सुशांत पोवार (कोल्हापूर) - डॉक्टरकीची बाेगस डिग्री मिळवायची अन् गावात दवाखाना थाटून भोळ्याभाबड्या जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांची लूट करण्याचा प्रकार सुरू आहे. बोगस डॉक्टरांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियंत्रण समितीचे या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. निर्भीड पोलीस टाइम्सचे संपादक सुशांत पोवार यांनी कोल्हापुरातील एका तालुक्यातील गुंगा नामक बोगस डॉक्टर प्रकरणी २०२१ रोजी तोंडी तक्रार केली होती पण चार वर्षात तालुका आरोग्य अधिकारी यांचेकडून ना कारवाईचा पत्ता ना बोगसगिरीचा पर्दाफाश त्यामुळे बोगस डॉक्टर समिती नावालाच उरली आहे असे जनतेतून सूर उमटत आहे.
अज्ञानाअभावी जनताही बाेगस डॉक्टरांनाच देव मानून त्यांच्याकडेच इलाज करते. शेवटी ‘आमच्याकडून जमू शकत नाही तुम्ही आता मोठ्या डॉक्टरांकडे जा’, असे सांगितले जाते. तेव्हा रुग्ण मानसिक आर्थिकरीत्या खचलेला असतो. अनेकदा गावात बोगस डॉक्टरांची माहिती प्रशासनाला दिल्या जाते. मात्र, त्यावर काहीही कारवाई होताना दिसत नाही. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणीकृत असलेल्या अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी या चारच वैद्यकशास्त्रांची अधिकृत पदवी घेणाऱ्यांना वैद्यकीय व्यवसाय करण्यास परवानगी मिळाली आहे. नव्यानेच यात फिजिओथेरपीचा समावेश केला आहे, तर आणखी काही वैद्यकशास्त्रांचा समावेश यात करण्याचे विचाराधीन आहे. मात्र, अद्याप त्यास शासनाने हिरवी झेंडी दिलेली नाही. याचाच फायदा घेत मुंबई, पुण्याची डिग्री किंवा पदवी मिळवून सर्रास काही डॉक्टरांनी अॅलोपॅथीचा व्यवसाय ग्रामीण भागात सुरू केला आहे. बोगस डॉक्टरावर वॉच ठेवण्याची जबाबदारी असलेल्या तालुका नियंत्रण समित्यांना आपल्या जबाबदारीचा विसर पडलेला दिसून येतो.
गावातीलच नव्हे, तर तालुक्यातील प्रत्येक बोगस डॉक्टरची माहिती तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे असते. मात्र, नोकरी करावी लागते म्हणून कुणी कारवाई तर सोडा, पण साधी माहितीही जिल्हा प्रशासनाला देत नाही. कारवाई करताना राजकीय दबाव येत असल्याची प्रतिक्रिया एका तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली. काहीठिकाणी बीएएमएस डॉक्टरांनी दवाखाने थाटले आहेत. हे डॉक्टर रुग्णसेवा करीत आहेत यात कोणतीही शंका नाही. पण यांनाही काही मर्यादा आहेतच. असे असतानाही एकाच ठिकाणी बालरोग, स्त्रीरोग, कान, नाक, घसा तज्ज्ञ अशा भल्या मोठ्या पाट्या लावून विविध प्रकारच्या सेवा देण्याच्या नावावर डॉक्टर एक तज्ज्ञ अनेक दिसत आहेत.