आरती भाळवणे (मावळ, पुणे) - वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस सब इन्स्पेक्टर मोहिते यांनी काल शुक्रवार दिनांक २३ रोजी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा कान्हे येथील सर्व विद्यार्थ्यांना बाल अत्याचार विरोधी कायदा, शालेय विद्यार्थ्यांना "गुड टच, बॅड टच " या संदर्भात माहिती देत मुलींसाठी असणारी "निर्भया "योजना समजावून सांगितली.
सर्व शालेय विद्यार्थ्यांना अन्यायाविरोधात नेहमीच आवाज उठवून अत्याचारी व्यक्तीला वेळीच प्रतिबंध केला पाहिजे. यासाठी आपले पालक, शिक्षक यांचेशी न घाबरता अशा गोष्टीबाबत चर्चा केली जावी यासाठी मार्गदर्शन केले. तर आपल्या सोबत शाळेत शिक्षण घेणाऱ्या सर्व मुली ह्या आपल्या बहिणी आहेत. आणि त्यांचेशी आदराने आणि सामंजस्याने वागणे ही आपली जबाबदारी आहे, हे सर्व मुलांना मार्गदर्शनात सांगितले.
आपल्या अवतीभोवती तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधून माहिती द्यावी असे वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस सब इन्स्पेक्टर मोहिते यांनी सांगितले. यावेळी त्यांचे समवेत आलेले तावरे यांनीही सर्व मुलांना "गुन्हा " कशाला म्हणतात आणि आपली वर्तणूक कशी असावी, समाजातील अन्याय, अत्याचार आणि बालगुन्हेगारी विषयी माहिती दिली. तसेच पोलीस आपले कसे मित्र आहेत, हे समजावून सांगितले.
शाळेत एक तक्रार पेटी उपलब्ध करून ज्यांना काही अडी अडचणी असतील त्यांनी पेटीत तक्रार लिहून टाकावी. आणि शाळेने अशा तक्रारीची दखल घेवून मुला मुलींच्या समस्या बाबत जागरूक राहून पोलीस स्टेशनशी संपर्क ठेवावा असे सांगण्यात आले. यापुढे आपल्या शाळेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दरमहा शाळाभेट करून सर्व मुलामुलींना निर्भीडपणे शिक्षण घेता यावे यासाठी सतत सहकार्य केले जाईल असे सांगितले. आजच्या कार्यक्रमाचे संयोजन, आपल्या कान्हे शाळा व्यवस्थापन समितीच्या क्रियाशील सदस्या सौ. आरतीताई भाळवणे आणि स्वप्नालीताई आरोटे यांनी केले होते. याप्रसंगी मोहिते यांचे स्वागत आणि सत्कार, कान्हे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मंगला ढोरे आणि आरतीताई भाळवणे यांनी केले. तर सहाय्यक पोलीस अधिकारी गायकवाड यांचे स्वागत आणि सत्कार, ज्येष्ठ शिक्षिका सौ. सविता क्षीरसागर आणि जिजाराम काळडोके यांनी केले. तसेच पोलीस कर्मचारी तावरे यांचे स्वागत आणि सत्कार, स्वप्नालीताई आरोटे आणि अनिता ढगे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दादासाहेब खरात यांनी केले तर सर्वांचे आभार जिजाराम काळडोके यांनी मानले. सदर कार्यक्रमांस सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. सर्व मुला मुलींनी "पोलीस मित्र" ही संकल्पना खूप छान असल्याची आणि मनातील भीती दूर करून निर्भय होण्यासाठी उपयुक्त असल्याची समाधानी प्रतिक्रिया व्यक्त केली.