२८ डिसेंबर २०२५ ते ३ जानेवारी २०२६ चे साप्ताहिक राशिभविष्य
schedule02 Jan 26
person by
visibility 30
categoryराशिभविष्य
मेष - २८ तारखेचा संपूर्ण दिवस चांगला कसा जाईल ते पाहा. कारण या दिवशी चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. त्यामुळे या दिवशी निर्णय घेऊ नका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल तेव्हा तुम्ही तुमचे मत मांडू शकता व निर्णयही घेऊ शकता. चांगल्या कालावधीमध्ये घेतलेले निर्णय यशस्वी होतात हे मात्र विसरू नका. त्यामुळे घाई न करता विचारपूर्वक काम करा. चांगले काम करण्यासाठी उशीर झाला तरी चालेल. पण थोडा धीर धरा. व्यवसायात भागीदारी करावयास हरकत नाही. मात्र नियम पाळा. नोकरदार वर्गाला ज्या तांत्रिक अडचणी वारंवार येत होत्या त्या दूर होतील. खर्च कमी करा. शेजाऱ्यांना मदत कराल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. धार्मिक गोष्टींत सहभाग राहील. प्रकृती साथ देईल.
वृषभ - दिनांक २९, ३० हे दोन दिवस फारसे शुभ नाहीत. त्यामुळे या दोन दिवसांत बोलताना तोंडावर ताबा ठेवा. कोणतेही काम करताना काळजी घ्यावी लागेल. ज्या कामाला कमी वेळ लागणार आहे असे वाटत असते त्याच कामाला नेमका उशीर होईल. त्यामुळे तुमचे काम वेळेत होणार नाही. काम वेळेत न झाल्यामुळे कामाचा व्याप वाढेल. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी नियोजनाला महत्त्व द्या म्हणजे काम फसणार नाही. बाकी दिवस चांगले असतील. चांगल्या दिवसांमध्ये चांगल्या गोष्टींची सुरुवात होईल. व्यवसायात अपेक्षित लाभ होईल. सध्या नोकरदार वर्गाचे कामात मन लागणार नाही. खर्च कमी करा. समाजमाध्यमांचा वापर जेवढयास तेवढा करा. संततिसौख्य लाभेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. कुटुंबाची काळजी घ्याल. शारीरिक-मानसिक स्वास्थ्य जपा.
मिथुन - ३१ डिसेंबर २०२५ रोजी व १ जानेवारी २०२६ रोजी असे हे दोन दिवस तारेवरची कसरत करायला लावणारे आहेत. त्यामुळे या दोन दिवसांत कोणावर अवलंबून राहून काम होणार नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे काम वेळेत आणि लवकर कसे पूर्ण होईल यासाठी प्रयत्न वाढवा. नेहमी सकारात्मक गोष्टींचा विचार करा. इतरांशी बोलताना शब्द जपून वापरा म्हणजे त्रास होणार नाही. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. चांगल्या कालावधीमध्ये घेतलेले निर्णय योग्य असतील. व्यावसायिकदृष्टया सक्षम बनाल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक व्यवहार जपून करा. समाजसेवा करण्याचे पुण्य पदरी पडेल. कुटुंबातील हेवेदावे दूर होतील. मानसिक ताण-तणाव घेऊ नका. आरोग्याची काळजी घ्या.
कर्क - २ तारखेला दुपारनंतर व ३ तारखेचा संपूर्ण दिवस असे हे दीड दिवस कसरतीचे आहेत. या दिवसांत कोणतेही काम करताना विचार करावा लागेल. प्रत्येक गोष्टीत आपलेच खरे करून चालणार नाही. इतरांचीही मते ऐकून घ्यावी लागतील. त्यावर विचार करून निर्णय द्यावा लागेल. आपले मत इतरांनी ऐकून घ्यावे असे वाटत असेल तर आपला मुद्दा शांतपणे मांडणे हेच योग्य राहील. बाकी दिवस चांगले असतील. चांगल्या दिवसांमध्ये कार्य सफल होईल. व्यवसायात खरेदी-विक्री व्यवहार मोठया प्रमाणात होतील. नोकरदार वर्गाचे काम सुरूच चालू राहील. आर्थिक प्रश्न मिटेल. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा होईल. मित्र-मैत्रिणींशी सलोखा वाढेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घ्या. योग साधनेला महत्त्व द्या.
सिंह - दिनांक २८ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी चांगला राहील. चांगल्या दिवसांमध्ये फार संघर्ष करावा लागत नाही. कमी वेळेत काम पूर्ण होत राहते. ज्या ठिकाणी आपल्याला इतरांच्या मदतीची अपेक्षा असते. अशा ठिकाणी ती मदत ही लवकर मिळते, त्यामुळे काम करायला त्रास होत नाही. उलट कामातील उत्साह चांगला वाढतो. हीच ती संधी आहे. या संधीचा विनियोग करून घ्या. आळस बाजूला सारा व आपले काम आधी पूर्ण करून घ्या. व्यवसायात लाभ होईल. नोकरदार वर्गाच्या कामकाजात पारदर्शकता येईल. आर्थिक परिस्थितीत चांगले बदल होतील. राजकीय क्षेत्रात वर्चस्व राहील. मित्र-मैत्रिणींशी मनोरंजन होईल. घरगुती वातावरण आनंदी राहील. आरोग्य साथ देईल.
कन्या - दिनांक २९, ३० हे संपूर्ण दोन दिवस व १ तारखेला दुपापर्यंत असे हे अडीच दिवस अनुकूल नाहीत. त्यामुळे या दिवसांत एक घाव दोन तुकडे करायला जाल तर त्याचा त्रास तुम्हालाच होईल. म्हणून कोणतेही निर्णय घेताना घाई करायची नाही. धीर धरून काम करायचे एवढे मात्र लक्षात ठेवा. कामाचा व्याप वाढला की त्रास होतो, त्यामुळे कामाच्या बाबतीत पक्के नियोजन करा म्हणजे काम वेळेत पूर्ण होईल. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. चांगल्या दिवसात कामातील उत्साह चांगला वाढेल. व्यवसायातील आवक वाढेल. नोकरदार वर्गाला नवीन कामाची जबाबदारी वाढेल. आर्थिक व्यवहार जपून करा. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. नातेवाईकांच्या सुखदु:खात सहभागी व्हाल. भावंडांशी संवाद साधाल. आहार सांभाळा.
तूळ - षष्ठ स्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. ज्या वेळी सप्ताहामध्ये असे भ्रमण असते त्या वेळी नेमक्या विरोधी घटना घडायला लागतात. याचा त्रास सहन होत नाही. मग उलट प्रतिक्रिया दिल्या जातात आणि गोष्टी अंगलट येतात. त्यापेक्षा काम उशीर होणार आहे हे गृहीत धरून चला म्हणजे त्रास होणार नाही. प्रत्येक गोष्टीत संयम ठेवा, म्हणजे नुकसान होणार नाही. कोणी काय करावे काय करू नये यासाठी कोणाला सल्ला देत बसू नका. आपल्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींत लक्ष घालू नका. व्यवसायात गुंतवणूक करू नका. नोकरदार वर्गाने कामाकडे लक्ष देणे हिताचे राहील. आर्थिकदृष्टया कोणतीही व्यवहार करताना भान ठेवा. राजकीय क्षेत्रात हस्तक्षेप करणे टाळा. घरगुती वातावरण चांगले कसे राहील ते पाहा. मानसिक- शारीरिक स्वास्थ्य जपा.
वृश्चिक - दिनांक २९, ३० डिसेंबर २, ३ जानेवारी असा हा चार दिवसांचा कालावधी चढउतारांचा असणार आहे. त्यामुळे या कालावधीत तुमच्या तोंडावरचा ताबा सुटणार नाही याची काळजी घ्या. कारण असे वातावरण असले की तुम्हाला मागील गोष्टी उकरून काढायचा फार जोर येतो आणि तुम्ही स्वत:च त्रास करून घेता. तेव्हा असे काहीही न करता शांत राहून आपले काम करून घ्या. इतरांनी विषय काढला तरीसुद्धा विचार करून बोला, म्हणजे तुम्हाला स्वत:ला त्रास होणार नाही. एखादे काम कमी करा, पण कोणतीही घाई करू नका. बाकी दिवस ठीक राहतील. व्यवसायात गुंतवणूक करणे टाळा. नोकरदार वर्गाने वरिष्ठांच्या आदेशानुसार कामाचे नियोजन करावे. आर्थिक व्यवहार करताना ते फसणार नाहीत ना याची काळजी घ्या. कुटुंबाशी एकनिष्ठ राहा. आरोग्याची काळजी घ्या.
