सीझरच्या शस्त्रक्रियेनंतर पोटात हातमोजे अन् कागद ? बीड जिल्हा रुग्णालयातील कथित हलगर्जीपणाने आरोग्य व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह..!
schedule19 Aug 26 person by visibility 18 categoryमहाराष्ट्रक्राइम न्यूजसंपादकीयआरोग्य विभाग
सुशांत पोवार (संपादकीय) - ज्या हातांनी एका नवजात बाळाला जगात आणायचे, त्याच हातांनी आज त्या बाळाला कुशीत घेण्यासाठी धडपड करावी लागतेय...कारण प्रसूतीनंतर आनंदाचे क्षण अनुभवायच्या वयात अवघ्या १९ वर्षांच्या संध्या सूरज गायकवाड यांना रुग्णालयाच्या कथित हलगर्जीपणामुळे मृत्यूशी झुंज द्यावी लागत असल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे.
बीड जिल्हा रुग्णालयात झालेल्या सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर संध्या यांच्या पोटात सर्जिकल ग्लोव्ह्ज आणि कागद / टिश्यू सदृश साहित्य राहिल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे पुढील उपचार आणि शस्त्रक्रियेदरम्यान पोटातून परकीय साहित्य काढण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेने केवळ एका कुटुंबाचा संसार हादरला नाही, तर सरकारी रुग्णालयात उपचारासाठी विश्वासाने येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संध्या गायकवाड यांच्यावर १ ऑगस्ट रोजी बीड जिल्हा रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर काही दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना सुमारे चार दिवसांनी घरी सोडण्यात आले. मात्र रुग्णालयातून घरी परतल्यानंतर संध्या यांच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. प्रकृतीत सुधारणा होण्याऐवजी त्यांची अवस्था अधिकच बिघडत गेल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. नवजात बाळ घरात असताना आईची प्रकृती मात्र दिवसेंदिवस ढासळत होती. अखेर कुटुंबीयांनी त्यांना खासगी रुग्णालयात नेले.
खासगी रुग्णालयात सोनोग्राफीसह अन्य वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर संध्या यांच्या पोटात काही परकीय वस्तू असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संध्या यांना पुढील उपचारांसाठी तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. ससूनमध्ये करण्यात आलेल्या उपचारादरम्यान त्यांच्या पोटातून सर्जिकल हातमोजे आणि कागद / टिश्यू सदृश साहित्य काढण्यात आल्याचा खळबळजनक दावा कुटुंबीयांनी केला आहे. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या शरीरात असे साहित्य राहिले असल्याचा आरोप खरा असेल, तर ते नेमके कसे राहिले ? शस्त्रक्रियेनंतरची मोजदाद, तपासणी आणि रुग्णाला डिस्चार्ज देण्यापूर्वीची प्रक्रिया नेमकी कशी पार पडली ? हे प्रश्न केवळ संध्या यांच्या कुटुंबाचे नाहीत ते संपूर्ण आरोग्य व्यवस्थेला विचारावे लागणार आहेत.
या घटनेनंतर संध्या यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे. संध्या यांचे पती सूरज गायकवाड यांनी डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळेच पत्नीची प्रकृती गंभीर झाल्याचा आरोप केला आहे. तर संध्या यांच्या आईने व्यक्त केलेली वेदना या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित करते. “मुलीने बाळाला जन्म दिला पण आज त्या बाळाला कुशीत घेण्याचीही तिच्यात ताकद उरलेली नाही...” एका आईच्या या आक्रोशाला जबाबदारीची भाषा कोण देणार ?
घटनेचे गांभीर्य समोर आल्यानंतर बीड जिल्हा आरोग्य प्रशासनाने प्रकरणाची दखल घेतल्याचे वृत्त आहे. संबंधित सिझेरियन शस्त्रक्रिया करणाऱ्या महिला डॉक्टरांसह शस्त्रक्रियेदरम्यान उपस्थित असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके यांनी दिल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. चौकशीअंती दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. म्हणजेच, सध्या दोष निश्चित झालेला नसला तरी प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे आणि संबंधितांची जबाबदारी तपासली जात आहे.
शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील अत्यंत संवेदनशील विश्वासाचा क्षण. रुग्ण भूल देऊन डॉक्टरांच्या स्वाधीन होतो. त्यानंतर त्याच्या शरीरात काय घडते, याची जबाबदारी संपूर्णपणे वैद्यकीय पथकावर असते. अशा परिस्थितीत शस्त्रक्रियेनंतर शरीरात परकीय साहित्य राहिल्याचा आरोप समोर येणे ही साधी बाब म्हणून झटकून चालणार नाही. कारण प्रश्न एका वस्तूचा नाही...प्रश्न आहे रुग्णाच्या जीवाचा ! प्रश्न आहे शस्त्रक्रियागृहातील प्रोटोकॉलचा ! प्रश्न आहे वैद्यकीय पथकाच्या दक्षतेचा ! प्रश्न आहे रुग्णाला डिस्चार्ज देण्यापूर्वी करण्यात येणाऱ्या तपासणीचा ! आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाची किंमत नेमकी किती ?
या प्रकरणात केवळ कारणे दाखवा नोटीस देऊन प्रशासनाने थांबणे पुरेसे ठरणार नाही. चौकशी पारदर्शक, निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठ झाली पाहिजे. शस्त्रक्रियेदरम्यान कोण कोण उपस्थित होते ? शस्त्रक्रियेची नोंद काय आहे ? ऑपरेशननंतर वापरलेल्या सर्जिकल साहित्याची मोजदाद झाली होती का ? रुग्णाला डिस्चार्ज देण्यापूर्वी कोणत्या तपासण्या करण्यात आल्या ? संध्या यांच्या प्रकृतीतील बिघाडाची वेळेत दखल का घेतली गेली नाही ? आणि सर्वांत महत्त्वाचे ससून रुग्णालयातील तपासणी व शस्त्रक्रियेचे वैद्यकीय निष्कर्ष नेमके काय सांगतात ? या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर चौकशी अहवालातून समोर आले पाहिजे.
एका बाजूला राज्यात सरकारी आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते, अत्याधुनिक सुविधा, उपकरणे आणि मनुष्यबळाची चर्चा होते. पण दुसऱ्या बाजूला एखाद्या नवमातेच्या शरीरात शस्त्रक्रियेनंतर परकीय साहित्य राहिल्याचा आरोप समोर येत असेल, तर फक्त इमारती, उपकरणे आणि निधी पुरेसा आहे का ? आरोग्य व्यवस्था ही केवळ औषधं, ऑपरेशन थिएटर आणि डॉक्टरांची संख्या नाही. ती आहे जबाबदारी, दक्षता आणि माणुसकी ! संध्या गायकवाड आज पुण्यात उपचार घेत आहेत. त्यांच्या हातात नवजात बाळ देण्याऐवजी त्यांच्या कुटुंबीयांच्या हातात सध्या चिंता, अश्रू आणि प्रश्न आहेत. आता प्रशासनाने ठरवायचे आहे या प्रश्नांना उत्तर मिळणार का ? की चौकशीच्या फाईलवर पुन्हा एकदा धूळ साचणार ?
निर्भीड पोलीस टाइम्सचा थेट सवाल