सुशांत पोवार (विशेष संपादकीय) - आप्पा महाडिक संपले संपले म्हणले कि पुन्हा पुढे येणारे नाव...माणसे म्हणायची महादेवराव महाडिक संपले, आप्पांचे राजकारण संपले, आमदारकी गेली, गोकुळ गेलं, आता महादेवराव महाडिकांकडे राहीलच काय ? नाही म्हणायला महाडिकांच्या घराण्यातून धनंजय महाडिकांना राज्यसभेवर घेतले पण कितीही झाले तरी ते मागचे दार होते. माणसांचा खरा जीव होता तो आप्पा महाडीकांच्या ७४७४ नंबरची धुरळा उडवत जाणारी मर्सडीज आणि कडक इस्त्रीचे कपडे घातलेले आप्पा महाडिक यांच्यावर. कोल्हापूरच्या लोकांना तसेच लोकांच्यात दिसायचे पण तो स्वॅग दिसत नव्हता पण आप्पांचा तो जुना स्वॅग परत आलाय. निमित्त ठरलंय ते राजाराम सहकारी साखर कारखान्याचे तसा राजाराम साखर कारखाना हा आप्पा महाडिकांचाचं ,तो न धनंजय महाडीकांचा न अमल महाडिकांचा राजाराम साखर कारखाना फक्त आणि फक्त आप्पा महाडिकांचाच. एकदा राजाराम साखर कारखाना गेला कि आप्पांच्या राजकारणावर शेवटचा खिळा बसणार होता. सतेज पाटीलांनी निवडणुकीचा स्लोगनच "कंडका पडायचाच" असा ठेवला होता. कंडका पडला असता तर महादेवराव महाडिक संपले असते पण संपत नसतात त्यांनाच महाडिक म्हणत असतात. पण आप्पा महाडिक आहेत तरी कोण ? आप्पा महाडीकांचे राजकारण सुरु कोठून झाले ? कोल्हापूरच्या राजकारणात आप्पा महाडीकांनी जम बसविला तरी कसा ? आजच्या ह्या विशेष संपादकीय मधून आप्पा महाडिक यांचा इतिहास आपण बघणार आहोत. ह्या संपादकीयमध्ये ना धनंजय महाडिक असतील ना अमल महाडिक असतील ना सतेज पाटील असतील ना दुसरे कोण असेल, हि गोष्ट आहे फक्त आणि फक्त आप्पा महाडिक यांच्या ब्रँड होण्याची.
आप्पा महाडिक यांना धरून एकूण ७ भाऊ, शेती व्यवसाय आणि घरची श्रीमंती हि महाडीकांची ओळख. जी लोकं म्हणतात महाडिक पूर्वी सर्वसामान्य होते तर तसे काही नव्हते. पूर्वाश्रमी पासून शेतीवाडी असणारे सदन मराठा घराणे. या ७ भावंडांमधील काही भावंडं व्यवसाय करायचा म्हणून सांगली जिल्ह्यातील यल्लूरमध्ये आली. यल्लूरमधून महादेवराव महाडिक, भीमराव महाडिक दोन भावंडं कोल्हापुरात आली. पुलाची शिरोली येथे महादेवराव महाडिक यांनी आपले बस्तान बसविले. व्यंकटेश्वरा उद्योग समूह स्थापन केला. पंप, ट्रान्सपोर्ट लाईन सुरु केली आणि महादेवराव महाडीकांनी आपले आर्थिक बस्तान चांगले करायला सुरुवात केली. तो काळ १९८० ते १९९० चा होता. या काळात पुलाची शिरोली येथून महादेवराव महाडिक यांनी आपली ओळख करायला सुरुवात केली. महादेवराव महाडिकांच्या राजकारणाची सुरुवात करणारी संस्था होती पुलाची शिरोलीची विकास सोसायटी. गावात असणाऱ्या ह्या विकास सोसायटीवर महादेवराव महाडिक पहिल्यांदा संचालक म्हणून निवडून गेले. ते साल होते १९८९ चे, आजही कधी इतिहास सांगायची वेळ आली कि आपल्या राजकारणाची मातृ संस्था म्हणून आप्पा महाडिक या सोसायटीची आठवण काढत असतात. पण एका सोसायटीच्या संचालकाला कोल्हापूरच्या राजकारणाची स्पेस कशी मिळाली ? तर तो काळ देखील आप्पा महाडिक यांना पूरक ठरला. त्यावेळच्या कोल्हापूरच्या राजकारणात रत्नाप्पांना कुंभार, बाळासाहेब माने, उदयसिंह गायकवाड, श्रीपतराव बोंद्रे