मेष
दिनांक ३, ४ हे संपूर्ण दोन दिवस व ५ तारखेला दुपापर्यंत असा हा कालावधी जेमतेम राहील. या कालावधीत नको तो व्याप वाढवून घेऊ नका. म्हणजेच भावनिक गोष्टींच्या आहारी जाऊन घेतलेले निर्णय नुकसानीचे ठरू शकतात. त्यामुळे भावनिक गोष्टी सध्या तरी बाजूला ठेवा. व्यवहारात्मक गोष्टींना महत्त्व द्या, त्यामुळे नुकसान होणार नाही. इतरांनी सरी घेतली म्हणून आपण दोरी घेऊन चालणार नाही. म्हणजे आपल्याला जे जमणार आहे तेच करणे योग्य राहील. ज्या गोष्टी जमणार नाहीत अशा गोष्टींचा नाद सोडून द्या. बाकी दिवस चांगले राहतील. व्यवसायातील परिश्रम वाढतील. नोकरदार वर्गाला नवीन कामाची जबाबदारी घ्यावी लागेल. वायफळ खर्च कमी करा. राजकीय क्षेत्रात डावपेच यशस्वी होतील. कुटुंबाची काळजी घ्या. धार्मिक कार्यासाठी खर्च कराल. मानसिकदृष्टय़ा द्विधा अवस्था राहील. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.
वृषभ
दिनांक ५, ६, ७ असे तीन दिवस काय करावे आणि काय करू नये याची सतत चिंता वाटेल. मात्र चिंता करत बसण्यात वेळ घालवू नका. पर्याय मार्ग शोधा. पर्याय मार्गातून बरेच काही साध्य होईल. आपल्या वैयक्तिक गोष्टी इतरांसमोर मांडू नका. सध्या शांतपणाने निर्णय घ्यायचे आहेत हे लक्षात ठेवा. आपले काम भले आणि आपण भले हे सूत्र अंगी बांधल्यास त्रास होणार नाही. कोणाच्या वागण्या- बोलण्याकडे लक्ष देऊ नका. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात धावपळ झाली तरी फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाला कामाचे नियोजन करता येईल. अनपेक्षित धनलाभ होईल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. भावंडांशी संपर्क साधाल. धार्मिक गोष्टींची आवड राहील. मानसिक व शारीरिक स्वास्थ्य जपा.
मिथुन
षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. असे भ्रमण म्हणजे सर्व दिवसांत जपून पाऊल टाकावे लागते. प्रत्येक दिवस चांगला कसा जाईल हेच बघावे लागेल. म्हणजेच याच दिवसांत नको त्या गोष्टी घडतात. आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटते आणि तीच गोष्ट समोर येते असेच होते, पण घाबरून जाऊ नका. कारण ऊन-सावलीप्रमाणे हे दिवस आहेत. असे म्हणायला हरकत नाही. तेव्हा महत्त्वाचे काम पुढे ढकला. जे चालले आहे ते योग्य आहे असे समजून पुढे चला. म्हणजे त्रास होणार नाही. आपले मत मांडताना ते शांतपणे मांडा. म्हणजे समोरच्याला तुमचा राग येणार नाही. व्यवसायात गुंतवणूक टाळा. नोकरदार वर्गाने कामात लक्ष घालावे. आर्थिक नियोजन पक्के करा. सामाजिक संकल्पना मार्गी लागतील. ज्ञानकौशल्य वाढेल. कुटुंबाशी एकनिष्ठ राहा. प्रकृतीच्या बाबतीत हलगर्जीपणा टाळा.
कर्क
दिनांक ५, ६, ७ हे तीन दिवस आळीमिळी गुपचिळी असे वागणेच योग्य आहे. म्हणजेच कोणाला काहीही न बोलणे. काही गोष्टी तुम्हाला पटणाऱ्या नसतील, पण त्या पटवून घ्याव्या लागतील. इतरांशी बोलताना संवाद जपून करा. तुम्ही प्रामाणिकपणे जरी एखाद्याला गोष्ट समजून सांगितली तरी ती समोरच्याला पटणार नाही. कारण सध्या तुमचे दिवस फार अनुकूल नाहीत. या दिवसांत फारसे बोलून चालणार नाही. नियमांच्या चौकटीत राहा. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात भागीदारी करार होतील. नोकरदार वर्गाला कामाचे स्वरूप कळेल. आर्थिकदृष्टय़ा व्यवहार जपून करा. समाजसेवा करताना भान ठेवा. घरगुती वातावरण ठीक राहील. उपासनेत मन रमेल. प्रकृतीची काळजी घ्या.
सिंह
७ तारखेला दुपारनंतर दिनांक ८ व ९ असे संपूर्ण दोन दिवस म्हणजेच अडीच दिवसांचा कालावधी हा फारसा अनुकूल नाही. या कालावधीत महत्त्वाचे निर्णय घेताना आगामी काळाचा विचार करा. कारण सध्या जरी योग्य वाटले तरी आगामी काळासाठी हे निर्णय योग्य नसणार, तेव्हा घाई गडबडीने निर्णय घेऊ नका. स्पष्ट बोलल्यामुळे बरेच काही बिघडू शकते. त्यामुळे स्पष्ट बोलू नका. इतरांना सल्ला देणे टाळा. वादविवाद या गोष्टींपासून लांब राहा. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायातील परिस्थिती सुधारलेली असेल. नोकरदार वर्गाला नवीन कामाची जबाबदारी मिळेल. आर्थिकदृष्टय़ा बचत करणे योग्य राहील. मित्र-मैत्रिणींशी संवाद साधा. मुलांची प्रगती होईल. घरगुती वातावरण चांगले राहील. योग साधनेला महत्त्व द्या.
कन्या
सध्या सर्व दिवस चांगले आहेत. कोणताही दिवस असा नाही की त्या दिवसांत तुम्हाला कंटाळा येईल. प्रत्येक दिवस उत्साह वाढवणारा आहे, त्यामुळे कामातील गती वाढेल. कामाव्यतिरिक्त मनोरंजनासाठी वेळ मिळेल. प्रत्येक गोष्टीत आपलेच खरे करण्याची वेळ आली आहे; तेव्हा तुम्ही तुमचे मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल आणि समोरच्याला ते पटेलही. त्यामुळे तुम्हाला एक प्रकारचा आनंदच वाटेल. इतरांची मदत मिळेल. व्यवसायात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक कराल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांकडून शाब्बासकीची थाप मिळेल. आर्थिक बाबतीत व्यवहार पूर्ण होतील. राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग येईल. मित्र-मैत्रिणींशी मनमोकळेपणाने बोलल्यामुळे हलके वाटेल. संतती सौख्य लाभेल. घरगुती वातावरण आनंदी राहील. प्रकृती चांगली राहील.
तूळ
शुभग्रहाची साथ असल्यावर कशाचीही कमतरता नसते, म्हणजेच चांगले दिवस असतात. त्यावेळी आपण नाही म्हणालो तरी समोरून चांगला प्रतिसाद मिळतो. कोणत्याही गोष्टीसाठी धावपळ करावी लागणार नाही. दरवेळी कोणता ना कोणता तरी अडथळा तुमच्यासमोर येत होता. सध्या हा अडथळा दूर होणार आहे, त्यामुळे तुम्हाला काम करणे अवघड वाटणार नाही. मनासारख्या घटना घडल्यामुळे आनंदी वातावरण निर्माण होईल. व्यवसायात मागील काही दिवसांपेक्षा सध्या दिवस चांगले जातील. नोकरदार वर्गाला वरिष्ठांकडून शुभेच्छा मिळतील. आर्थिक ताणतणाव कमी होईल. नातेवाईकांशी कार्यक्रमानिमित्त भेटीगाठी होतील. भावंडांशी संवाद साधाल. शेजाऱ्यांना मदत कराल. धार्मिक कार्यात सहभाग राहील. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
वृश्चिक
सप्ताहात सर्व दिवस अनुकूल असतील. कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. कोणी आपल्याला चांगले म्हणावे, वाईट म्हणावे ही अपेक्षा तुम्हाला राहणार नाही. तुम्ही तुमच्या राज्यात आनंदी राहाल. म्हणजेच ‘आपण भले आणि आपले काम भले’ अशीच वातावरण निर्मिती होईल. स्वत:ला चांगले वाटावे यासाठीच प्रयत्न कराल. मनमोकळेपणाने जीवन जगण्याचा आनंद काही वेगळाच असतो याचा अनुभव येईल. हाती घेतलेले काम तडीस न्याल. कामातील उत्साह टिकून राहील. आश्वासने वेळेत पूर्ण कराल. घेतलेले निर्णय यशस्वी होतील. व्यवसायात प्रगती होईल. नोकरदार वर्गाचे काम सुरळीत चालू राहील. आर्थिक लाभ होईल. नातेवाईकांच्या शुभेच्छा पाठीशी राहतील. जोडीदाराची साथ मिळेल.
धनू
दिनांक ३, ४ हे संपूर्ण दोन दिवस व ५ तारखेला दुपापर्यंत असा हा अडीच दिवसांचा कालावधी चढ-उतारांचा राहील. अशा कालावधीत इतरांनी तुमचे ऐकावे अशीच मानसिकता राहते आणि इतरांनी तुमचे न ऐकल्यामुळे तुमची मानसिकता बिघडते आणि तुम्ही अकांडतांडव करता आणि स्वत:ला त्रास करून घेता.. अशा परिस्थितीत केव्हाही शांत राहणे गरजेचे राहील. जेवढी गरज आहे तेवढेच बोला म्हणजे वाद वाढणार नाहीत. बाकी दिवस चांगले असतील. चांगल्या दिवसांमध्ये कोणती गोष्ट करावी. कोणती गोष्ट करू नये याचे नियोजन करा. व्यवसायात आवक जावक वाढेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे प्रोत्साहन मिळेल. अनावश्यक खर्च टाळा. जोडीदाराच्या सल्ल्याने पुढे गेल्यास त्रास होणार नाही. कुटुंबाला समजून घ्या. प्रकृतीच्या बाबतीत हलगर्जीपणा टाळा.
मकर
दिनांक ५, ६, ७ हे तीन दिवस जणू काही आपल्या डोक्यावर टांगती तलवार आहे असेच वाटेल. एखादी गोष्ट पूर्ण होणार नाही हे माहीत असतानासुद्धा तुम्ही प्रयत्न कराल आणि गणित फसून जाईल. वेळेत काम पूर्ण होणार नाही. इतरांची साथ कमी मिळेल. बेकायदेशीर गोष्टींपासून त्रास होऊ नये असे वाटत असल्यास नियमांच्या चौकटीत राहा. परिश्रम वाढवावे लागतील. होऊन गेलेल्या गोष्टींवर विचार करणे टाळा. तडजोडीतून यश मिळेल. व्यवसायातून उत्पन्न चांगले मिळवण्यासाठी सध्या प्रयत्न वाढवावे लागतील. नोकरदार वर्गाला कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष देता येणार नाही. आर्थिक बाबतीत बचत करणे योग्य राहील. मित्र परिवाराची मदत मिळेल.
कुंभ
७ तारखेला दुपारनंतर दिनांक ८ व ९ संपूर्ण दोन दिवस असा हा अडीच दिवसांच्या कालावधीत कोणत्याही गोष्टीचा सोक्षमोक्ष लावणे त्रासाचे ठरेल. ज्या गोष्टीतून त्रास होणार आहे अशा गोष्टींच्या नादी लागू नका. प्रत्येक गोष्टीत आपलेच खरे करू नका. वादविवाद टाळा. कोणाचाही सल्ला घेताना त्याला प्रत्युत्तर करू नका. न पटणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. स्वत:चे काम स्वत: करा. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळेल. नोकरदार वर्गाला कामात पूर्णपणे लक्ष केंद्रित करता येईल. आर्थिकदृष्टय़ा मोठी गुंतवणूक टाळा. मित्र-मैत्रिणींची मदत मिळेल. संतती बाबतीत घेतलेले निर्णय योग्य असतील. कुटुंबाच्या गरजा भागवत असताना आपली आवक पाहा. आरोग्याची काळजी घ्या.
मीन
भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. म्हणजेच सध्या सर्व दिवस चांगले आहेत. चांगल्या दिवसांमध्ये बरेच काही चांगले घडते. त्यासाठी फार संघर्ष करावा लागत नाही. अगदी सहज मार्गी कामे होतात. कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येत नाही. आपण म्हणाल ती पूर्व दिशा असते. वेळेत कामे पूर्ण झाल्यामुळे कामातील उत्साह वाढेल. ताणतणाव कमी होईल. शुभ संकेत मिळेल. व्यापारी वर्गाला दिलासा मिळेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांच्या मर्जीने काम करावे लागले तरी तुमच्यासाठी फायद्याचे असेल. आर्थिक यश मिळेल. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा होईल. मित्र-मैत्रिणींसोबत मनोरंजन होईल. संततीविषयी वाटणारी हूरहूर मिटेल. नातेवाईकांना मदत कराल. धार्मिक गोष्टीत सहभाग राहील. मानसिक समाधान लाभेल. प्रकृती ठणठणीत राहील.