डॉ.नरेंद्र वैद्य, (सांधेरोपणतज्ज्ञ) - मानेच्या अथवा पाठीच्या मणक्यांची विशिष्ट रचना असते. दोन मणक्यांमध्ये चकतीसारखा भार असतो, त्यास ‘इन्टरव्हर्टिब्रल डिस्क’ असे म्हणतात. चकतीचा दाब मणक्यामधून जाणाऱ्या मज्जारज्जूवरील नसांवर पडतो. अशावेळी पाठदुखी, मानदुखी, हातांमध्ये अथवा पायांमध्ये जाणवणाऱ्या वेदना, मुंग्या येणे, हातापायांमध्ये बधिरता जाणणे, हातामध्ये अथवा पायांमध्ये ताकद कमी होणे, अशी लक्षणे आढळून येतात. क्ष-किरण, एमआरआय अथवा सि टी स्कॅनसारख्या निदान तपासणीच्या रिपोर्टच्या आधारावर रुग्णांच्या लक्षणांशी आणि तपासणी निष्कर्षांच्या आधारे गरजू रुग्णांना सर्जन शस्त्रक्रियेचा सल्ला देतात. शस्त्रक्रिया हा शब्द ऐकताच अनेक शंका-कुशांका, समज-गैरसमजांचे मळभ रुग्णांच्या मनात दाटून येते. त्या विषयी सविस्तर ऊहापोह करूया.
मणक्यांच्या चकतीच्या आजारांवर शस्त्रक्रिया हाच उपाय असतो.
काही तपासणी निष्कर्षांच्या आधारे मणक्यातील चकतीचा आजार आहे, हे समजाच शस्त्रक्रियेच्या भीतीपोटी रुग्ण उपचारांना घाबरतात. पाठदुखी व मानदुखी या समस्यांनी ग्रस्त रुग्णांपैकी सर्वांनाच शस्त्रक्रियेची गरज असत नाही. केवळ ५ ते १० रुग्णांमध्ये लक्षणे तीव्र असतील, मुंग्या येणे, बधिरता असणे, ताकदीवर परिणाम होणे असे धोके संभवत असतील, तर तपासणी आणि रिपोर्टच्या तर्कसुसंगतीने सर्जन शस्त्रक्रिया सांगतात. सलग बैठे काम, बदलती जीवनशैली, व्यायामाचा आभाव, अयोग्य शारीरिक स्थितीत बसणे, हालचालींमुळे, असंतुलीत आहार, मोबाईल, संगणकावर चुकीच्या स्थितीत दीर्घकाळ काम करणे, याचा परिपाक म्हणून पाठदुखी आणि मानदुखीसारखी लक्षणं आढळतात. वेदनाशामक औषधे, लो इम्पॅक्ट व्यायाम, भौतिकोपचार, योग्य स्थितीची सवय, पुरेसा आराम यासारख्या उपायांनी बहुतांशी रुग्णांना विनाशस्त्रक्रियाच आराम मिळतो. सुरुवातीच्या काळात मणक्यांमध्ये इंजेक्शन देऊनही वेदना कमी केल्या जातात.
शस्त्रक्रिया झाली की लगेचच संपूर्ण मुंग्या थांबतात.
मणक्यावरील चकतीचा दाब मज्जारज्जूतल्या नसांवर पडून रुग्णांना तीव्र स्वरूपाच्या वेदना व इतर गंभीर धोकादायक लक्षणे आढळत असतील, तर शस्त्रक्रियेद्वारे या चकतीचा खराब भाग काढून दाब काझला जातो व मणकेही स्थिरता यावी म्हणून जोडले जातात. शस्त्रक्रियेनंतर वेदना कमी, मुंग्या होणे हे लगेचच दिसून येते. बऱ्याचदा या चकतीचा भाग नसांवर दीर्घकाळ असेल, तर नसांच्या ठिकाणी पर्मनंट डॅमेज (कायमस्वरूपी खराब होणे) झालेले असते. अशावेळी शस्त्रक्रियेनंतर रुग्णांत काही प्रमाणात वेदनांपासून नक्की आराम मिळतो. परंतु, मुंग्या कमी होणे, बधीरता ही लक्षणे पूर्णतः कमी होत नाहीत. शस्त्रक्रियेचा उद्देश, हा नसांवर पडणारा दाब कमी करून पुढील संभाव्य धोके टाळणे, हा सुद्धा असतो, हे लक्षात घ्यायला हवे. तसेच नसांच्या खराब भागास बरे होण्यासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा, हे ही लक्षात घ्यायला हवे.
मणक्यावरील शस्त्रक्रियेचे गंभीर साइड इफेक्ट्स असतात.
प्रत्येक शस्त्रक्रियेचे फायदे तसेच काही धोकेही संभवतात. रुग्णांना असणाऱ्या लक्षणांची तीव्रता लक्षात घेऊन तात्पुरत्या औषधोपचाराने, व्यायामाने, अन्य उपचारांनी आराम मिळाला नाही, तर रुग्णाचे हित लक्षात घेता शस्त्रक्रियेचा मार्ग अवलंबला जातो. आजमितीला वैद्यकशास्त्रातील संशोधनामुळे मणक्यांच्या अवघड, गुंतागुतीच्या शस्त्रक्रिया आता दुर्बिणीद्वारे मायक्रोस्कोपच्या सहाय्याने ‘मिनीमल इनव्हॅसिव्ह’ पद्धतीने केल्या जातात. अत्यंत छोटा छेद, कमीत कमी रक्तदाब, अत्याधुनिक यंत्रोपकरणांच्या मदतीने तंत्रज्ञामाच्या सहाय्याने नेमका खराब भाग काढून शस्त्रक्रियेत अचूकता आणली जाते. त्यामुळे शस्त्रक्रियेतील धोकेही कमी होतात आणि रुग्णाला जलद आरामही मिळतो. शस्त्रक्रियेपूर्वीच जर रुग्णांच्या हाताची अथवा पायांची ताकद कमी झाली असेल, तर शस्त्रक्रियेनंतर ती गेलेली ताकद परत येईलच, या विषयीची खात्री देता येत नाही. ३० ते ४० टक्के रुग्णांमध्ये त्या ताकदीत सुधारणा झालेली आढळते; पण जर शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णांची ताकद व्यवस्थित असेल, तर मात्र शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या ताकदीवर परिणाम होऊन कमी होण्याची शक्यता नसते. या शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वी सिद्ध झाल्या आहेत. केवळ दोन टक्के रुग्णांमघध्येच अयशस्वी झाल्याचे दिसते.