यांच्यासारखे दिग्गज राजकारणी राज्य करत होते. ह्या राजकारण्यांचा बेसिक रूल ठरलेला, हे राजकारणी कधी एकमेकांच्या फाटक्यात पाय घालायचे नाहीत. प्रत्येक जण आपआपले संस्थान जपायचा प्रयत्न करायचे. आप्पा महाडिकांचा पहिल्यांदा संपर्क आला तो म्हणजे रत्नाप्पांना कुंभार यांच्या सोबत, घराणेशाहीचा वारसा नसणारा, आर्थिक पातळ्यांवर सुबकता असणारा तरुण - तडफदार माणूस म्हणून आप्पा महाडीक यांची ओळख होऊ लागली. याच राजकीय ओळखीतून आप्पा महाडिक यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेवर घेण्यात आले. गावाच्या सोसायटीवर संचालक असणारे महाडिक आता जिल्ह्याच्या बँकेचे संचालक झाले. याच राजकारणा सोबत समांतर पातळीवर दुसरे राजकारण घडत होते, रुईया नावाचा व्यावसायिक राजाराम साखर कारखान्याचा मालक होता. १९८४ साली राजाराम साखर कारखाना शेतकऱ्यांचा व्हावा म्हणून आंदोलन सुरु होते. या राजकारणातून वसंतदादा पाटीलांनी भगवानराव पवारांची नियुक्ती राजाराम साखर कारखान्यावर तज्ञ संचालक म्हणून केली. त्यातूनच राजाराम कारखाना आता शेतकऱ्यांचा कारखाना झाला होता. १९९० नंतरच्या काळात केडीसीसी बँकेवर संचालक म्हणून गेलेल्या आप्पा महाडिक यांच्या महत्वकांक्षा आता वाढू लागल्या होत्या. त्यातच फिल्डिंग लावून आप्पा महाडिक राजाराम कारखान्यावर गेले. १९९२ साली त्यांची राजाराम साखर कारखान्यावर तज्ञ संचालक म्हणून निवड करण्यात आली. बँकेचे संचालक, राजाराम साखर कारखान्याचे संचालक ह्या गोष्टी आप्पा महाडिक यांनी १९९० ते १९९५ च्या काळात मिळविल्या. हा काळ महादेवराव महाडीकांची मुळे घट्ट होण्याचा होता. या नंतर महादेवराव महाडिकांचा दुसरा टप्पा सुरु झाला. १९९५ नंतरचा काळ जिथे आप्पा महाडिक हा ब्रॅन्ड कोल्हापुरात निर्माण होत गेला. आप्पा महाडिक यांच्या राजकीय प्रवेशाला गावची विकास सोसायटी, जिल्हा मध्यवर्ती बँक, राजाराम साखर कारखाना हा कारणीभूत ठरला, पण ब्रॅन्ड तयार करणारा फॅक्टर होता तो गोकुळचा. त्यासाठी गोकुळची हि मागील स्टोरी पहावी लागेल. तर झाले असे कि करवीर तालुका दुध संघातून मिल्क फेडरेशन झाली. त्यातून गोकुळ दुध संस्था उभारली गेली. १९६७ च्या सुमारास आनंदराव पाटील चुयेकर यांचा गोकुळमध्ये प्रवेश झाला. त्यांच्या प्रेरणेतूनच एका तालुक्यापुरते मर्यादित असणारा गोकुळ राज्यभर ओळखला जाऊ लागला. जसे गोकुळ मोठ झाले तसे चुयेकरांचे नाव हि मोठे होत गेले. त्यातून चुयेकरांच्या राजकीय महत्वकांक्षा जागृत झाल्या. त्यांनी १९९० साली तत्कालीन सांगरूळ विधानसभा मतदार संघातून अपक्ष लढत तत्कालीन बडे नेते श्रीपतराव बोंद्रे यांना आवाहन दिले. या दोघांच्या लढतीत अजून एक मोठ नाव होते ते नाव होते सांगरूळचे तत्कालीन आमदार आणि शेकापचे लढाऊ नेते गोविंदराव कलीकते यांचे. तिरंगी लढत झाली आणि श्रीपतराव बोंद्रे निवडून आले. निवडणुकीतून महादेवराव महाडीकांचे राजकारण जन्माला आले. कारण गोकुळच्या माध्यमातून ताकद निर्माण करून गोविंदरावांना पाडल्याचा राग चुयेकारांना सहन करावा लागला. चुयेकारांना हटविण्यासाठी सर्व नेते एक झाले आणि अरुण नरके, आप्पा महाडिक यांच्या मदतीतून चुयेकारांना बाजूला सारून आप्पा महाडिकांची गोकुळमध्ये एन्ट्री झाली. जिल्हा बँक, राजाराम साखर कारखाना आणि गोकुळ एन्ट्री मारली ती सर्वसामान्य संचालकांपर्यंत, पण काम असे केले कि सर्व काही महाडिकांच्या आदेशाने चालू लागले. जिल्ह्याचे राजकारण हलविणाऱ्या ह्या संस्था महाडिकांच्या ताब्यात आल्या नंतर कोल्हापूरचे सर्वच राजकारण महाडिकांच्या इशाऱ्याने चालू लागले. ह्याच काळात महाडीकांनी ताराराणी आघाडी उघडली, महानगरपालिकेच्या राजकारणात स्वताचा पॅटर्न आणणारे आप्पा महाडिक पहिलेच होते. म्हणायला ते कॉंग्रेसचे होते पण महानगरपालिकेच्या राजकारणात त्यांनी वेगळीच सिस्टीम आणली. ‘ मनपा ‘ म्हणजे महाडिक – नरके - पी.एन.पाटील असे तीन नावांनी मिळून मनपा नावाची सिस्टीम आणली. त्यांचा पॅटर्न अगदीच सोपा होता. एखाद्या प्रभागातून निवडून येण्याची शक्यता असणाऱ्या दोन्ही पक्षांपैकी कोणत्याही पक्षाच्या उमेदवारा पाठीमागे आपली फौज उभा करायचे. पक्ष कोणताही असो मनपाचा पाठींबा मिळविणारा व्यक्ती निवडून यायचा. त्यातून तो आपोआप ताराराणी आघाडीचा घटक व्हायचा. यातून महानगरपालिकेचा मनपा चा फॅक्टर इस्टॅब्लीश होत गेला. १९९५ पर्यंत महादेवराव महाडिकांनी सगळं मिळवलं आता वेळ होती आमदारकीची, दिग्विजय खानविलकर त्या काळाचे बडे प्रस्थ आप्पा महाडीकांनी विधानसभेला थेट दिग्विजय खानविलकरांना चॅलेंज दिले. कॉंग्रेसच्या दिग्विजय खानविलकरांविरोधात आप्पा महाडिक अपक्ष म्हणून उभे राहिले. कोल्हापूरचे साथही आसमान हाती घेण्याची महत्वकांक्षा बाळगून असणाऱ्या महादेवराव महाडिकांचा विजयी रथ इथे पहिल्यांदा रुतला. महादेवराव महाडिकांचा ह्या निवडणुकीत पराभव झाला. “आप्पा महाडिक” नको असणारी मंडळी खुश झाली. ताराराणी आघाडीमुळे आप्पांना नगरसेवकांची किंमत कळाली होती. आप्पांनी डाव टाकला तो विधान परिषदेचा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातून आमदार होता येते हे त्यांच्या लक्षात आले. त्यासाठी नगरसेवकच मतदान करत असतात. आप्पा महाडीकांनी पुढच्या दोन वर्षातच विधान परिषदेचा डाव टाकला आणि साल १९९७ रोजी आप्पा महाडिक विधान परिषदेवर निवडून गेले. गोकुळ, जिल्हा बँक, राजाराम साखर कारखाना आणि आमदारकी, कोल्हापूरच्या विकासाच्या नाड्या आप्पांनी आपल्या ताब्यात घेतल्या, नुसत्या ताब्यातच घेतल्या नाही तर त्या अशा काही आवळल्या कि जिल्ह्यातील कोणत्याही कोपऱ्यातल्या कोणत्याही नेत्याने चू.. जरी केले तरी महादेवराव महाडिक त्यांच्या नाड्या आवळू लागले. महादेवराव महाडीकांचे हे राजकारण कायम राहिले, नंतर धनंजय महाडिक राजकारणात जम बसवू लागले. २०१४ नंतर सतेज पाटील यांचा काळ सुरु झाला. १९९७, २००३, २००९ असे तीन वेळा म्हणजे १९९७ ते २०१५ पर्यंत विधान परिषदेवर असणारे आप्पा महाडिक २०१५ ला पराभूत झाले. सतेज पाटील यांनीच त्यांना पराभूत केले. पाठोपाठ गोकुळ गेले, राहिलेलाच एक कंडका होता तो होता राजाराम साखर कारखान्याचा, एव्हडा पडला कि झालं, पण आप्पा महाडिक अस्सल खोडवा निघाले. कितीही झाले तरी कोल्हापुरात हा खोडवा येणारच, उतारा हा देणारच, हि गोष्ट होती आप्पा महाडिकांच्या उभारणीची......