Breaking : bolt
कागल भूमी अभिलेख कार्यालयाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर, शासनाच्या जमिनींची खाजगीकरणाची खिरापत ?वेळीच हस्तक्षेप केला गेला नाही तर राज्यातील आरोग्य खाते होईल भ्रष्टाचाराचे कुरणकोल्हापूर जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील "शासकीय जमिनींचा महाघोटाळा" उघडकीस ? लवकरच सविस्तर वृत्त.......औषधांसाठी हमीचे बंधन पण काही पुरवठादारांकडून दराची स्पर्धा टाळण्यासाठी सहभागी पुंरवठादारांना धमक्याचे सूत्र ?परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीतचं, यदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात पोलिसांवर ठपका !‘लातूर ग्रंथोत्सव २०२४’चे दिमाखदार उद्घाटनसांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागूसिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींच्या पालकत्वाचे दाखले वाटपसिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची तक्रार निवारण सभा प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेलाबायोफ्लॉक मत्स्यसंवर्धनाबाबत पुणे येथे प्रशिक्षण कार्यशाळा

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठात ‘राजर्षी शाहू छत्रपती विचारवेध’ ग्रंथाचे प्रकाशन

schedule30 Aug 24 person by visibility 160 categoryइतर

संजय सुतार (कोल्हापूर) - समताधिष्ठित आणि सामाजिक न्यायासक्त समाजनिर्मिती करण्याबाबत दृढनिश्चयी असणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे स्वतंत्र प्रज्ञेचे राजपुरूष होते, असे गौरवोद्गार इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. अरूण भोसले यांनी आज येथे केले.
राजर्षी शाहू छत्रपती शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग, समाज प्रबोधन पत्रिका आणि शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज डॉ. अवनीश पाटील संपादित ‘राजर्षी शाहू छत्रपती विचारवेध’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. मानव्यशास्त्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर प्रमुख उपस्थित होते.
डॉ. भोसले म्हणाले, एतद्देशीय समाजातील पिढ्यानपिढ्यांची शोषण परंपरा नष्ट करून समताधारित समाज घडविण्याचा निर्धार राजर्षी शाहू महाराजांनी केलेला होता. बहुजनांच्या अगतिकतेवर शिक्षण हीच मात्रा आहे, या विषयी त्यांच्या मनात तीळमात्र शंका नव्हती. सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी त्यांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले. त्याद्वारे त्यांना पुरोगामी सामाजिक बदल अपेक्षित होते. तथापि, शाहू महाराजांच्या विचारवारशाशी आपण नाते जपले आहे का, ते नाते विसरण्याचा द्रोह कोणी केला, या प्रश्नांची उत्तरे शोधून महाराजांच्या स्वप्नातील मराठी मुलूख अस्तित्वात आणण्याची जबाबदारी आजच्या समाजाने घ्यायला हवी, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. अवनीश पाटील यांनी संपादित केलेला हा ग्रंथ अत्यंत मौलिक स्वरुपाचा असून अनेकार्य़ांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. राजर्षी शाहूंविषयी संशोधन करणाऱ्या संशोधकांच्या तीन पिढ्यांचे लेखन या ग्रंथात समाविष्ट आहे, ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.
समाज प्रबोधन पत्रिकेचे संपादक तथा ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले, शाहू महाराजांना समर्पित समाज प्रबोधन पत्रिकेचा विशेषांक काढला होता. तथापि मासिकांचे आयुर्मान आणि वाचक मर्यादित असतात. त्यामुळे या विशेषांकाचे ग्रंथरुपांतरण करण्यात आले. पत्रिकेमध्ये आलेले लेखन चिरस्थायी करण्याच्या दृष्टीने हे ग्रंथरुप महत्त्वाचे आहे. शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात राजर्षी शाहू महाराजांच्या संदर्भातील पुनरुज्जीवन घडून आले, ही वस्तुस्थिती आहे. प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार, डॉ. विलास संगवे यांनी त्यांच्याबाबत मूलभूत स्वरुपाचे संशोधनकार्य उभे केले. यापुढील काळातही महाराजांच्या विचारकार्याच्या विविध पैलूंच्या अनुषंगाने नवसंशोधन व्हावे. आपत्ती व्यवस्थापन, प्रशासकीय सुधारणा, ब्राह्मणेतर चळवळीचे पुनरुज्जीवन आदी विषयांच्या अनुषंगाने हे संशोधन व्हावे, यासाठी शिवाजी विद्यापीठाने जबाबदार भूमिका बजावावी, असेही त्यांनी सूचित केले.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, सदर ग्रंथात ज्येष्ठ इतिहास संशोधकांबरोबर नवसंशोधकांच्या लेखनाचा समावेश होणे ही वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. शाहूकार्यामागील त्यांच्या विचारांचा वेध घेणारा महत्त्वाचा ग्रंथ त्यातून साकारला आहे. महाराजांच्या विचारकार्यामधील सर्जनशीलता, प्रयोगशीलता, अभिनव उपक्रमशीलता आणि गतिमानता या गुणविशेषांचा अभ्यास करून त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. शिक्षण, औद्योगिक व्यवस्थापन आदी अंगांनीही शाहूकार्याचा वेध घेण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते ‘राजर्षी शाहू छत्रपती विचारवेध’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. इतिहास अधिविभागाचे प्रमुख तथा संपादक डॉ. अवनीश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. दत्तात्रय मचाले यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. टी.एस. पाटील, डॉ. भारती पाटील, डॉ. केशव हरेल, डॉ. ईस्माईल पठाण, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. शरद गायकवाड, डॉ. भारतभूषण माळी, डॉ. सुरेश शिखरे, डॉ. प्रभंजन माने, डॉ. अक्षय सरवदे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes