आयपीएस अधिकाऱ्या विरोधात महिला डॉक्टरने दाखल केला बलात्काराचा गुन्हा
schedule13 Apr 25
person by
visibility 254
categoryक्राइम न्यूज
वृत्तसंस्था - नागपूर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात नागपुरातील एका आयपीएस अधिकाऱ्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शहराच्या इमामवाडा पोलीस स्टेशनमध्ये एका महिला डॉक्टरने तीस वर्षीय आयपीएस अधिकाऱ्या विरोधात बलात्काराची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे आयपीएस अधिकारी आणि महिला डॉक्टरची ओळख २०२२ मध्ये पहिल्यांदा इंस्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती. आरोप लागलेला तरुण तेव्हा सिविल सर्विसेसची तयारीच करत होता. तर पीडित महिला नागपुरात एमबीबीएसचे शिक्षण घेत होती.
दरम्यान, इंस्टाग्रामवरील ओळखीनंतर दोघांमध्ये मैत्री निर्माण होऊन भेटीगाठी वाढल्या. याच दरम्यान लग्नाचे आश्वासन देऊन तरुणाने वेगवेगळ्या ठिकाणी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप या महिला डॉक्टरने तिच्या तक्रारीत केला आहे. यानंतर मात्र तरुण सिविल सर्विसेसची परीक्षा उत्तीर्ण होऊन आयपीएस अधिकारी झाला आणि त्याने लग्नास नकार दिला. अनेक वेळेला प्रयत्न करूनही संबंधित आयपीएस अधिकारी भेटत नाही, त्याचे कुटुंबीय ही दाद देत नाही, यामुळे निराश झालेल्या महिला डॉक्टरने नागपूरच्या इमामवाडा पोलीस स्टेशनमध्ये आयपीएस अधिकाराच्या विरोधात बलात्काराची तक्रार दिली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, ज्या आयपीएस अधिकाऱ्याच्या विरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे तो नागपुरात पोस्टेड नाही. तर ते महाराष्ट्राच्या दुसऱ्या जिल्ह्यात कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या घटनेने पोलीस विश्वात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहे.