दिनांक ०२ ते ८ डिसेंबरचे साप्ताहिक राशिभविष्य
schedule02 Dec 24
person by
visibility 94
categoryराशिभविष्य
मेष
दिनांक १ रोजी अमावास्या कालावधी संपलेला नाही, तो दुपारी बारापर्यंत राहील. दिनांक १ व २ अशा या दोन दिवसांत कारण नसताना एखाद्या गोष्टीच्या मोहात पडू नका. जी गोष्ट आपल्याला करायचीच नाही अशा गोष्टींचा नाद करणे म्हणजे त्रास करून घेतल्यासारखे आहे. स्वत:च्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष देऊ नका. वेळेत काम कसे पूर्ण होईल याकडे लक्ष द्या. चांगल्या दिवसांत महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. या कालावधीत अपूर्ण कामकाज पूर्ण होईल. व्यवसायात बरेच काही चांगले बदल होतील. नोकरदार वर्गाला सहानुभूती मिळेल. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात वर्चस्व राहील. नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. धार्मिक गोष्टींत मन रमेल. आरोग्य उत्तम राहील.
वृषभ
२ तारखेला दुपारनंतर व दिनांक ३ व ४ असे दोन दिवस म्हणजेच अडीच दिवसांचा कालावधी अनुकूल नाही आणि नेमक्या याच दिवसांत तुम्हाला नवीन कामाची सुरुवात करावीशी वाटेल. एखाद्याला प्रामाणिकपणे पूर्वी झालेल्या गोष्टींबद्दल चर्चेवरून काही माहिती सांगणे… अशा या गोष्टींचा मोह तुम्हाला आवरता येत नाही आणि नेमके असेच होते. कारण नसताना भांडणतंटा अंगलट येतो. तेव्हा होऊन गेलेल्या गोष्टींवर विचार वा चर्चा करू नका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. चांगल्या कालावधीमध्ये तुमच्या श्रमाला यश मिळणार आहे. व्यवसायातील उलाढाल वाढेल. नोकरदार वर्गाचा कामाचा व्याप वाढेल. आर्थिकदृष्ट्या अनपेक्षित लाभ होईल. राजकीय क्षेत्रात श्रेय मिळेल. नातेवाईकांशी संवाद साधाल. जोडीदार साथ देईल. प्रकृती उत्तम राहील.
मिथुन
दिनांक १ रोजी अमावास्येचा जो प्रहर राहिलेला आहे तो अजूनही संपलेला नाही. शिवाय चंद्र ग्रहाचे भ्रमण षष्ठ स्थानातून अष्टमस्थानाकडे होत आहे. अशा ग्रहमानात उचलली जीभ लावली टाळ्याला असे करून चालत नाही. स्पष्ट भूमिका असणे म्हणजे नुकसान होण्यासारखे आहे, तेव्हा सहनशीलता वाढवा. काही गोष्टी अशा असतात की त्या स्पष्ट बोलल्यामुळे बिघडतात. तेव्हा सध्या कोणतीही प्रतिक्रिया देत बसू नका. फक्त जे चालले आहे ते पुढे न्या. न पटणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. सध्या शांत राहून काम करायचे आहे. व्यवसायात मोठी उलाढाल नको. नोकरदार वर्गाला कामात लक्ष घालावे लागेल. आर्थिक बचत करणे योग्य राहील. राजकीय क्षेत्रातील हालचालींना वेग येईल. कुटुंबाशी एकनिष्ठ राहा. मानसिकता जपा. प्रकृतीची काळजी घ्या.
कर्क
२ तारखेला दुपारनंतर व दिनांक ३, ४ आणि ७ या दिवसांचा कालावधी जेमतेम राहील. या कालावधीत कोणतेही काम करताना जपून पाऊल टाका. कारण सध्या आपण म्हणाल ती पूर्व दिशा असे असणार नाही. आपल्याला समोरच्याचे ऐकून घ्यावे लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल. कधीकधी तुमचे स्वत:वर नियंत्रण राहत नाही, त्यामुळे वादाचे प्रसंग निर्माण होतात. शांत राहा. ज्या गोष्टीतून त्रास होणार आहे अशा गोष्टी न केलेल्या चांगल्या. नियमांचे पालन करा. बाकी दिवस ठीक राहतील. व्यवसायात अटीतटीचा सामना करावा लागेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांनी ठरवून दिलेल्या नियमावलीत बदल करून चालणार नाही. आर्थिक नियोजन करा. घरगुती वातावरण चांगले कसे राहील ते पाहा.प्रकृतीची काळजी घ्या.
