Breaking : bolt
आरोग्यचे आयुक्त अँक्शनमोडवर, मनपाचे आरोग्य अधिकारी यांची बदली आणि चौकशीचे आदेशडॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलंच पत्रकारी स्वरूपाचं लेखन 'मूकनायक'च्या पहिल्या अंकात....'मॅनेज' निविदेचा प्लॅन उधळला ? आता दोषींच्या चौकशीअंती निलंबनाची मागणी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण असताना धाराशिवमध्ये बोगस औषधे पोहचली कशी ?आयपीएस अधिकाऱ्या विरोधात महिला डॉक्टरने दाखल केला बलात्काराचा गुन्हाबोगस डॉक्टरांकडे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियंत्रण समितीचे दुर्लक्ष रुग्णांच्या जीवावर ?दिनांक १३ एप्रिल ते १९ एप्रिल २०२५ चे साप्ताहिक राशिभविष्यपुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यात सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा महसूल जमालातूर जिल्ह्यात येणार २ हजार २६८ कोटींची गुंतवणूकसिंधुदुर्गमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

जाहिरात

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलंच पत्रकारी स्वरूपाचं लेखन 'मूकनायक'च्या पहिल्या अंकात....

schedule14 Apr 25 person by visibility 97 categoryसंपादकीय

सुशांत पोवार (संपादकीय) - "जर या हिंदुस्थान देशातील सृष्ट पदार्थांच्या व मानजातीच्या चित्रपटाकडे प्रेक्षक या नात्याने पाहिले तर, हा देश म्हणजे केवळ विषमतेचे माहेरघर आहे, असे निःसंशय दिसेल", हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'मूकनायक'च्या पहिल्या अंकात लिहिलेल्या लेखामधलं आरंभिक वाक्य आहे. हे आंबेडकरांचं पहिलंच पत्रकारी स्वरूपाचं लेखन असावं.

                 31 जानेवारी 1920 रोजी हा अंक प्रकाशित झाला होता. तेव्हापासून कितीतरी गोष्टी बदलल्या आहेत, पण तरीही म्हणावा इतका बदल झालेला नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं माध्यमांशी असलेलं नातं व्यामिश्र होतं. त्यांनी स्वतः वर्तमानपत्रं सुरू केली, चालवली, संपादित केली आणि सल्लागार म्हणूनही काम केलं. इतर वेळी माध्यमांमध्ये त्यांच्याविषयीचं वार्तांकन होत राहिलं. पोहोच आणि जवळपास एकहाती चालवलेल्या सामाजिक चळवळी यांचा विचार केला, तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे त्या काळी सर्वाधिक प्रवास केलेले राजकीय नेते असावेत.

             सामाजिक पाठिंबा आणि आर्थिक पाठबळ यांच्या अभावी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही गरीब लोकांची चळवळ होती. काँग्रेस पक्षासारखी त्यांची स्थिती नव्हती. त्यामुळे त्यांच्या समर्थकवर्गातील लोक कूळ वा वेठबिगार म्हणून काम करणारे वंचित होते. आर्थिकदृष्ट्या हा वर्ग सर्वांत कमी संसाधनं बाळगून होता. तर, बाहेरून फारसा पाठिंबा नसताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना हा सर्व भार स्वतःच्या खांद्यावर पेलावा लागला. माध्यमांच्या दृष्टीने हे दखलपात्र होतं. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय माध्यमविश्वात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य सुपरिचित होतं. देशांतर्गत माध्यमांमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची उपस्थिती आणि त्यांचं संपादकीय कार्य यांबद्दल आपल्याला माहिती असते, पण आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये त्यांच्याविषयी झालेलं विस्तृत वार्तांकन बऱ्याच प्रमाणात अज्ञात राहिलं आहे.

                लंडनमधील द टाइम्स, ऑस्ट्रेलियातील डेली मर्क्युरी, न्यूयॉर्क टाइम्स, न्यूयॉर्क अॅमस्टरडॅम न्यूज, बाल्टिमोर आफ्रो अमेरिकन, द नॉरफोक जर्नल, यांसारख्या विख्यात आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांसह काळ्या लोकांनी चालवलेल्या वर्तमानपत्रांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्यताविरोधी चळवळीमध्ये आणि गांधी - आंबेडकर संघर्षामध्ये बराच रस घेतला होता. राज्यघटना निर्मितीमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका, संसदेतील त्यांचे युक्तिवाद व सादरीकरणं, आणि नेहरूंच्या मंत्रिमंडळाचा त्यांनी दिलेला राजीनामा, या घडामोडींकडेही जगाचं लक्ष होतं. देशांतर्गत पातळीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची सामाजिक चळवळ चालवण्यासाठी माध्यमांचा आधार घेतला. उत्कट प्रादेशिक प्रेमादरापोटी त्यांनी 'मूकनायक' या त्यांच्या पहिल्या मराठी नियतकालिकाचा आरंभ केला. 'मूकनायक'चा उद्देश स्पष्ट करण्यासाठी त्यांनी तुकारामांचा एक अभंग अंकाच्या शीर्षस्थानी वापरला होता, तर पुढे 'बहिष्कृत भारत' या नियतकालिकाची बिरुदावली म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरांच्या ओळी वापरल्या. 'मूकनायक'मध्ये वापरल्या जाणारा तुकारामांचा अभंग असा:

काय करूं आतां धरूनिया भीड

निःशंक हें तोंड वाजविले

नव्हे जगीं कोणी मुकीयांचा जाण

सार्थक लाजून नव्हे हित

भारतातील अस्पृश्यांच्या अधिकारांचा कैवार घेण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या नियतकालिकाचा वापर केला. 'मूकनायक'च्या पहिल्या १२ अंकांचं संपादन त्यांनी स्वतः केलं आणि नंतर ही जबाबदारी पांडुरंग भाटकर यांच्यावर सोपवली, त्यांच्यानंतर ज्ञानेश्वर धृवनाथ घोलप यांनी संपादकीय कामाची जबाबदारी वाहिली. कालांतराने, उच्चशिक्षणासाठी  डॉ.बाबासाहेब आंबेडकर परदेशात गेले- परिणामी, त्यांची देशातील अनुपस्थिती, जाहिरातींचा अभाव आणि वर्गणीच्या रूपातही फारसा आधार न मिळणं, या कारणांमुळे १९२३ साली हे नियतकालिक बंद पडलं. आरंभीच्या वर्षांमध्ये राजर्षी शाहू महाराजांनी या नियतकालिकाला पाठिंबा दिला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचे अभ्यासक गंगाधर पानतावणे नोंदवतात त्यानुसार, "मूकनायक'ने अस्पृश्यांसाठी नवे विचारयुग निर्माण केले...अस्पृश्याना त्यांच्या अस्तित्वाची व भवितव्याची जाणीव करून देण्याचे साधन म्हणून काम केले."

                  'मूकनायक'चं कार्य संपुष्टात आल्यावर काही वर्षांनी, महाड चळवळीला गती प्राप्त झालेली असताना, ३ एप्रिल १९२७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 'बहिष्कृत भारत' या नियतकालिकाच्या रूपाने पुन्हा पत्रकारितेत मुसंडी मारली. त्रेचाळीस अंक प्रकाशित झाल्यावर 'बहिष्कृत भारत' हे पाक्षिक १५ नोव्हेंबर १९२९ रोजी बंद पडलं. यावेळीही आर्थिक अडचणींमुळेच नियतकालिक बंद करावं लागलं होतं. 'मूकनायक' व 'बहिष्कृत भारत' यांच्या प्रत्येक अंकाची किंमत फक्त दीड आणे इतकीच होती, आणि वार्षिक वर्गणी, टपालखर्चासह तीन रुपये होती. याच दरम्यान, १९२८ साली 'समता'चा उदय झाला आणि 'बहिष्कृत भारत'ला नवसंजीवनी मिळून २४ नोव्हेंबर १९३० रोजी 'जनता' या नावाने ते प्रकाशित होऊ लागलं. 'जनता' हे दलितांचं सर्वाधिक काळ चाललेलं दैनिक ठरलं. पंचवीस वर्षं सुरू राहिलेल्या 'जनता'चं नामकरण १९५६ साली 'प्रबुद्ध भारत' असं करण्यात आलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला प्राप्त झालेल्या गतीशी सुसंगत हा बदल होता. १९६१ सालपर्यंत हे प्रकाशन सुरू राहिलं. तर, एकंदरित मूळचं 'बहिष्कृत भारत' हे नियतकालिक नामबदलासह ३३ वर्षं सुरू राहिलं, असं म्हणता येईल. या अर्थाने ते दलितांचं सर्वाधिक काळ सुरू राहिलेलं स्वतंत्र प्रसारमाध्यम होतं.

                      या सर्व काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी चातुर्य दाखवत पुरोगामी सवर्ण पत्रकार व संपादकांचा वापर या कार्यामध्ये करून घेतला. त्यांनी सुरू केलेल्या अनेक नियतकालिकांचं संपादन वेळोवेळी ब्राह्मण संपादकांच्या हातात होतं. देवराव विष्णू नाईक ('समता' आणि 'ब्राह्मण-ब्राह्मणेतर' यांचे संपादक), भास्कर रघुनाथ काद्रेकर ('जनता') आणि गंगाधर निळकंठ सहस्रबुद्धे ('बहिष्कृत भारत' व 'जनता') ही त्यातील काही ठळक संपादकांची नावं. बापू चंद्रसेन (बी. सी.) कांबळे आणि यशवंत आंबेडकर यांच्यासारखे दलित नेते 'जनता'च्या संपादकीय भूमिकेला दिशा देत असत. परंतु, 'बहिष्कृत भारत'ला पुरेसे लेखक मिळत नव्हते, त्यामुळे २४ - २४ रकाने भरण्याची जबाबदारी एकट्या संपादकावर पडायची. 'प्रबुद्ध भारत' सुरू होतं तोवर त्याचं संपादन यशवंत आंबेडकर, मुकुंदराव आंबेडकर, दादासाहेब रुपवते, शंकरराव खरात आणि भास्करराव काद्रेकर यांनी केलं.

              

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes