"गडचिरोलीत धडक प्रशासन... आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात मात्र निष्काळजीपणाचा कहर; रुग्णांच्या जीवाची जबाबदारी नेमकी कोणाची ?"
schedule11 Jul 26
person by
visibility 35
categoryसंपादकीय
सुशांत पोवार (संपादकीय) - गडचिरोलीच्या दुर्गम भागात आयुक्त संजय काटकर यांनी अचानक दौरा केला, प्राथमिक आरोग्य केंद्रांची पाहणी केली, आशा स्वयंसेविकांशी संवाद साधला, प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला आणि शासन स्तरावर निर्णयांची ग्वाही दिली. हीच खरी प्रशासनाची ओळख आहे. पण याच महाराष्ट्रात एक प्रश्न अस्वस्थ करतो कोल्हापूर जिल्ह्यात अशी धडक तपासणी आणि उत्तरदायित्वाची संस्कृती नेमकी का दिसत नाही ? आरोग्य व्यवस्था ही केवळ बैठका, अहवाल आणि आकडेवारीवर चालत नाही, ती रुग्णांच्या विश्वासावर उभी असते. तो विश्वास ढासळला तर संपूर्ण व्यवस्था संशयाच्या भोवऱ्यात अडकते.
कोल्हापूर जिल्हा परिषदेत Sterile Gloves च्या बॉक्समध्ये Non-Sterile Gloves आल्याची बाब समोर येते. जर ही बाब चौकशी समिती नेमली आहे त्यामध्ये समोर येईलचं तरी प्रश्न फक्त एका बॉक्सचा नाही हजारो रुग्णांच्या सुरक्षिततेचा आहे. असा गंभीर प्रकार घडत असताना तो औषध निर्माण अधिकाऱ्यांच्या, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास कसा आला नाही ? की आला आणि त्यावर वेळेत प्रभावी कारवाई झाली नाही ? हा प्रश्न जनतेला पडणे स्वाभाविक आहे.
एकीकडे गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त आणि दुर्गम जिल्ह्यात आयुक्त स्वतः पोहोचून आरोग्य यंत्रणा तपासत आहेत तर दुसरीकडे कोल्हापूरसारख्या प्रगत जिल्ह्यात जर अशा स्वरूपाच्या तक्रारींवर कठोर आणि पारदर्शक कार्यवाही दिसत नसेल, तर ही बाब प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. रुग्णाच्या उपचारासाठी Sterile Gloves लागतात की Non-Sterile, हा फक्त तांत्रिक फरक नाही तो संसर्ग, उपचार आणि जीविताशी संबंधित प्रश्न आहे. अशा घटनांकडे किरकोळ त्रुटी म्हणून पाहता येणार नाही.
आज आवश्यकता आहे ती दोषारोपांची नव्हे, तर सत्य समोर आणणाऱ्या निष्पक्ष चौकशीची. दोषी कोणीही असो, त्याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. कारण आरोग्य व्यवस्थेत निष्काळजीपणाची किंमत एखाद्या निरपराध रुग्णाला जीव देऊन चुकवावी लागू शकते. गडचिरोलीच्या दौऱ्याने प्रशासनाला एक संदेश दिला आहे कार्यालयात बसून आरोग्य व्यवस्था सुधारत नाही ती रुग्णालयाच्या दारात जाऊन, स्टोअरमध्ये उतरून आणि प्रत्यक्ष तपासणी करून सुधारते.
आता प्रश्न फक्त एवढाच आहे
गडचिरोलीत जर उत्तरदायित्व जागं होऊ शकतं, तर कोल्हापूरमध्ये ते कधी जागं होणार ? रुग्णांच्या जीवाशी संबंधित प्रश्नांवर मौन का ? आणि आरोग्य व्यवस्थेतील प्रत्येक संशयास्पद बाबीची सखोल चौकशी होईपर्यंत जबाबदारी कोण स्वीकारणार ? जनतेला आश्वासने नकोत सुरक्षित आरोग्य सेवा, पारदर्शक कारभार आणि जबाबदारी निश्चित करणारी कृती हवी आहे. कारण आरोग्य व्यवस्थेतील प्रत्येक दुर्लक्ष हे केवळ प्रशासकीय चूक नसते ते जनतेच्या विश्वासावर घाव असतो.