सुशांत पोवार (संपादकीय) - ऑक्टोबर २०१४ मध्ये घडलेली ही गोष्ट आहे. अमेरिकेतल्या वर्जिनिया प्रांतातल्या एका शहरात विलेट कुटुंब राहत होते. त्यांच्या घरी एक छोटासा विशिष्ट प्रजातीचा तो कुत्रा होता. त्यांच्या जेनेसिस नावाच्या आठ वर्षाच्या मुलीचा तो अत्यंत आवडता कुत्रा होता. त्या कुत्र्याच नाव "माया" होते. त्यांच्या घरात, गार्डनमध्ये तो कुत्रा फिरत असताना पेटा या संस्थेची एक गाडी त्या परिसरातून जात होती. त्या गाडीतून दोन लोक उतरले आणि त्यांनी त्या माया कुत्र्याला उचललं आणि आपल्या व्हॅनमध्ये टाकून घेऊन गेले. त्यानंतर त्या कुत्र्याला वर्जिनिया मधल्याच पेटा या संस्थेच्या शेल्टर होम मध्ये घेऊन जाण्यात आले. त्या ठिकाणी त्या कुत्र्याची हत्या करण्यात आली. घरच्या लोकांनी सगळीकडे कुत्र्याला शोधून पाहिलं आणि त्यांना कुत्रं काही सापडलं नाही. त्यावेळी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा चेक केला आणि त्यांना काय घडले ते त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर पेटा या संस्थेचे ते लोक होते आणि ते कुत्रे घेऊन गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. चौकशीमध्ये हे देखील लक्षात आलं की "माया" या कुत्र्याला या लोकांनी घेऊन गेल्यानंतर त्याची हत्या केलेली आहे. पेटान यासाठी कारण दिलं की आम्ही एखाद्या प्राण्याला त्रास होताना पाहू शकत नाही. त्याला त्रास होण्यापेक्षा, त्याचा एंटरटेनमेंट होण्यापेक्षा त्याला मृत्यू आलेला बरा, विलेट कुटुंबीयांनी पेटा विरुद्ध तक्रार दाखल केली. कोर्टात पेटाचा यामध्ये पराभव झाला. पेटा या संस्थेला विलेट कुटुंबीयांना ४९ हजार डॉलर एवढा दंड द्यावा लागला. त्यावेळी एका गोष्टीची सगळ्यात मोठी चर्चा अमेरिकेत झाली ती म्हणजे युथनेसिया, 'युथनेसिया' म्हणजे अतिशय शांतपणे आणि कोणताही त्रास न होता दिला गेलेला मृत्यू होय. पेटा ही संस्था अशा प्रकारे वाचवलेल्या प्राण्यांना युथनेसिया या पद्धतीने मृत्यू द्यायचं काम करते. हे पेटाच एक प्रचंड मोठं स्कॅडल आहे.
मार्च १९८० मध्ये इंग्रिड न्यूकिर्क आणि ॲलेक्स पाचेको या दोघांनी एकत्र येऊन पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स म्हणजेच "पेटा" या संस्थेची स्थापना केली. अमेरिकेतल्या व्हर्जिनिया प्रांतातल्या नॉरफोक या गावी या संस्थेची स्थापना झाली आहे. तिथेच त्याच मुख्यालय आजही कार्यरत आहे. या संस्थेची स्थापना करण्यामागचा उद्देश हा होता की प्राण्यांना चांगली वागणूक मिळावी, त्यांना त्रास होऊ नये, त्यांचा वापर करमणुकीसाठी किंवा माणसांची कामे करण्यासाठी केला जाऊ नये, त्यांना कापून खाल्लं जाऊ नये असे अनेक उद्देश या पेटा संस्थेने ठेवले गेले होते पण या संस्थेला नाव कमवण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी काहीतरी हटके करणे गरजेचं होते. जसे की एखादा स्टंट करणे ज्या स्टंट मधून या संस्थेचे नाव फेमस होईल आणि सगळ्यांच्या पर्यंत पोहोचेल. १९८१ मध्ये अमेरिकेतल्या इन्स्टिट्यूट ऑफ बिहेवियरल रिसर्च या संस्थेत ॲलेक्स पाचेको म्हणजे पेटाचा संस्थापक असलेला अलेक्स हा कार्यकर्ता म्हणून काम करायला गेला होता. तिथे जाऊन त्याने तिथे ज्या प्रकारे प्राण्यांच्यावर प्रयोग होत होते, तिथल्या माकडांच्यावर प्रयोग होत होते त्याचे त्याने फोटो काढले आणि हे फोटो त्याने अनेक मॅगझीन्समध्ये छापून आणले आणि पोलिसांच्यापर्यंत पोहोचवले. पोलिसांनी या संस्थेवर एक रेड टाकली आणि संपूर्ण अमेरिकेत हे प्रकरण पेटले. या संस्थेमध्ये माकडांच्यावर आणि त्या प्रजातीवरच अन्याय केला जातोय असे अमेरिकेतल्या लोकांच मत झालं पण खरं तर ती एक प्रयोगशाळा होती आणि शेवटी या संपूर्ण केसमध्ये पेटा संस्थेचाच पराभव झाला. जे शास्त्रज्ञ प्रयोग करत होते त्यांचा विजय झाला. पण तरीही पेटा हे नाव १९८१ मध्ये या पद्धतीने चर्चेत आले. चर्चेत राहण्यासाठी पेटा अतिशय भडक पद्धतीने जाहिरात आणि लोकांच्या भावना भडकवण्याच्या दृष्टीने काम करते. दोन महिन्यापूर्वी म्हणजे जून मध्ये पेटाने मुंबईत काही पोस्टर्स लावले होते. त्यावर एक स्त्री कुत्र्याच दूध पिताना दाखवली होती. तिथे लिहिले होते तुम्ही जर कुत्र्याच दूध पिऊ शकत नाही तर तुम्ही गाईच किंवा म्हशीच दूध का पिता ? तो देखील प्राण्यांच्यावर अन्यायच आहे, अत्याचार आहे, अशा प्रकारच्या जाहिराती लोकांना विचलित करतात, त्रास देतात, म्हणूनच पेटा हे नाव लोकांच्या लक्षात राहते.
अमेरिकेत देखील पेटाने अशाच प्रकारचे स्टंट केलेले आहेत. "होलोकॉस्ट ऑन योर प्लेट" अशी एक चळवळ पेटाने चालू केली होती. जणू काही प्राण्यांची निर्घुण हत्या तुम्ही करत आहात. त्यांचे मटन किंवा चिकन खाता असे भासवले जाते. त्याची तुलना हिटलरने केलेल्या हत्येशी केली गेली. याचा परिणाम असा झाला की, जूननीच पेटावर अनेक खटले दाखल केले अशा प्रकारे भडक जाहिरात केल्यामुळे पेटाचा पराभव झाला. पण तरी देखील पेटा चर्चेत राहिली. पेटा जरी आपण प्राण्यांना वाचवतो असे सांगत असली, दाखवत असली, तरी त्यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. पेटाचे व्हर्जिनियामध्ये आणि अमेरिकेतल्या अनेक शहरांच्यामध्ये शेल्टर होम्स आहेत. जिथे प्राण्यांना ते वाचवतात आणि त्या शेल्टर होम्समध्ये नेऊन ठेवतात. याच शेल्टर होम्समध्ये प्राण्यांना "युथेनेसिया" या पद्धतीने संपवले जाते ? म्हणजे अतिशय शांतपणे त्या प्राण्यांची हत्या केली जाते ? ज्याचा त्रास त्या प्राण्यांना मरताना होत नाही. १९९८ ते २०२२ या २४ वर्षात पेटाने अमेरिकेत ४० हजार प्राण्यांची हत्या केली असल्याचे इंटरनेटवर ऑन रेकॉर्ड आहे. हे फक्त आरोप नाहीत तर पेटाने स्वतःही मान्य केलेली गोष्ट आहे. त्यांचे हे म्हणणे आहे की, प्राण्यांना त्रास होण्यापेक्षा किंवा त्यांचा एंटरटेनमेंटसाठी वापर होण्यापेक्षा त्यांचा शांतपणे मृत्यू झालेला कधीही चांगला. पेटा सोडून इतर प्राण्यांच्यासाठी काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांचा देखील अशा प्रकारे "युथनेस" या पद्धतीने हत्या केली जाते. पण तिथे युथनेसिया करण्याची टक्केवारी १०% आहे. पेटाच्या शेल्टर होम्स मध्ये ८०% प्राण्यांची हत्या केली जाते.
२००५ मध्ये अमेरिकेतल्या नॉर्थ कॅरोलिना या राज्यामध्ये एका सुपर मार्केटच्या डस्टबिन मध्ये मोठ्या प्रमाणावर पिशवीत भरलेले प्राण्यांचे अवशेष सापडले होते. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला की, अशा प्रकारे मृत प्राण्यांचे शरीर त्या कचऱ्याच्या डब्यामध्ये कोण टाकत असेल ? या सापळ्यामध्ये "पेटा" संस्थेचे लोक रात्रीच्या वेळी हे काम करत असल्याचे सापडले, त्यानंतर देखील अमेरिकेत भरपूर दंगा झाला. पेटाने ही गोष्ट मान्य केली की ते प्राण्यांची हत्या करून तिथे डंप करत होते. याबद्दल पेटाला कोर्टाकडून भरपूर दंड द्यावा लागला. पण पेटाचा एक उद्देश मात्र यशस्वी झाला की ही संस्था आणखी जास्त फेमस झाली. जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचली पेटाचे हेडक्वार्टर्स असणाऱ्या व्हर्जिनिया मधल्या नॉरफोक या गावातच पेटा या संस्थेची एक मोबाईल व्हॅन कायम फिरत असते. या व्हॅनमध्ये व्हर्जिनियामध्ये जे प्राणी मोकाट फिरत असतात अशा प्राण्यांना पकडले जाते. त्यांची या व्हॅन मध्येच युथेनेस या पद्धतीने हत्या केली जाते. या गाड्यांना या व्हॅननाच "डेथ ऑन व्हील्स" असे म्हटले जाते. इथे प्राण्यांना अजिबात जगण्याचा अधिकार वगैरे गोष्टींची चर्चा देखील केली जात नाही. त्यांना अडॉप्शन सेंटर पर्यंत पोहोचून दिले जात नाही. भारतामध्ये मात्र अशा प्रकारचे "युथनेस" या सेंटर्स किंवा शेल्टर होम्स पेटाकडे नाहीत फक्त त्यांचे हेडक्वार्टर्स मात्र मुंबईमध्ये आहेत.
या संपूर्ण प्रकाराबद्दल पेटाचे असे म्हणणे आहे की, आम्ही त्या प्राण्यांना "युथनेसिया" करून मारतो. ज्या प्राण्यांची तब्येत कमजोर असते, जे प्राणी जगायला पात्र नसतात, जे आजारी असतात, म्हातारी असतात, अशा प्राण्यांना आम्ही शांतपणे मरण देतो जो त्यांचा अधिकार आहे. त्यामध्ये काहीही चुकीचे नाही. याबद्दल पेटावर अनेक खटले आतापर्यंत दाखल झालेले आहेत. अनेक अधिकाऱ्यांच्यावर खटले दाखल झालेले आहेत. त्यामधून पेटाने भरपूर प्रसिद्धी मिळवलेली आहे. भरपूर पैसा मिळवलेला आहे. बराचसा पैसा खटल्यांच्यामध्ये गमावलेला आहे, पण तरीही पेटाला देणगी देणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. भारतातल्या "सुंदर" नावाच्या हत्तीला जोतीबा देवस्थानचा जो सुंदर नावाचा हत्ती होता. त्याला पेटाच्या म्हणण्याप्रमाणे कर्नाटकातल्या बनेरघाट अभयारण्यात पाठवण्यासाठी स्वतः अर्जुन रामपाल महाराष्ट्राच्या वनमंत्र्यांच्या घरी गेला होता. अशाप्रकारे अनेक सेलिब्रिटीज पेटासाठी काम करत असतात. आलिया भट्टला २०२१ चा पेटाचा पुरस्कार मिळाला आहे तर २०२२ चा पुरस्कार मला वाटते सोनाक्षी सिन्हाला मिळाला आहे. असे अनेक सेलिब्रिटीज पेटासाठी काम करत आहेत. त्यांचे ब्रँँड अम्बेसिडर होतात. हे पेटाचा चेहरा बनतात आणि एवढं सगळं करून "सुंदर" नावाच्या हत्तीच काय झालं ? तर पेटाने ज्या अभयारण्यात कर्नाटकात सुंदर हत्तीला पाठवले तिथे काहीच वर्षात या हत्तीचा मृत्यू झाला., फक्त २२ वर्ष या हत्तीच वय होते. त्यावेळी तो सुंदर हत्ती जग सोडून गेला. अशा अतिशय विकृत मानसिकतेच्या पेटा या संघटनेच्या या सगळ्या कार्यप्रणाली बद्दल अनेक शंका असताना देखील भारता सारख्या देशामध्ये ही संस्था कशी आहे ? असा प्रश्न पडतो.
