“मण्यार आला अंथरुणावर, आरोग्य व्यवस्थेचा कारभार आला चव्हाट्यावर..!”
schedule18 Aug 26
person by
visibility 27
categoryमहाराष्ट्रक्राइम न्यूजकोल्हापूर
सुशांत पोवार (विशेष वृत्त) - बाजारभोगाव ता. पन्हाळा येथे ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीची आणि सुरक्षित आरोग्यसेवा मिळावी म्हणून उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातच विषारी मण्यार साप आढळल्याने एकच खळबळ उडाली. कर्मचाऱ्याच्या अंथरुणावर हा विषारी साप आढळल्याने आरोग्य केंद्रातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाजारभोगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्याच्या अंथरुणावर विषारी मण्यार साप आढळला. प्रसंगावधान राखून उपस्थित रुग्णांच्या नातेवाईकांनी सापाला तातडीने पकडल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, या घटनेने आरोग्य केंद्रातील स्वच्छता, परिसराची देखभाल आणि कर्मचाऱ्यांसह रुग्णांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
आरोग्य केंद्रामध्ये विषारी साप थेट कर्मचाऱ्याच्या अंथरुणापर्यंत पोहोचतो, ही बाब केवळ एक घटना म्हणून दुर्लक्षित करण्यासारखी नाही. आरोग्य केंद्राचा परिसर नियमितपणे स्वच्छ केला जातो का ? झाडाझुडपांची योग्य निगा राखली जाते का ? इमारतीतील भेगा, खिडक्या, दरवाजे आणि इतर संभाव्य मार्ग बंद केले आहेत का ? याची जबाबदारी नेमकी कोणाची ? आज मण्यार साप आढळला आणि अनर्थ टळला, उद्या एखाद्या रुग्णाला किंवा कर्मचाऱ्याला सर्पदंश झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार ? हा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
आरोग्य केंद्र हे आजारी नागरिकांना उपचार देण्याचे ठिकाण आहे. मात्र त्याच ठिकाणी विषारी साप आढळत असेल, तर आरोग्य केंद्राच्या परिसरातील स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या व्यवस्थेची तपासणी होणे अत्यावश्यक आहे. नागरिकांनी आरोग्य केंद्राचा परिसर स्वच्छ ठेवण्यासोबतच आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. आरोग्य केंद्रातील स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था आणि रुग्णांसाठीच्या सुविधांचा संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने आढावा घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ही घटना केवळ एका विषारी सापाच्या आढळण्यापुरती मर्यादित नाही. आरोग्य केंद्रातील मूलभूत सुविधा आणि सुरक्षिततेकडे किती गांभीर्याने पाहिले जाते, याचा हा आरसा आहे. आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सुरक्षित वातावरण मिळणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची तातडीने पाहणी करून स्वच्छता, परिसराची निगा, सुरक्षा आणि आवश्यक सुविधांबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मण्यारचा फणा दिसला म्हणून धावपळ झाली पण आरोग्य व्यवस्थेतील दुर्लक्षाचा फणा कधी खाली येणार ? हा खरा प्रश्न आहे.