सुशांत पोवार (संपादकीय) - कोल्हापूर जिल्ह्यात एकूण दहा जागा, जिल्ह्याचे बोलायचे तर काहीजण प्रत्यक्ष उमेदवार तर काहीजण उमेदवार उभा करणारे नेते, पण प्रतिष्ठा यांचीच पणाला लागली आहे. धनंजय महाडिक, सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ असे येथील नेत्यांचे कॉम्बिनेषण. कालपर्यंत जिल्ह्याच्या राजकारणात सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ असणारी जोडी मुश्रीफ महाडिक अशी झाली आहे. सतेज पाटील यांची भूमिका या जिल्ह्यात मुख्य सेनापतीची झाली आहे, पण प्रत्येक परगण्यात एकेकजण लढतोय. म्हणायला कोण ठाकरे यांच्या कडून आहे तर कोण पवारांकडून, पण प्रत्येक ठिकाणी सतेज पाटील यांचा कमी अधिक प्रभाव आहे. त्यात काही दिवसांपूर्वी उत्तर मध्ये झालेल्या राड्यामुळे कधी नव्हे ते सतेज पाटील यांच्या मागे सहानभूती निर्माण झाली. दुसरीकडे महायुतीने दिलेले उमेदवारसुद्धा कमी नाहीत. महायुतीचा प्रत्येक सेनापती लोडवाला आहे. प्रत्येकाकडे यंत्रणा आहे. प्रत्येकाकडे निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे. त्यामुळे येथे कोणाची यंत्रणा कशी लागते ? यावर बरीच गणिते ठरताना दिसत आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचे एकूण चित्र काय आहे ? इथले वातावरण काय आहे ? हे संपादकीय मधून आज मांडत आहे........
कोल्हापुरात एकूण दहा मतदारसंघ, महाविकास आघाडीच्या बाजूने ४ जागा कॉंग्रेस लढत आहे. ३ जागा शरद पवार गट लढत आहे तर २ जागा उद्धव ठाकरे गट लढत आहे. महायुतीच्या बाजूने कोल्हापुरातील १० जागापैंकी २ जागा भाजपा लढत आहे, ३ जागा एकनाथ शिंदेंची शिवसेना लढत आहे, २ जागा अजितदादा पवार गट, २ जागा जनसुराज्य गट तर महायुती पुरस्कृत असणारे यड्रावकर मैदानात आहेत. सर्वाधिक जागा लढत आहे ती म्हणजे कॉंग्रेस, सोबत कागल वगळता पवार आणि ठाकरेंना आपला आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी सतेज पाटील यांची आवशक्यता महत्वाची ठरते. साहजिकच सतेज पाटील चर्चेत आलेत.
कोल्हापूर शहरात कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर असे दोन मतदारसंघ, दक्षिणेत सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील आणि महाडिक गटाचे अमल महाडिक असा सामना, तर उत्तरेत अपक्ष राजू लाटकर विरुद्ध शिवसेनेचे राजेश क्षीरसागर असा सामना. करवीरचा भाग देखील कमी अधिक प्रमाणात कोल्हापूर शहराच्या प्रभावतील आहे. येथे शिवसेनेचे चंद्रदीप नरके विरुद्ध कॉंग्रेसचे राहुल पाटील असा सामना. आता एक अपक्ष आणि दोन कॉंग्रेसच्या उमेदवाराचा पूर्ण जोर सतेज पाटील यांच्या जीवावर, दुसरीकडे नरके, क्षीरसागर आणि महाडिक यांची स्वतंत्र यंत्रणा भेदणेदेखील शक्य वाटते तितके सोपे नाही. तिथले संस्थात्मक राजकारण, पूर्वापारचे गटतट आणि वारे यावर बरीच गणिते ठरताना दिसत आहेत. त्यातच आता कॉंग्रेस आणि महाविकासची जमेची बाजू दिसत आहे अंतर्गत काटछाटी पासून महाविकास आघाडी दूर आहे. पण महायुतीत ते कॉम्बिनेषण नाही. क्षीरसागर हरले तर उत्तर मोकळा होईल असे महाडिक यांना वाटत असावे ? नरके, क्षीरसागर जोडगोळी बसली तर कोल्हापुरात क्षीरसागर यांचा प्रभाव वाढेल, पर्यायाने भाजप बॅकफुटला येईल अशी गणिते शहरात महायुतीला फटका देणारी ठरू शकतात.
शहरानंतर आता एकएक भाग पाहायला बघूया, कागल, चंदगड आणि राधानगरी. कागलचा सामना हायव्होल्टेज, गटातटाचे राजकारण, मंडलिक गट मुश्रीफ साहेबांच्या सोबत कि विरोधात हे कन्फ्युजन शेवट पर्यंत राहणारे, घाटगे लोड देत आहेत पण गावागावात यंत्रणा उभी करताना मुश्रीफ यांच्या समोर पिछाडी घेत आहेत. मुश्रीफ यांना जिंकण्याचा अनुभव आहे. इलेक्शन काढायचा अनुभव आहे पण घाटगे यांनी जागा रेसमध्ये आणली, टक्करमध्ये आणली आहे.
चंदगडमध्ये चौरंगी सामना झाला आहे. प्रत्येक उमेदवाराचे ५० हजारांचे पॉकेट आहे. आता अंतिम क्षणी कोणाएकाने आपले मतदान दुसरीकडे फिरवले तर वनसाइड चे गणित फिक्स आहे. असे झाले तर तुतारी किंवा अपक्ष हे जास्त इथे दिसत आहेत. राधानगरीत अबिटकरांनी आपली पॉवर वाढवली असे म्हणत आहेत, पण आदमापुरात ठाकरेंनी जी सभा घेतली ती जिवंत होती. इथे मराठा पाटलांची मते मोठी आहेत. तालुक्यातील देसाई गट सतेज पाटील यांच्या सोबत आला आहे. पवारांच्या सभेनंतर इथले गणित अजून पुढे जातेय.