पेटाने मागच्या काही वर्षापूर्वी "अमूल" बरोबर एक वाद घातला होता. कोर्टामध्ये खटले दाखल केले होते की अमूलने गाईंचा आणि म्हशींचा छळ बंद करावा, त्यांच दूध काढणं बंद करावं, आणि प्लांट बेस दुधाचा वापर करावा. भारत ही एक वेगळी संस्कृती आहे. भारतात गाई म्हशी पाळण्याची परंपरा आहे. लोक गाईचे किंवा म्हशीचे दूध पितात. करोडो शेतकरी अशा प्रकारे या दुधापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर जगतात आणि दूध काढल्यामुळे गाईला किंवा म्हशीला फार काही त्रास होत नाही ही गोष्ट पेटाला समजत नाही. पेटा संस्थेला वाटते की शेतकऱ्यांनी प्लांट बेस दूध निर्माण करावं आणि तेच लोकांनी खावं अशाप्रकारे म्हशीचे किंवा गाईचे दूध पिणे म्हणजे त्या प्राण्यांच्या विरुद्ध क्रूरता आहे असे पेटाचे म्हणणे आहे. भारतातल्या शेतकऱ्यांना पेटाने आतापर्यंत विरोध केला आहे. त्यांच्या दुग्ध व्यवसायाला विरोध केला आहे. भारतातल्या दिपावलीला उडणाऱ्या फटाक्यांना पेटाने विरोध केला आहे. त्याचे कारण अतिशय हास्यास्पद आहे, की प्राण्यांना प्रदूषणाचा त्रास होतो. प्रदूषणाचा त्रास सगळ्यांनाच होतो पण पेटाचे कारण आहे की प्राण्यांना फटाक्यांचा त्रास होतो. पेटाने जल्लीकट्टू सारख्या बैलगडा शर्यती सारख्या खेळांना विरोध केला आहे. एकूणच भारताच्या संस्कृतीला पेटाने आतापर्यंत विरोध करण्याचं काम मागच्या २५ वर्षात केले आहे. याशिवाय सुंदर नावाचा हत्ती, माधुरी नावाची हत्तीण आणि इतर मंदिरांमध्ये किंवा धार्मिक संस्थांच्याकडे असणारे हत्ती यांच्या परंपरेला खंडित करण्याचं काम केले आहे. या सगळ्या मागे पेटाचा काही खूप चांगला उद्देश आहे आणि खूप चांगले काम ही संस्था करते आहे असे अजिबात कुठेही वाटत नाही. असे काहीही आजपर्यंत क्रेडिबल इन्फॉर्मेशन पेटाबद्दल मिळालेली नाही. त्यामुळे या माधुरी हत्तीनीच्या निमित्ताने पेटा या संस्थेवर बंदी घालायची वेळ आलेली आहे का ? असा प्रश्न आम्हाला पडतोय. खरोखरच पेटा या संस्थेचे भारतात दिवस भरलेले आहेत का ? आणि पेटावर भारत सरकारने बंदी घालावी का ? हे संपादकीयच्या माध्यमातून वाचकांसमोर प्रश्न मांडतोय. त्याचे उत्तर स्वता शोधा आणि निर्णय घ्या........