नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे समीर भुजबळ आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते यांच्यात हाणामारी, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
schedule20 Nov 24 person by visibility 97 categoryराजकीय घडामोडी
वृत्तसंस्था - राज्यात आज सकाळपासून उत्साहात मतदान सुरू झाले आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यात मतदान सुरू असतांना चांगलाच राडा झाल्याचं पाहायला मिळालं. मतदान केंद्रांवर मतदारांना आणण्याच्या कारणावरून समीर भुजबळ व शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास कांदे याचे कार्यकर्ते भिडले. यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांना तूफान हाणामारी केली. त्यामुळे येथील वातावरण हे तणावपूर्ण झालं आहे. पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे.
आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली. तेव्हा समीर शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांचे कार्यकर्ते मतदारांना मतदान केंद्रांवर मतदानासाठी नेत होते. दरम्यान, याची माहिती समीर भुजबळ यांना मिळाली. ते कार्यकर्त्यांसह नांदगाव येथे गेले. यावेळी, नांदगाव-मनमाड मार्गावर दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले. समीर भुजबळ यांनी कांदे यांच्या कार्यकर्त्यांना रासतात अडवल्याने जोरदार राडा झाला. दोन्ही गटात हाणामारी सुरू झाली.
या घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. मात्र, गावात तणावपूर्ण शांतता आहे. दोघांनीही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी कॉलेजवर ऊसतोड कामगारांना डांबून ठेवल्याचा आरोप समीर भुजबळ यांनी केला आहे. यामुळे समीर भुजबळ यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह थेट कॉलेजवर जात धाड टाकली. यावेळी हा प्रकार उघडकीस आला.