कोल्हापूरच्या दुसऱ्या बाजूचे शाहुवाडी, हातकणंगले हे दोन मतदारसंघ, या दोन्ही जागा महायुतीकडून जनसुराज्य लढत आहे. शाहुवाडीत कोरेंचे पारडं जड असते, पण सत्यजित पाटील सरुडकर हे टफ फाईट देताना दिसत आहेत. सतेज पाटील यांनी ठरवलेच असेल तर करणसिंग गायकवाड, अमर पाटील अशा गोकुळच्या संचालकांना कार्यक्रम करायला सांगितले जाईल, त्यातही इथे लिंगायत मराठा राजकारण झालेच तर कोरेंना लोड जाऊ शकतो. इथे कोरेंची पॉवर पहिल्यापासून असली तरीही मराठा राजकारण मोठे होण्याची रिस्क लिंगायत समाजातून येणाऱ्या कोरेंना आहेच. हातकणंगलेत अशोक माने आणि राजूबाबा आवळे असा सामना, राजूबाबा म्हणजे सतेज पाटीलांचे एकनिष्ठ. अशोक मानेंचे वय आणि राजू बाबांचा नसणारा न्युसेंस या दोन गोष्टी येथे राजू बाबांच्या पथ्यावर पडताना दिसत आहेत.
आता राहिले ते शिरोळ आणि इचलकरंजी हे दोन मतदारसंघ, शिरोळची लढाई महायुतीचे अपक्ष यड्रावकर कॉंग्रेसचे गणपत पाटील आणि स्वाभिमानीचे उल्हास पाटील अशी झाली आहे. इथे जातीची गणितेपण इंटरेस्टिंग. यड्रावकर जैन समाजाचे, गणपत पाटील लिंगायत तर उल्हास पाटील मराठा पण उल्हास पाटील ज्या स्वाभिमानीकडून मैदानात आहेत ते राजू शेट्टी जैन. राजू शेट्टी आणि मराठा हे गणित बसणे अवघड, अशावेळी हा मराठा सा.रे.पाटील यांच्या घराण्याकडे शिफ्ट होण्याचे जास्त शक्यता, अर्थात जात समीकरणे जिकडे फिरतील तिकडे वारे फिरेल, त्यात सतेज पाटील कधी नव्हे ते या पट्ट्यात अधिक प्रभावी का ठरत आहेत ? तर दक्षिण महाराष्ट्रात मसल, मराठा, पाटील असे तीन पॉवरचे कॉम्बिनेषण. मराठा - पाटील भावकीत विशेषता तरुणांमध्ये अपील होताना दिसत आहे.
इचलकरंजीत आवडेंचे काम मोठे, दलित आणि मुस्लीम समाजात देखील त्यांची उटबस पहिल्यापासूनची, हे मतदानदेखील येथे मोठं, पण राज्यात काटेंगे तो बटेंगे जितके स्ट्रॉंग होणार तितका फटका आवडेंना बसणार, दुसरीकडे युथ पॉवर संजय तेलनाडे यांचेकडे आहे. जे सतेज पाटील यांच्या मागे राहते, इथला सामना देखील मराठा, जैन असा होताना दिसत आहे, ज्यात मराठा कार्ट चालू शकतो. भाजपला हि जागा सोपी वाटत असली तरी ती वाटती तितकी सोपी नसल्याचे बोलले जाते.
हा होता कोल्हापूर जिल्ह्याचा सातबारा, कागलात मुश्रीफ असल्याने सतेज पाटील यांनी पहिल्यापासूनच आपला गटतट कधी बांधला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सतेज पाटील यांना मुश्रीफ पडले तर फायदा पेक्षा तोटाच अधिक होऊ शकतो. पण कागल वगळता कोल्हापूरच्या ९ पैकी ९ ठिकाणी सतेज पाटील यांनी आपली पॉवर वाढवली आहे. हा फॅक्टर कोल्हापूरच्या १० जागाचा निकाल लावताना महत्वाचा ठरणार आहे. निकालात ९-१ होतंय कि १०-० होत अशा चर्चा त्यातूनच सुरु आहेत. कारण कोरे असोत कि मुश्रीफ, यड्रावकर असोत किंवा आबिटकर हि काही नवखी माणसे नाहीत जितके उन्हाळे पावसाळे दुसऱ्यांनी पाहिलेत त्यापेक्षा काकणभर ह्यांनी जास्त करामती केल्या आहेत. दोन तीन दिवस आगोदर कस कुठे वातावरण फिरवायचे, कुठला गट कुठल्या मुद्द्यावर जोडायचा ह्याची रीत ह्या नेत्यांना माहिती आहे. त्यात सतेज पाटील एकटे कुठे कुठे फिरणार कोल्हापूर शहराच्या बाहेर सतेज पाटील यांना येऊ देणे इतर तालुक्यातील लोकांना किती पटणार ह्यावर देखील बरीच गणिते अवलंबून असतील. पण एक आहे, कोल्हापूर स्विंग देईल पण कुठून ? निवडणुकीचा दिवस टिकवून ठेवला तर यंत्रणेच्या बाजूने, पण जिथे ज्याची यंत्रणा चांगली तिथे त्याचे मैदान. पण प्रस्थापितांना यंत्रांना लावता आली नाही तर याचा स्विंग होण्याचे चान्सेस जास्त, बघूया आता कोल्हापूर जिल्ह्यात काय होतेय, १०-०, ९-० कि थेट ५०-५०...........