दिनांक १३ एप्रिल ते १९ एप्रिल २०२५ चे साप्ताहिक राशिभविष्य
schedule13 Apr 25
person by
visibility 36
categoryराशिभविष्य
मेष : दिनांक १६, १७ या दोन दिवसांत आपण ठरवून जे काम करणार आहात ते काम वेळेत होणार नाही; त्यामुळे काम करण्याचा उत्साह कमी होईल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा. काम उशिरा झाले तरी चालेल, पण ते अचूक करा. घाईगडबडीने नुकसान होऊ शकते. मग उशीर झाला तरी हरकत काय आहे. दुसऱ्यांचे काम वेळेत होते, माझे काम वेळेत होत नाही हे पहिले डोक्यातून काढून टाका. का तर हे दोन दिवस तसे उशीर करणारे आहेत, हे लक्षात ठेवा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात मोठी गुंतवणूक सध्या तरी नको. नोकरदार वर्गाला कामात पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे लागेल. आर्थिकदृष्ट्या अनपेक्षित लाभ होईल. नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. धार्मिक गोष्टींची आवड राहील. आरोग्याचे पथ्यपाणी सांभाळा.
वृषभ : षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. ज्या वेळी सप्ताहात असे भ्रमण असते त्या वेळी त्रास होत आहे असे जाणवते. पण हे कायमस्वरूपीचे नाही. ज्या वेळी असे भ्रमण असणार आहे त्या वेळी आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की, सध्या आळीमिळी गुपचिळी यामुळेच त्रासच होणार नाही. कोणी काही बोलू द्या, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. आपल्याला जे ेकरायचे आहे ते मात्र नियोजन करून करा. म्हणजे काम वेळेत पूर्ण होईल. प्रत्येक गोष्टीत सहनशीलता ठेवा. व्यवसायात धावपळ होईल. नोकरदार वर्गाला कामासाठी जास्त वेळ द्यावा लागेल. आर्थिक व्यवहार जपून करावे लागतील. समाजमाध्यमांचा वापर जेवढ्यास तेवढा करा. जोडीदाराचे मात्र सहकार्य उत्तम राहील, त्यामुळे मन प्रसन्न राहील.
मिथुन : दिनांक १६, १७ हे दोन दिवस तसेच संघर्षाचे आहेत असे म्हणायला हरकत नाही. नेमक्या याच दिवसांत आपल्याला शुभ गोष्टींची सुरुवात करावी असा मोह निर्माण होतो. शिवाय तोंडावर ताबा राहत नाही. जे तोंडात येईल ते बोलायचे आणि गोष्ट अंगलट आली की त्रास करून घ्यायचा. त्यापेक्षा हे दोन दिवस शांत राहिलेले केव्हाही चांगले. बेकायदेशीर गोष्टींच्या नादी लागू नका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला राहील. व्यवसायात आत्तापर्यंत खूप प्रयत्न करूनही म्हणावे असे यश मिळत नव्हते. सध्या श्रमाचे फळ मिळणार आहे. नोकरदार वर्गाला कामात गुंतून राहावे लागेल. राजकीय क्षेत्रात हस्तक्षेप करू नका. मित्र-मैत्रिणींचे सहकार्य लाभेल. मुलांच्या बाबतीत घेतलेले निर्णय योग्य असतील, त्यासाठी जोडीदाराची मदत होईल. तरुण वर्गाला विवाहाचा प्रस्ताव येईल. उपासना फलद्रूप होईल. योगसाधनेला महत्त्व द्या.
कर्क : दिनांक १८, १९ या दोन दिवसांत धावपळ होईल, त्यामुळे तुम्हाला थकवा जाणवेल. आता हे दिवस धावपळीचे आहेत असे समजल्यानंतर नियोजन करणे मात्र योग्य राहील. एखादी गोष्ट करायची आहे तर त्याचे आधीच नियोजन करा, म्हणजे त्रास होणार नाही व थकवाही जाणवणार नाही. तुम्ही तहान लागल्यावर विहीर खणायला जाल तर त्रास होणारच. शिवाय एखादे काम आपल्याला करायचे आहे म्हटल्यानंतर गोड बोलूनच काम करून घेणे गरजेचे राहील हे लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्टीत हिशेबाची नोंद ठेवा, म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात कामाचे स्वरूप बदलेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बना. समाजसेवा करण्याची इच्छा नसली तरी ती करावी लागेल. घरगुती वातावरण ठीक राहील.
सिंह : सप्ताहातील सर्व दिवस चांगले आहेत. कोणत्याही गोष्टीसाठी त्रास होणार नाही असे वातावरण आहे. असे वातावरण असते त्या वेळी आळस करून चालणार नाही. कारण अशा वातावरणात काम वेळेत पूर्ण होत असते तेव्हा विचार करत बसू नका. जे करायचे आहे ते आत्ताच करायचे. उद्याचे कामही आजच करण्याचा निश्चय पक्का करा, म्हणजे कामकाज सुरळीत चालू राहील. इतरांची मदत वेळेत मिळेल. गोष्टी सुलभ घडतील. व्यवसायात आवक-जावक वाढेल. नोकरदार वर्गाला नवीन कामासाठी प्रस्ताव येतील. हे प्रस्ताव स्वीकारण्यास उशीर करू नका. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा होईल. मित्र परिवाराशी करमणुकीचे बेत आखाल. संततिसौख्य लाभेल. घरगुती वातावरण आनंदी राहील. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल.
कन्या : शुभ ग्रहांची साथ असल्यावर मनोरंजन का होणार नाही? तर चला, सध्या तयारीला लागा. जे दिवस आनंदाचे आहेत ते वाया घालवू नका. चांगले मनोरंजन होणार आहे. पर्यटन स्थळाला भेट देण्याचा तुमचा निश्चय दृढ होईल. काही सप्ताहात गोष्टी मनाविरुद्ध घडत होत्या, त्यामुळे तुमची मानसिकता लगेच बिघडून जाते. सध्या मानसिकता बिघडण्याचे कारणच नाही. तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा असणार आहे. अनेकदा चांगले दिवस असले की तुम्ही मात्र आळशी बनता. सध्या मात्र असे करू नका. तुमच्या अंगी जो करारीपणा आहे तो सतत जागृत ठेवा. व्यवसायात परिपक्वता येईल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळेल. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रातील डावपेच वेळीच लक्षात येतील. नातेवाईकांशी कार्यक्रमानिमित्त भेटीगाठी होतील. भावंडांना मदत कराल. घरगुती वातावरण आनंदी राहील. आरोग्य साथ देईल.
तूळ : आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे’ असे सध्या दिवस असणार आहेत. या दिवसांत जे तुम्ही काही मनामध्ये योजलेले आहे ते पूर्ण होणार आहे. त्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही. स्वत:चे काम स्वत: करायचे हे मात्र तुम्ही पक्के ठरवाल. ते काम केल्याशिवाय तुम्ही स्वस्थ बसणार नाही. एखादे काम करायचे ठरवले आणि त्याला तांत्रिक अडथळे आले तर ते काम अडकून राहते. सध्या असा कोणताही अडथळा येणार नाही. काम वेळेत पूर्ण होईल. व्यवसायात सध्याची परिस्थिती उत्तम असेल. नोकरदार वर्गाला कामामध्ये जास्त कष्ट घ्यावे लागत होते. ते सध्या घ्यावे लागणार नाहीत. आर्थिक ताणतणाव कमी होईल. राजकीय क्षेत्रातील लोकांना शुभेच्छा मिळतील. व्यक्तिमत्त्व खुलेल. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. जोडीदाराची साथ मिळेल. आरोग्य उत्तम राहील.
वृश्चिक : दिनांक १३, १४ हे दोन दिवस फारसे अनुकूल नाहीत हे लक्षात ठेवा. दिवस असे असले की तुमची जीभ मात्र फार उचलते आणि नको त्या भानगडी वाढवून घेता. त्यामुळे तुमच्या जिभेवर ताबा ठेवा. एखाद्याने एखादा शब्द बोलला तर त्याला चार शब्द बोलून दाखवू नका, त्यामुळे वादविवाद वाढू शकतात. न पटणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका म्हणजे त्रास होणार नाही. इतरांना सल्ला देणे टाळा. आपल्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींत लक्ष देऊ नका म्हणजे त्रास होणार नाही. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात अनावश्यक गोष्टींची गुंतवणूक करणे टाळा. नोकरदार वर्गाला कामाच्या संदर्भात ठोस असा निर्णय घ्यावा लागेल. आर्थिक नियोजन करा. कुटुंबाविषयी असलेले गैरसमज वेळीच दूर करा. जोडीदाराला विश्वासात घेऊन निर्णय घ्या. योगसाधनेला महत्त्व द्या.
धनू : दिनांक १६, १७ या दोन दिवसांत अशी परिस्थिती निर्माण होईल की तुमची इच्छा नसताना तुम्हाला वादाला सामोरे जावे लागेल. म्हणजेच काय तर, समोरून येणारा प्रतिसाद चांगला नसेल. तुम्ही शांत बसायचे ठरवले तरी तसे होणार नाही. अशा वेळी तुम्ही एक घाव दोन तुकडे करणार आणि तुमची मानसिकता बिघडणार. या सर्व गोष्टींवर पर्याय एकच असेल, शांत राहून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करा. दोन शब्द कमी बोला. शब्द जपून वापरा. म्हणजे वाद होणार नाही. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात मोठी खरेदी करण्यापूर्वी विचार करा. कारण आगामी काळासाठी पैशाची चणचण भासू शकते. नोकरदार वर्गाला कामामध्ये निष्काळजीपणा करून चालणार नाही. आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्च टाळा. मित्र-मैत्रिणींचा आधार वाटेल. घरगुती वातावरण चांगले कसे राहील ते पाहा. प्रकृतीची काळजी घ्या.
मकर : दिनांक १८, १९ या दोन दिवसांत काय करावे काय करू नये हे तुम्हाला समजणार नाही. जिथे तुमचे मन भरकटेल अशा ठिकाणी तुम्हाला फिरण्याचा मोह निर्माण होईल. तेव्हा मनात आले म्हणून केले असे करू नका. त्यासाठी पक्के नियोजन करा. कोणतेही महत्त्वाचे काम करताना ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला विचारात घ्या, म्हणजे नुकसान होणार नाही. तुमच्याकडे प्रामाणिकपणा जरी असला तरी तो इतरांना समजून सांगताना तुम्ही अपयशी ठरता. कारण तुमची बोलण्याची पद्धत चुकीची असते, ती बदलल्यास कोणालाच त्रास होणार नाही. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाला कामात लक्ष घालता येईल. आर्थिकदृष्ट्या खर्च सांभाळा. मित्र-मैत्रिणींशी मनमोकळेपणाने बोलाल. त्यांच्या सहवासात आनंद मिळेल. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या. स्वत:ची प्रकृती जपा.
कुंभ : भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होणारे चंद्राचे भ्रमण लाभदायक असेल. गेल्या काही दिवसांपासून काही ना काही तरी त्रास समोर यायचा आणि तो निस्तारण्याची ताकद तुमच्यामध्ये नसायची. कारण एका कामाकडे लक्ष दिले तर दुसऱ्या कामाकडे दुर्लक्ष व्हायचे, त्यामुळे दुसरे काम बिघडून जायचे. सध्या सर्वच कामे सुरळीत चालू राहणार असल्याने तुम्हाला जास्त ताण घ्यावा लागणार नाही. ज्या गोष्टी अपेक्षित नाहीत अशा गोष्टीही होणार आहेत. सुखाचे क्षण अनुभवाल. म्हणजेच सप्ताह भाग्योदयाचा आहे म्हणायला हरकत नाही. व्यवसायात प्रगती होईल. नोकरदार वर्गाला बढती मिळेल. आर्थिकदृष्ट्या सक्षम बनाल. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. नातेवाईकांशी संवाद साधाल. शेजाऱ्यांना मदत कराल. धार्मिक गोष्टीत सहभाग राहील. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
मीन : दिनांक १३, १४ या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये जपून पाऊल टाकावे लागेल. महत्त्वाचे काम पुढे ढकललेले चांगले. कारण या दिवसांत गोष्ट चांगली आहे की वाईट आहे याचा विचार करायला वेळ मिळत नाही आणि आपण घाईने काम करतो आणि त्याच कामांमध्ये फसगत होते. अशी फसगत होऊ नये म्हणून काळजी घ्यायची आहे. ज्या गोष्टीतून त्रास होणार आहे अशा गोष्टी न केलेल्या चांगल्या. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. चांगल्या दिवसांमध्ये महत्त्वाचे करार करायला हरकत नाही. व्यवसायात समाधानकारक परिस्थिती असेल. नोकरदार वर्गाला नवीन नोकरीचे प्रस्ताव येतील. आर्थिकदृष्ट्या अनपेक्षित लाभ होईल. राजकीय क्षेत्रात वरिष्ठांची कृपा राहील. नातेवाईकांच्या कार्यक्रमात सहभाग राहील. धार्मिक गोष्टीतील उत्साह टिकून राहील. मानसिकता जपा. आहारावरती नियंत्रण ठेवा.