सचिन तळेकर (लातूर) - औसा व निलंगा विधानसभा मतदारसंघात वैशिष्ट्यपूर्ण आदर्श मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. या मतदार केंद्रामुळे मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. औसा विधानसभा मतदारसंघात औसा येथील पंचायत समिती कार्यालयात वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन व वन्यजीव संरक्षण या संकल्पनेतून ‘ग्रीन औसा मतदान केंद्र’ या वैशिष्ट्यपूर्ण अभिनव मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली होती.
या मतदान केंद्राच्या दर्शनी भागात मंडप व सेल्फी पाँईटसह आकर्षक सजावट करण्यात आली होती. मतदान केंद्राच्या प्रवेशदारापासून वृक्ष लागवड व संगोपनामुळे पर्यावरणात होणारे वातावरणीय बदल, पर्जन्यमानात होणारी वाढ, तापमानातील घट, जमिनीची होणारी धूप थांबविणे यासह वृक्षतोडीच्या दुष्परिणामाबाबत व वनस्पती व नैसर्गिक अधिवास संरक्षण कायमस्वरुपी टिकवून ठेवणे. निसर्गाचे संतुलन टिकविण्यासाठी वन्यजीव संरक्षण व संरक्षणासाठीच्या उपायाबाबत आकर्षक फलकाद्वारे माहिती देण्यात आली. याच मतदान केंद्रात मतदारांना उन्हापासून संरक्षण मिळावे म्हणून विशेष व्यवस्था करण्यात आली होती. तसेच स्तनादा मातेसाठी हिरकणी कक्षाचीही निर्मिती करुन महिला मतदारांनाही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या.
शिरुर अनंतपाळ येथे युवा संचालित मतदान केंद्र
निलंगा विधानसभा मतदारसंघातील शिरुर अनंतपाळ येथील अनंतपाळ नुतन विद्यालय येथे युवा मतदान केंद्राच्या माध्यमातून एक अभिनव मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. मतदान केंद्राचे प्रवेशद्वार विविध फुगे व विविध बहुरंगी फुलांनी सजविण्यात आले होते. तर प्रवेशद्वारापासून ते मतदान कक्षापर्यंत मंडप व गालीचा आंथरुन सुशोभित करण्यात आला होता. या मतदान केंद्राच्या सजावटीमुळे मतदान केंद्रावरील वातावरणात उत्साह संचारला होता. मतदान केंद्रात मतदारांना रांगेत ताटकळत उभे राहायला लागू नये, यासाठी प्रतिक्षालय कक्षाची निर्मिती करण्यात आली होती. त्यामुळे मतदान हे लोकशाहीतील उत्सव असल्याची खरी अनुभूती इथे येणाऱ्या मतदारांना येत होती.
औसा, निलंगा येथील सखी मतदान केंद्र
औसा येथील मुक्तेश्वर माध्यमिक विद्यालयात सखी मतदान केंद्र स्थापन करुन देशातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, रमाई आंबेडकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सिंधुताई सपकाळ, कल्पना चावला यांच्या कार्याची कार्याची माहिती देण्यात आली होती. तर निलंगा येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेतील सखी मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकारी, सेवक म्हणून महिला अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली होती.
औसा विधानसभा मतदारसंघातील लोदगा येथील बांबू मतदान केंद्रावर मतदान केंद्राच्या दर्शनी भागात बांबूची लागवड, बांबू लागवडीचे फायदे, बांबूच्या विविध जाती, बांबूपासून बनविण्यात येणाऱ्या विविध वस्तूंची माहिती फलकाद्वारे मतदारांना देण्यात आली होती. तसेच बांबूपासून बनविलेले खुर्ची, टेबल, कापड, बडस्, विविध प्रतिकृती आदी वस्तूंचे प्रदर्शन या मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारात मांडण्यात आले होते.