सुशांत पोवार (संपादकीय) - दादा कोंडके मराठी मातीतल एक अजब रसायन होते. त्यांच्या "आंधळा मारतो डोळा" या चित्रपटात एक गाणं होत. "गेली सांगून ज्ञानेश्वरी आणि माणसापरस मेंढर बरी" मेंढरांची उपमा माणसांना द्यायला दादाच लागतात. मेंढरांचे कळप घेऊन रानोमाळ फिरणारे धनगर या आपल्या समाजाला स्थैर्य मिळावे, समाजाची प्रगती व्हावी, या ध्येयाने झपाटलेला एक तरुण घरातून बाहेर पडतो. त्याच्या हातात इंजिनियरिंगची पदवी असते पण त्याकडे ढुंकूनही न बघता तो तरुण धनगर समाजाच्या विकासाचे ध्येय घेऊन समाजकारणात आणि नंतर राजकारणात येतो. यातून आपल्या पदरात काय पडेल किंवा काय पडणार आहे याचा विचार न करता महाराष्ट्रात फिरायला लागतो आणि राजकीय पक्षांचे लक्ष वेधून घेतो. त्या तरुणाचे नाव "महादेवजी जानकर" राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष.........
सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील पळसावडे नावाच छोटसं गाव महादेवजी जानकर यांची ही जन्मभूमी. त्यांचे वाड वडील धनगर, शेती करणारे आहेत. त्यांनी सांगलीच्या वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इंजिनियर ही पदवी घेतली. पुढे काय करायचे असे महादेवजी जानकर यांचे चिंतन सुरू असतानाच नांदेडचे गोविंदराम शिरणार त्यांना मुंबईत भेटले. या भेटीने महादेवजी जानकर यांच्या आयुष्याला वेगळे वळण दिले, बहुदा महादेवजी जानकर यांना त्यांचे ध्येय आणि त्यासाठीचा मार्ग सापडला असावा. गोविंदराम शिरणार हे धनगर समाजाचे १९९० पासून त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत महादेवजी जानकर यांनीही आपले जीवन समाजाला समर्पित करण्यासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवले. महाराष्ट्रभर फिरत राहिले, घरादाराकडे त्यांनी पुन्हा वळूनही बघितले नाही, नाही म्हणायला जेव्हा ते राज्याचे कॅबिनेट मंत्री झाले त्यावेळी आपल्या मातोश्रींना घेऊन मंत्र्यांच्या दालनात घेऊन जाताना महाराष्ट्राने ते बघितले. राजकारणात आजकाल मला यातून काय मिळणार आहे याचा विचार प्रथम करण्याची संस्कृती रुजली आहे. महादेवजी जानकर यांना ऐन तारुण्यातच त्यांचे धेय गवसले होते, पण त्यातून मला काय मिळेल याचा विचार त्यांनी कधी केला नाही. इतकी वर्ष समाजकारण, राजकारण केल्यावर आज आपल्याला काय मिळेल इतकं करून याचा विचारही ते करत नाहीत. महादेवजी जानकर हे त्या कॅटेगरीतील राजकारणी कधीच नव्हते, ते समाजाच्या विकासाचे ध्येय गाठण्यासाठी आवश्यक ती धोरणे आखणारे राजकारणी नेते आहेत. त्यांची राजकीय कारकर्द ही ३० ते ३५ वर्षाची, या काळात आपल्या स्वार्थासाठी समाजाच्या नावावर त्यांनी कधीही सत्ताधारी किंवा विरोधी पक्षांशी बार्गेनिंग, इमोशनल ब्लॅकमेलिंग केलेलं नाहीये. हे आपल्याला आढळत नाहीये. आज अभावाने दिसणारी ही एकच गोष्ट महादेवजी जानकर यांना मान मिळून देते. महादेवजी जानकर यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली काशीरामजी यांच्या बहुजन समाज पक्षाकडून, त्यानंतर त्यांनी यशवंत सेनेच्या बॅनर खाली काम केले पण ती सांस्कृतिक संघटना किंवा संस्था होती. त्यामुळे महादेवजी जानकर यांनी २००३ साली राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली. तुटपुंजी साधन सामुग्री हातात असूनही महादेवजी जानकर यांनी पक्षाचे