सिंह
दिनांक ५, ६ हे दोन दिवस फारसे बरे नाहीत. म्हणजे याच दिवसांत नवीन कार्याला सुरुवात करणे म्हणजे अडथळा आणल्यासारखे आहे. तेव्हा या दोन दिवसांत कोणतेही काम करताना विचार करा. जबरदस्तीने एखादी गोष्ट करायला गेलात तर त्याचा त्रास वाढू शकतो, त्यामुळे या दोन दिवसांत काम पुढे जात असेल तर ते जाऊ द्या. त्यासाठी घाई करू नका. मर्यादित गोष्टीच करा. इतरांना काय वाटते यापेक्षा स्वत:ला काय करायचे आहे याकडे लक्ष द्या. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात खरेदी विक्रीचे व्यवहार चांगले होतील. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक व्यवहार चोख ठेवा. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा होईल. घरगुती वातावरण चांगले राहील. योग साधनेला महत्त्व द्या.
कन्या
दिनांक ७ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. अशावेळी इतरांचा फार विचार न करता स्वत:च्या कामाला प्राधान्य द्या. कारण हीच ती वेळ आहे की तुमचे काम पूर्ण होणार असते आणि तुम्ही अशावेळी इतरांच्याकडे मदतीसाठी धाव घेता. सध्या स्वत:साठी वेळ काढा. शुभ ग्रहांची साथ मिळेल. चढउतारांचा सामना दरवेळी करावाच लागतो, सध्या मात्र हा करावा लागणार नाही. व्यावसायिकदृष्ट्या व्यवहाराला गती येईल. नोकरदार वर्ग आपले काम चोखपणे बजावेल. व्यवहाराला महत्त्व द्या. भावनिक गोष्टींना महत्त्व देणे सध्या तरी योग्य नाही. राजकीय क्षेत्रात शुभेच्छा मिळतील. घरगुती वातावरण चांगले राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
तूळ
सध्या ग्रहमानाची साथ उत्तम राहील. एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव साध्य होणार आहे. तेव्हा शांत बसून राहू नका. जे करायचे आहे ते आत्ताच असे ठरवून करा. म्हणजे काम यशस्वी होईल. त्या कामाला गती येईल. अडथळ्यांचे प्रमाण कमी राहील, त्यामुळे कामातील उत्साह चांगला राहील. कामे अगदी वेळेत पूर्ण होतील. त्यासाठी कोणताही संघर्ष निर्माण होणार नाही. व्यवसायात परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. नोकरदार वर्गाचे कामात मन रमेल. आर्थिक ताणतणाव कमी होईल. समाजसेवेची आवड राहील. मुलांचे लाड पुरवा, पण त्यांची शिस्त बिघडणार नाही याची काळजी घ्या. घरगुती वातावरण चांगले राहील. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. एकूण सप्ताह अनुकूल राहील. आरोग्यही साथ देईल.
वृश्चिक
बऱ्याच दिवसांपासून अपुरे असणारे स्वप्न पूर्ण होणार आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही आजपर्यंत प्रयत्न करत होता, ती गोष्ट सहज मार्गी लागणार आहे. परिणामी तुमच्यात चांगला बदल होणार आहे. मात्र हा बदल तुम्ही तात्पुरत्या क्षणापुरताच कराल. तुम्हाला ज्या गोष्टी आवाक्याच्या बाहेर वाटत होत्या त्या वाटणार नाहीत. या चांगल्या दिवसांचा फायदा घेऊन दुहेरी लाभ कसा मिळेल यासाठी प्रयत्न करा. व्यवसायात उत्तुंग भरारी घ्याल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांविषयी मनामध्ये अढी राहील. आर्थिक यश मिळेल. नातेवाईक, शेजारी यांच्याशी असलेले नाते अतूट होईल. सध्या धार्मिक गोष्टींची आवड असली तरी त्या गोष्टींसाठी वेळ देता येईल असे नाही. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
धनू
दिनांक १ रोजी अमावास्या दुपारपर्यंत राहील आणि नेमक्या याच दिवशी तुम्हाला होऊन गेलेल्या गोष्टींवर चर्चा करायला आवडेल आणि स्वत:च त्रास ओढवून घ्याल. अशी मानसिकता बिघडण्यापेक्षा या दिवशी शांत राहा, म्हणजे गोष्टी बिघडणार नाहीत. प्रत्येक गोष्टीत समतोल साधा. आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली तरी कोणत्याही डावपेचांना बळी जाऊ नका. त्यातून सुवर्णमध्य काढा. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील. चांगल्या कालावधीमध्ये काय करायचे काय करायचे नाही याचे वेळापत्रक तयार करा. इतरांनी मदत करावी ही अपेक्षा न ठेवता, स्वत:चे काम स्वत: करा. म्हणजे त्या कामाचाही आनंद मिळेल. कामही पूर्ण होईल. व्यवसायात फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाला नवीन कामाची जबाबदारी मिळेल. आर्थिक व्यवहार जपून करा. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.
मकर
२ तारखेला दुपारनंतर दिनांक ३ व ४ अशा अडीच दिवसांच्या कालावधीत पाऊल जपून टाकावे लागेल. या दिवसांत तुमची मानसिक अवस्था चलबिचल राहील, त्यामुळे या दिवसांत निर्णय घेणे अवघड होईल. तेव्हा घाईने निर्णय घेऊच नका, तुमचे नुकसान होऊ शकते. इतरांनी काय करावे यापेक्षा आपल्याला काय करायचे आहे याचा विचार आधी करा. झालेल्या गोष्टींवर विचार करून निर्णय घ्या. वादविवादांपासून लांब राहा. अन्यथा कारण नसताना मनस्ताप वाढू शकतो. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात जुने काही व्यवहार अपुरे असतील ते पूर्ण होतील. नोकरदार वर्गाला कामात पूर्णपणे लक्ष केंद्रित करता येईल. अनावश्यक खर्च टाळा. कौटुंबिक वातावरण चांगले कसे राहील ते पाहा. मानसिकता जपा. प्रकृती बाबतीत दुर्लक्ष करू नका.
कुंभ
दिनांक ५, ६ हे दोन दिवस फार धावपळ करत बसू नका. ओढून ताणून एखादे काम करणे म्हणजे त्रास वाढवण्यासारखे आहे, त्यापेक्षा दोन दिवस थोडा धीर धरा. जे काही करायचे आहे ते या दोन दिवसांनंतर करा. म्हणजेच प्रयत्न सोडू नका असे नाही. प्रयत्न करा, पण अति जोर लावणे या दिवसांत टाळा. काम होत नसेल तर ते पुढे ढकला. नियमांच्या चौकटीत राहा. बाकी दिवस चांगले असतील. संधीचे सोने करण्याची वेळ आलेली आहे. व्यवसायातील परिस्थिती उत्तम असेल. नोकरदार वर्गाला कामकाजाचे स्वरूप कळाल्यामुळे नेमक्या गोष्टींचे नियोजन करता येईल. आर्थिक बचत करा. सार्वजनिक क्षेत्रात यश मिळेल. मित्र-मैत्रिणींच्या बऱ्याच दिवसांतून भेटीगाठी होतील. घरगुती वातावरण चांगले राहील.योग साधनेला महत्त्व द्या.
मीन
दिनांक ७ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांच्या कालावधीत चंद्रग्रहाचे भ्रमण अनुकूल असेल. अनुकूल वातावरण असते त्यावेळी कोणत्याही प्रकारची तडजोड स्वीकारावी लागत नाही. समोरून चांगले प्रस्ताव येतात. चढउतार असला तरी यश मिळून जाते. मनासारख्या गोष्टी घडतात. सकारात्मक परिवर्तन करणे हे सहजासहजी शक्य नसले तरी हे ग्रहमान तुम्हाला सकारात्मक परिवर्तन घडवून आणते. चांगल्या कालावधीमध्ये सुवार्ता समजेल. स्वत:चे अस्तित्व निर्माण व्हायला आता वेळ लागणार नाही. व्यवसायात उत्पन्न वाढेल. नोकरदार वर्गाचा रुबाब वाढेल. राजकीय क्षेत्रात झालेले बदल स्वीकारावे लागतील. मित्र-मैत्रिणींचे सहकार्य मिळेल. संतती सौख्य लाभेल.नातेवाईकांच्या शुभेच्छा पाठीशी राहतील. धार्मिक कार्य पार पाडाल.आरोग्य उत्तम राहील.