सावधान ! तापाची गोळीच ‘ताप’ वाढवणारी ठरली ? बीपीची गोळीही चाचणीत नापास, FDA कडून संशयित साठा जप्त
schedule24 Sep 26
person by
visibility 70
categoryमहाराष्ट्रक्राइम न्यूजआरोग्य विभाग
नागपूर विशेष प्रतिनिधी - नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) आणि इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय (मेयो) येथे उपचारासाठी येणाऱ्या हजारो रुग्णांच्या औषधपुरवठ्याबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) तपासणीत तापासाठी वापरली जाणारी पॅरासिटामॉल ५०० एमजी आणि उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी वापरली जाणारी टेल्मिसार्टन ४० एमजी या औषधांच्या संबंधित बॅचेस गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरल्याची माहिती समोर आली आहे. इंदूरमधील औषध उत्पादक कंपनीकडून पुरवठा झालेल्या या औषधांच्या नमुन्यांमध्ये गंभीर गुणवत्ताविषयक त्रुटी आढळल्याचे सांगण्यात येत आहे. विशेषतः औषध शरीरात अपेक्षित पद्धतीने विरघळण्याची क्षमता तपासणाऱ्या चाचणीत संबंधित नमुने अपयशी ठरल्याने औषधांच्या परिणामकारकतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
FDA च्या तपासणीत पॅरासिटामॉल ५०० एमजीच्या PTTC - 108 या बॅचमधील तब्बल १ लाख २५ हजार गोळ्या निकषांनुसार नसल्याचे आढळल्याची माहिती आहे. त्यानंतर संबंधित साठा मागे घेण्याचे निर्देश देण्यात आले. ताप कमी करण्यासाठी सर्वसामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या औषधाच्या इतक्या मोठ्या साठ्यावर कारवाई झाल्याने सरकारी रुग्णालयांमध्ये वितरित होणाऱ्या औषधांची गुणवत्ता तपासणी नेमकी किती प्रभावी आहे, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
दुसरीकडे, उच्च रक्तदाबासाठी वापरल्या जाणाऱ्या टेल्मिसार्टन ४० एमजीच्या CHPLT 416 या बॅचमध्ये गोळ्यांवर डाग आढळल्याचे तपासणीत नमूद करण्यात आले आहे. याशिवाय संबंधित नमुने औषधाच्या विरघळण्याच्या चाचणीतही अपयशी ठरल्याची माहिती आहे. एकीकडे तापासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाचा साठा गुणवत्तेच्या चाचणीत अडखळतो आणि दुसरीकडे बीपी नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाच्या बॅचवरही प्रश्नचिन्ह निर्माण होते यामुळे सरकारी रुग्णालयातील औषधपुरवठ्याच्या संपूर्ण साखळीची तपासणी करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
FDA ने संबंधित बॅचचे वाटप थांबवून साठा जप्त करण्याची कारवाई केली असली, तरी या घटनेने काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत. औषध उत्पादकाकडून निघालेला साठा शासकीय रुग्णालयापर्यंत पोहोचेपर्यंत कोणकोणत्या स्तरावर त्याची गुणवत्ता तपासली गेली ? संबंधित बॅच रुग्णालयाच्या औषध भांडारात दाखल होण्यापूर्वी गुणवत्ता नियंत्रणाची प्रक्रिया झाली होती का ? आणि झाली असेल तर निकृष्ट ठरलेला साठा पुढे कसा आला ? हे प्रश्न आता केवळ औषधाच्या गुणवत्तेपुरते मर्यादित राहिलेले नाहीत तर शासकीय औषध खरेदी, पुरवठा, साठवणूक आणि वितरण व्यवस्थेच्या कार्यक्षमतेशी जोडले गेले आहेत.
GMC आणि मेयोसारख्या शासकीय रुग्णालयांवर उपचारासाठी मोठ्या प्रमाणात सामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्ण अवलंबून असतात. त्यामुळे अशा ठिकाणी वितरित होणाऱ्या प्रत्येक औषधाच्या गुणवत्तेबाबत काटेकोरपणा अपेक्षित आहे. FDA च्या कारवाईमुळे संबंधित साठा रोखण्यात आला असला, तरी या औषधांचा साठा कोणत्या रुग्णालयात, किती प्रमाणात पोहोचला आणि त्यापैकी किती औषधांचे वितरण झाले, याची संपूर्ण माहिती सार्वजनिक करणे आवश्यक ठरते. औषध म्हणजे रुग्णासाठी उपचाराची आशा. त्या औषधाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले तर उपचार व्यवस्थेवरील विश्वासाला तडा जाण्याची शक्यता असते. त्यामुळे या प्रकरणात केवळ साठा जप्त करून विषय संपवण्याऐवजी संपूर्ण पुरवठा साखळीची वस्तुनिष्ठ चौकशी आणि जबाबदारी निश्चित करण्याची गरज निर्माण झाली आहे. तापाची गोळी ताप कमी करण्यासाठी, बीपीची गोळी रक्तदाब नियंत्रणासाठी पण औषधच गुणवत्तेच्या चाचणीत अपयशी ठरत असेल, तर सरकारी आरोग्य व्यवस्थेच्या ‘गुणवत्ता तपासणी’ची गोळी नेमकी कुठे अडकली आहे, हा सवाल आता अनुत्तरित राहता कामा नये.