संघटन राज्यभर उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या भ्रमंतीत त्यांची गाठ भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी पडली आणि तिथून त्यांच्या मैत्रीची गाथा सुरू झाली. लहान लहान पक्षांना सोबत घेऊन राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या विरोधात रान पेटवायला मुंडे सरसवले आणि भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत महादेवजी जानकर, रामदास आठवले, राजू शेट्टी यांच्या सारखे नेते त्यांच्या संघटनेसह मुंडे यांच्या सोबत संघर्षात सामील झाले. याचेच फळ म्हणून महादेवजी जानकर यांच्या पक्षाला मुंडे यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीए मध्ये सामील करून घेतले. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने एनडीएचा उमेदवार म्हणून महादेवजी जानकर यांना बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दिली होती. त्यांनी चौफेर प्रचार केला, पवारांच्या राजकारणाविरोधात रान पेटवलं. राष्ट्रवादीची अक्षरशः दमछाक केली. त्यामुळे पवारांच्या बाले किल्ल्यात सुप्रियाताई सुळे यांचे मताधिक्य त्यांनी ६९ हजारावर आणून ठेवले. यानंतर काहीच महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीच्या प्रचाराची सभा पुण्यात झाली. या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यासपीठावर महादेवजी जानकर यांना जो मान दिला, तो सर्वांनी बघितला. भाषणात मोदींनी महादेवजी जानकर यांच्या बद्दलचा किस्सा सांगितला. महादेवजी जानकर यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी अशी आपली व पक्षाची अग्रही भूमिका होती. पण महादेवजी जानकर यांच्याबद्दलची माहिती मला समजली की त्यांनी समाजाच्या विकासासाठी घरदाराचा त्याग केला आहे, त्यांचाही स्वतःचा राजकीय पक्ष आहे, त्यानंतर त्यांच्या त्यागाचा सन्मान राखण्यासाठी त्यांना त्यांच्या पक्षाच्या वतीने निवडणूक लढवण्यासाठी परवानगी पक्षाने दिली. त्यावेळी जर महादेवजी जानकर साहेबांनी माझं ऐकलं असतं, तर ते आज संसदेत माझ्यासोबत दिसले असते. निवडणुकीनंतर आम्ही दिल्लीत ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस त्यांनी हे मान्य केले. असे म्हणत मोदींनी त्यांच्या त्यागाला सलाम केला. त्यानंतर दोन वर्षातच राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झाले. गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मिक निधनानंतर महादेवजी जानकर यांनी भावाप्रमाणे त्यांच्या कन्या पंकजाताई मुंडे यांना साथ दिली. महादेवजी जानकर यांनी मागची लोकसभेची निवडणूक परभणीतून लढवली होती. ते कधीही पारंपरिक पठडीतले राजकीय नेते झाले नाहीत. निवडणुकीत त्यांना फारस यश मिळालं नाही, पण त्यामुळे ते कधी नाउमेद ही झाले नाहीत. त्यांनी ठरवलेले ध्येय गाटण्यासाठी काम सुरूच ठेवलेत. आता आपल्या पक्षाला राजकीय आयडेंटिटी मिळाली पाहिजे, त्यासाठी त्यांनी विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढवल्या, आपल्या समाजाला जगण्यासाठी आजही संघर्ष करावा लागतो, ही त्यांची खंत आहे. या संघर्षाची तीव्रता कमी करण्यासाठीच महादेवजी जानकर हे घरादाराचा त्याग करून महाराष्ट्रसह संपूर्ण भारत फिरत आहेत. त्यांच्या या त्यागाला निर्भीड पोलीस टाईम्सचा सलाम.......