सुशांत पोवार (कोल्हापूर) - महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम अंतर्गत राज्यातील विविध शासकीय कार्यालयांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले आहे. या अत्यंत प्रतिष्ठित मोहीमेमध्ये करवीर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मोहन मदने यांना तालुका वैद्यकीय अधिकारी गटातून राज्यात तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले असून, करवीर तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाच्या मानात यशाचा तुरा आज रोवला गेला आहे. डॉ.उत्तम मदने यांचेकडे सहा.जिल्हा आरोग्य अधिकारी, चार जिल्ह्याचे झोनल ऑफिसर आणि करवीरचे तालुका आरोग्य अधिकारी असे तीन - तीन पदभार स्वताच्या नावाप्रमाणे "उत्तम" असा न्याय दिला आहे, त्यामुळे त्यांचेवर वैद्यकीय क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सदरची मोहीम राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील विविध विभागात एकूण १२,५०० शासकीय कार्यालयांमध्ये यशस्वीपणे राबवली गेली असून, यामुळे सरकारी यंत्रणेतील कामकाजात सुधारणा झाली आहे तसेच करवीरतर्फे वैद्यकीय सेवांमध्ये चांगली प्रगती नोंदविण्यात आली आहे. या शंभर दिवसांच्या विशेष मोहीम अंतर्गत घेतलेल्या सुधारणा व सुधारित प्रशासनासाठी प्रशस्तीपत्रकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सही असून, या प्रशस्तीपत्रकाने करवीर तालुका आरोग्य विभागाच्या अभिमानात मनाचा तुरा रोवला गेला आहे.
करवीर तालुका आरोग्य कार्यालयाच्या या उल्लेखनीय कार्याला जिल्ह्यातून अभिमान व्यक्त होत असून डॉ. उत्तम मोहन मदने यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांनी करवीरवासियांसाठी आरोग्यसेवा सुधारण्यासाठी केलेले कठोर परिश्रम, वेळोवेळी प्रशासनात केलेल्या सुधारणात्मक उपाय योजना व कार्यक्षमतेने योजनांची केलेली अंमलबजावणी या त्यांचा दृष्टिकोनामुळे हा मान करवीर तालुक्याला मिळाला आहे. या शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम अंतर्गत कार्यालयीन प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, वेग व कार्यक्षमतेत सुधारणा करून शासनाच्या धोरणांना अधिक प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला गेला होता. करवीर तालुका आरोग्य कार्यालयाने या सर्व बाबतीत आदर्श घालून इतर कार्यालयांसाठी आदर्श निर्माण केला आहे. डॉ.उत्तम मोहन मदने यांनी करवीर तालुका आरोग्य विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर तत्काळ रुग्णालये, क्लिनिक, रक्तपेढ्या आणि लॅबोरेटरि या ठिकाणी महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी नियम २०२१ नुसार सुधारित शासन निर्णयाप्रमाणे सर्व क्लिनिक, रुग्णालये, प्रसूतीगृह, प्रयोगशाळा, निसर्गउपचार केंद्र यांना बॉम्बे नर्सिंग अँक्टनुसार नोंदणी बंधनकारक करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याने गेले अनेकवर्षे जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर पडण्याच्या घटना या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे थांबल्या आहेत. तसेच या बॉम्बे नर्सिंग अँक्टनुसार वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांना कायद्याचे संरक्षण मिळाले आहे. करवीर तालुका आरोग्य अधिकारी म्हणून त्यांनी दाखवलेली चुणूक आणि कार्याची दखल घेऊन प्रशासनाने डॉ.उत्तम मदने यांना गेल्या वर्षभरापासून सहा.जिल्हा आरोग्य अधिकारी आणि चार जिल्ह्याचे झोनल ऑफिसर असा अतिरिक्त पदभार दिला असून त्या पदाला सुद्धा त्यांनी त्यांच्या कार्यातून न्याय दिला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या या अत्यंत महत्त्वाच्या मोहीमेत करवीर तालुका आरोग्य विभागाला तृतीय क्रमांक मिळाला हा गौरव शासनाच्या कार्यकुशलतेतील प्रगतीचा तसेच करवीरच्या आरोग्यसेवेत होणाऱ्या सकारात्मक बदलांचा संकेत आहे. यामुळे करवीर तालुक्यातील आरोग्यसेवा अधिक सुलभ, जलद व गुणवत्तापूर्ण होण्याच्या दिशेने पाउल पडत असल्याचे संकेत आहेत.