धनू - दिनांक ३१ डिसेंबर, १ व २ जानेवारी असे तीन दिवस अनुकूल नाहीत. या दिवसांत तुमचे विचार करण्याची पद्धत बदलावी लागेल. या दिवसांत तुम्ही जे म्हणाल ते पूर्व दिशा असे होणार नाही. या गोष्टीचा तुम्हाला राग येईल. प्रत्येक वेळी तुम्ही म्हणाल तीच पूर्व दिशा होत असते. सध्या मात्र तसे होणार नाही. रागावर नियंत्रण ठेवायला शिका. वादविवाद टाळा. इतरांचा आदर करायला शिका. बाकी दिवस चांगले असतील. चांगल्या दिवसांमध्ये काम पूर्ण कसे होईल. यासाठी प्रयत्न वाढवावे लागतील. व्यवसायात भागीदारी करार करताना विचार करा. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. आर्थिक काटकसर करणे योग्य राहील. समाजसेवेची आवड निर्माण होईल. मुलांचे कोडकौतुक कराल. आहाराचे पथ्य-पाणी सांभाळा.
मकर - दिनांक २ व ३ जानेवारी असे हे दोन दिवस शुभ नाहीत. या दिवसांत कोणतेही धाडस करणे त्रासाचे राहील. म्हणजे ज्या गोष्टींची सध्या आवश्यकता नाही अशा गोष्टींना प्राधान्य देऊ नका. जी जबाबदारी आपल्याला झेपणार नाही अशी जबाबदारी घेऊ नका. बोलताना तोंडावर ताबा ठेवा. काही गोष्टींची अडचण जरी वाटली तरी त्यासाठी पर्यायी मार्ग मिळेल. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. चांगल्या कालावधीमध्ये सकारात्मक गोष्टी घडतील. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न चांगले असेल. नोकरदार वर्गाला कामाच्या संदर्भात कुठे ना कुठेतरी मनामध्ये एक खंत वाटत होती ती खंत सध्या वाटणार नाही. आर्थिक बाबतीत परिस्थिती उत्तम असेल. मुलांचे कोडकौतुक कराल. घरगुती वातावरण चांगले राहील. उपासना फलद्रूप होईल. आरोग्य चांगले राहील.
कुंभ - सध्या ग्रहमानाची साथ उत्तम आहे. जे काम हाती घ्याल ते पूर्णत्वाला न्याल. धाडसी निर्णय घ्याल आणि ते यशस्वी होतील. आपल्या कामासाठी इतरांची मदत घ्यायची नाही, हे मात्र तुम्ही तुमच्या मनाशी ठाम ठरवून ठेवाल, याप्रमाणेच काम कराल. कामाला यश मिळेल. प्रत्येक गोष्टीत आपले तेच खरे करण्याची वेळ आली आहे असेच तुम्हाला वाटेल. तुमचे मत इतरांना पटणारे असेल. इतरांनी काहीही सल्ला देऊ दे, तुम्हाला जे पटणार आहे तेच तुम्ही कराल. व्यवसायात गुंतवणूक चांगल्या प्रकारे कराल. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत अडथळे जाणवणार नाहीत. आर्थिक ताणतणाव कमी होईल. राजकीय क्षेत्रात तुमचे नेतृत्व खंबीर राहील. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. भावंडांना मदत कराल. धार्मिक कार्याची आवड राहील. प्रकृती उत्तम राहील.
मीन - या आठवडयात सर्व दिवस चांगले आहेत, चिंता करण्याची गरज नाही. काही गोष्टींमध्ये प्रयत्न करूनही म्हणावे असे यश येत नव्हते. सध्या तुमच्या या प्रयत्नांना यश मिळणार आहे. तुम्ही उद्दिष्ट ठरवले आहे ते गाठाल. त्याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसून येईल. मागील अनुभव तुम्ही विसरला नाहीत त्यामुळे कामाला गती आली. निर्णय घेताना मनामध्ये जी द्विधा अवस्था निर्माण होत होती ती आता होणार नाही. व्यवसायात नुकसान होणार नाही. फायदा कसा होईल याकडे मात्र तुमचे चांगले लक्ष राहील. नोकरदार वर्गाचे कामकाज सुरळीत चालू राहील. आर्थिक लाभ होईल. समाजमाध्यमांद्वारे प्रसिद्धी मिळेल. नातेवाईकांशी असलेले मतभेद दूर होतील. जोडीदाराच्या सल्ल्याने पुढे जाल. मानसिक समाधान लाभेल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील.