संजय तोडकर (सांगली) - सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार मानव शंकर गवंडी टोळीस सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून २ वर्षे कालावधीकरीता हद्दपार आदेश पारीत केलेला आहे. गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडुन काढुन त्यांचे समुळ उच्चाटन व्हावे तसेच चालु गणपती उत्सव व आगामी सण उत्सव, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक सुरळीत व शांततेत पार पाडणे करिता सदरची हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे.
इस्लामपूर पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये यातील हद्दपार टोळी प्रमुख मानव शंकर गवंडी, वय २४ वर्षे, आंबेडकर नाका, इस्लामपूर, ओमप्रकाश मुक्ताजी बोमशेटे, वय २१ वर्षे, रा. खांबे मळा, इस्लामपूर, विनोद ऊर्फ बाल्या रामचंद्र माने, वय - २२ वर्षे, रा. वडार गल्ली, इस्लामपूर, श्रीयुग ज्ञानदेव ताटे, वय - २० वर्षे, रा. आंबेडकर नाका, इस्लामपूर, रोशन रमेश रजपुत, वय - २० वर्षे, रा. केएनपी नगर, इस्लामपूर या टोळीविरुद्ध सन २०२२ ते २०२५ या कालावधीत गैरकायद्याची मंडळी जमवुन घातक हत्याराने इच्छापूर्वक दुखापत पोहचवणे, शिविगाळी दमदाटी करुन जिवे ठार मारण्याची धमकी देणे असे शरिराविरुद्धचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. नमुद सामनेवाले हे कायद्याला न जुमानणारे आहेत. त्यामुळे या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये प्रभारी अधिकारी, इस्लामपूर पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक, सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी प्रस्तावाचे अवलोकन करुन मंगेश चव्हाण, चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, इस्लामपूर उपविभाग, इस्लामपूर यांचेकडे चौकशी कामी पाठविला. त्यांनी प्रस्तावाची चौकशी करून पाठविलेला अहवाल, टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयांचा व सद्यस्थितीचा अहवाल, त्यांचेवरील प्रतिबंधक कारवाई, प्रस्तावाचे सुनावणी दरम्यान दाखल गुन्हा तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन, पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सलग सुनावणी घेऊन, नैसर्गिक न्यायतत्वांचा व्यापक विचार करुन इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतील टोळी प्रमुख मानव शंकर गवंडी, वय २४ वर्षे, रा. आंबेडकर नाका, इस्लामपूर, ओमप्रकाश मुक्ताजी बोमशेटे, वय २१ वर्षे, रा. खांबे मळा, इस्लामपूर, विनोद ऊर्फ बाल्या रामचंद्र माने, वय -२२ वर्षे, वडार गल्ली, इस्लामपूर, श्रीयुग ज्ञानदेव ताटे, वय - २० वर्षे, रा. आंबेडकर नाका, इस्लामपूर, रोशन रमेश रजपुत, वय - २० वर्षे, रा. केएनपी नगर, इस्लामपूर यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ मधील तरतुदीनूसार सांगली, सातारा व कोल्हापूर या ३ जिल्हयातुन २ वर्षे कालावधीकरीता तडीपारी आदेश पारीत केलेला आहे.
चालु गणेशोत्सव व इतर सण उत्सव तसेच स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीच्या काळात टोळीने गुन्हे करणा-या टोळ्यांवर बारकाईने नजर ठेवुन त्या नेस्तनाबुत करण्यासाठी यापुढेही कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सदर कारवाईमध्ये संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली, कल्पना बारवकर अपर पोलीस अधीक्षक, सांगली यांचे मार्गदर्शनाखाली सतीश शिंदे, पोलीस निरीक्षक, स्था. गु. अ. शाखा, सांगली, संजय हारुगडे, पोलीस निरीक्षक, इस्लामपूर पो. ठाणे, जयदिप कळेकर, सहा. पोलीस निरीक्षक, पोहेकॉ / बसवराज शिरगुप्पी, पोकॉ/दिपक गट्टे, स्था. गु. अ. शाखा, सांगली, तसेच पोहेकॉ / राजराम हांडे, पोहेकॉ / अरुण कानडे, इस्लामपूर पोलीस ठाणे यांनी भाग घेतला.