूभाऊ कडूंना विधानपरिषदेची आमदारकी ऑफर दिल्याचे बोलले जात आहे. पण या ऑफरच्या बदल्यात एकनाथ शिंदेनी बच्चूभाऊ कडूंकडून त्यांचा पक्षच मागितल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. ३० एप्रिलच्या आधी प्रहार जनशक्ती पक्ष एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेत विलीन होईल आणि बच्चूभाऊ कडू विधान परिषदेवर आमदार म्हणून जातील असे बोलले जात आहे. पण या चर्चांमध्ये सत्यता किती आहे ? बच्चूभाऊ कडू त्यांचा पक्ष शिवसेनेत विलीन करणार का ? बरं करणार असतील तर त्यांच्यावर ही वेळ का आली ? गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विरुद्ध लढलेल्या आणि भाजपच्या विरोधात रान पेटवणाऱ्या बच्चूभाऊ कडू यांच्या कडून देवेंद्र फडणविसांच्या परवानगीशिवाय सेनेत प्रवेश मिळेल का ? यावर सडेतोड संपादकीय निर्भीड पोलीस टाइम्सच्या लेखणीतून.......
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत एकीकडे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना असताना संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, बच्चूभाऊ कडू या तिघांनी पुढाकार घेत तिसरी आघाडी स्थापन केली आणि बच्चूभाऊ कडू तिसऱ्या आघाडीकडून विधानसभा लढले. मोठ्या राजकीय अपेक्षेने निवडणूक लढलेले बच्चूभाऊ कडू स्वतःची जागा सुद्धा निवडून आणू शकले नाहीत. निकालानंतर मात्र बच्चूभाऊ कडू राजकीय दृष्ट्या एकदम बॅकफुटला गेले आणि ते थेट कर्जमाफीच्या आंदोलनावेळी समोर आले. काही दिवस रान पेटवल्यानंतर बच्चूभाऊ कडूंचे वारे पुन्हा शांत झाले. कधीकाळी राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय असलेले बच्चूभाऊ कडू राजकारणापासून अलिप्त राहू लागले. पण पुढच्या विधानसभा निवडणुकी शिवाय चर्चेत येण्याच्या शक्यता नसलेले बच्चूभाऊ कडू गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा समोर आले. त्याचे कारण ठरले विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी होणारी निवडणूक. विधानसभेत सत्ते बाहेर गेलेले बच्चूभाऊ कडू परिषदेवर जाणार असल्याचे बोलले जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी बच्चूभाऊ कडूंना आमदारकीची ऑफर दिल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. सुरुवातीला त्याकडे कोणी जास्त लक्ष दिले नाही पण २० एप्रिलला बच्चूभाऊ कडू मुंबईमध्ये शिंदेना भेटल्याचेही बोलले जात आहे. बच्चूभाऊ कडू हे शिवसेनेच्या कोट्यातून आमदारकी मिळवणार असल्याच्या चर्चा झाल्या पण त्यानंतर बातमी आली ती म्हणजे बच्चूभाऊ कडूंच्या पक्षाच्या विलिनीकरणाची आमदारकी एका जागेच्या बदल्यात शिंदेनी बच्चूभाऊ कडू यांच्याकडे प्रहार जनशक्ती पक्ष सेनेत विलीन करण्याची अट घातल्याच्या चर्चा झाल्या आहेत. बच्चूभाऊ कडू ती अट मान्य करून त्यांचा पक्ष शिवसेनेत विलीन करतील असही बोलले गेले आहे. आता या चर्चा होण्यामागे तीन प्रमुख कारण सांगितली जात आहेत. यातले पहिले कारण म्हणजे आधीपासूनच एकनाथ शिंदे यांच्या सोबत जुळवून घेण्याची बच्चूभाऊ कडूंची भूमिका २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर बच्चूभाऊ कडूंनी स्वतःला एस्टब्लिश करण्याचा जास्त प्रयत्न केला नाही. सत्तेत पुन्हा जाण्याचा मार्ग हा विधानपरिषद होता पण स्वतःच्या पक्षाकडे एकाही आमदाराची बॅकिंग नसल्याने बच्चूभाऊ कडू शांत बसले होते. तसेच दुसऱ्या पक्षाकडून पुरस्कृत उमेदवार म्हणून जायचे झाले तर तेही जमत नव्हते. कारण बच्चूभाऊ कडूंनी सगळ्याच पक्षांसोबत वाकड घेतलेले आहे. शेतकरी कर्जमाफीच्या आंदोलनात त्यांनी भाजपवर निशाना साधला होता. त्यावेळी त्यांनी सगळ्याच राजकीय पक्षांना धारेवर धरले होते. पण त्याला अपवाद होती एकनाथ शिंदेंची शिवसेना. गेल्या काही वर्षांमध्ये बच्चूभाऊ कडूंनी एकनाथ शिंदेंवर टीका केल्याची उदाहरणे सापडत नाहीत. त्यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सहित भाजपाच्या सगळ्याच नेत्यांवर टीका केली होती. पण यादरम्यान बच्चूभाऊ कडू यांनी महायुतीत सहभागी असलेल्या शिवसेनेला आणि एकनाथ शिंदेना कधीच दुखावले नाही. त्यांच्या याच भूमिकेमुळे एकनाथ शिंदे आमदारकीसाठी त्यांचा विचार करत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
बच्चूभाऊ कडू शिवसेनेत आपल्या प्रहार जनशक्ती पक्षाच विलिनीकरण करतील असे म्हणण्याचे दुसरे कारण म्हणजे बच्चूभाऊ कडूंनी एकनाथ शिंदेना सुरुवातीपासूनच दिलेली साथ. २० जून २०२२ विधान परिषदेचे मतदान झाल्यावर एकनाथ शिंदे सुरत मार्गे गुवाहाटीला रवाना झाले होते. शिवसेनेत झालेले हे सगळ्यात मोठं बंड होते. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेले शिवसेनेचे अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गुवाहाटीत गेले होते पण या सगळ्यात पक्षाच्या बाहेरचे असणारे तत्कालीन राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू कशात काही नसतानाही एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले होते. त्यांच्या प्रत्येक निर्णयात बच्चूभाऊ कडू सोबतच होते काही माध्यमांनुसार उरलेल्या आमदारांना गुवाहाटीमध्ये आणण्यात बच्चूभाऊ कडूंचा हात असल्याच सांगण्यात आले होते. स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी एकनाथ शिंदेना जास्तीत जास्त आमदार आपल्याकडे ठेवायचे होते. त्यावेळी बच्चूभाऊ कडूंनी एकनाथ शिंदेची साथ देऊन त्यांचा विश्वास जिंकला होता. याच विश्वासामुळे एकनाथ शिंदे त्यांना पक्षात घेणार असल्याच्या चर्चा आहेत. एकनाथ शिंदे आणि बच्चूभाऊ कडू एकत्र येण्यामागचे तिसर कारण म्हणजे दोघांनाही एकमेकांची असलेली गरज. कधी काही शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला अमरावती जिल्हा सध्या भाजपच्या ताब्यात आहे. जिल्ह्यातल्या आठ विधानसभा एकही जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे नाहीये. शिवाय स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये सुद्धा शिवसेनेची भागीदारी अगदी कमी आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे नेतृत्व करणारे आनंदराव अडसूळ यांचा प्रभाव आता कमी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी एकनाथ शिंदेना एका आक्रमक चेहऱ्याची गरज आहे. तोच चेहरा एकनाथ शिंदेनी बच्चूभाऊ कडू यांच्या मध्ये हेरल्याचे बोलले जात आहे.
२०२४ च्या निवडणुकीत बच्चूभाऊ कडू यांचा पराभव जरी झाला असला तरी अमरावती आणि पूर्ण पश्चिम विदर्भावर त्यांची अजूनही पकड असल्याचे सांगितले जात आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांवर त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते निवडून आलेले असल्याने अमरावतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर त्यांचा चांगलाच होल्ड आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी केलेल्या आंदोलनामुळे विदर्भातल्या शेतकऱ्यांचा मोठा वर्ग बच्चूभाऊ कडू यांच्या मागे ताकद लावू शकतो. अमरावतीच्या ग्रामीण भागात त्यांच्या कार्यकर्त्यांचे मोठं जाळे आहे. अशा परिस्थितीत जर बच्चूभाऊ कडूंनी आपला पक्ष शिवसेनेत विलीन केला तर येत्या विधानसभेला शिवसेनेच्या विदर्भातल्या जागा वाढण्याची शक्यता वाढते. याच गरजेमुळे एकनाथ शिंदेनी बच्चूभाऊ कडूंना पक्ष विलीन करून शिवसेनेत प्रवेश करण्याची ऑफर दिल्याचे बोलले जात आहे. आता सोबत येण्याची गरज फक्त एकनाथ शिंदेनाच आहे का ? तर नाही. पक्ष विलीन करून आमदार होणे सध्या बच्चूभाऊ कडू यांच्यासाठी ही गरजेच आहे. २००४, २००९, २०१४ आणि २०१९ अशा सलग चार टर्म निवडून आल्यानंतर गेल्या निवडणुकीत बच्चूभाऊ कडूंचा पराभव झाला. दोन दशकांपासून असलेल्या सत्तेच्या जोरावर त्यांनी प्रहार जनशक्ती पक्ष मोठा केला होता. पण भाजपच्या प्रवीण तायडेंनी केलेल्या पराभावानंतर जिल्ह्यात असलेल त्यांचे वजन कमी व्हायला लागल्याच दिसून आले. त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला जर असेच सुरू राहिले तर बच्चूभाऊ कडूंचे राजकीय भवितव्य धोक्यात येण्याचे चान्सेेस आहेत. शिवाय दुसऱ्या कोणत्या पक्षाच्या पाठिंब्याने विधान परिषदेत आमदार होणे बच्चूभाऊ कडूंना शक्य नाही. पराभवानंतर भाजपच्या प्रवीण तायडेंनी त्यांना चांगले जेरीस सांडलय. पराभवाने व्यथीत झाल्याने बच्चूभाऊ कडूंनी आपल्या भावाला मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप करून तायडेंनी बच्चूभाऊ कडूंच्या विरोधात तक्रारही दाखल केली होती. त्यामुळं दिवसेंदिवस बच्चूभाऊ कडूंच्या अडचणी वाढत चालल्या असल्याचे दिसत आहे. आता अशा परिस्थितीत एका मोठ्या पक्षाचा आधार घेतला नाही तर आपले राजकारण संपून जाईल हे बच्चूभाऊ कडूंना ठाऊक आहे. म्हणूनच त्यांनी ज्या पक्षातून राजकारणाची सुरुवात केली होती त्या शिवसेनेत आपला प्रहार जनशक्ती पक्ष विलीन करून बच्चूभाऊ कडू आपले लॉंग टर्म राजकारण सेट करतील असे बोलले जात आहे. आता या सगळ्या सांगितलेल्या कारणांमुळे बच्चूभाऊ कडू आपला पक्ष शिवसेनेत विलीन करतील असे अंदाज वर्तवले जात असले तरीसुद्धा हे करण्यासाठी त्यांना सगळ्यात मोठे आव्हान आहे ते म्हणजे भाजपचे. बच्चूभाऊ कडूनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या विरोधात गेल्या काळात घेतलेल्या भूमिकेमुळे ते भाच्चूभाऊ कडूंना महायुतीत पुढे येण्यासाठी विरोध करतील असे बोलले जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेना आधी देवेंद्र फडणवीसांना कन्विन्स करून मग बच्चूभाऊ कडूंना प्रवेश देता येईल असे बोलले जात आहे. बर असे झाले तरी एकनाथ शिंदे बच्चूभाऊ कडूंना पक्ष विलीन करण्याची प्रक्रिया येत्या ३० एप्रिलच्या आत करावी लागणार आहे. कारण विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल आहे. त्यामुळे आता बच्चूभाऊ कडू यांच्या विलिनीकरणाबाबत देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात ? आणि त्यानंतर एकनाथ शिंदे आणि बच्चूभाऊ कडू विलिनीकरणाची प्रक्रिया कधी करतात ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यातही शिवसेनेला मिळणाऱ्या दोन्ही जागांवर एकनाथ शिंदेसोबत आणि सिवसेनेसोबत असणाऱ्या अनेक निष्ठावंतांचा पहिला क्लेम आहे. अशा परिस्थितीत बाहेरून येणाऱ्या बच्चूभाऊ कडूंना आमदारकी दिली तर एकनाथ शिंदेना मोठ्या रोषाला सामोरे सुद्धा जावे लागू शकते........