सुशांत पोवार (मुंबई) - उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मनोहर बनसोडे यांचे निलंबनाचे आदेश आयुक्तालयाकडून आले आहेत. ही कारवाई १०८ अॅम्ब्युलन्स वेळेत न आल्यामुळे रुग्णाच्या मृत्यूशी संबंधित आहे. या प्रकरणात विधानसभेत तारांकित प्रश्न विचारण्यात आला होता, ज्यानंतर डॉ. बनसोडे यांच्यावर कारवाई करण्यात आली.
तर प्रकरण असे आहे, राहुल इंधाते नावाच्या रुग्णाची प्रकृती २३ जानेवारी रोजी खालावल्याने १०८ रुग्णवाहिका मिळण्यासाठी संपर्क केला होता. मात्र, दोन तासांनंतरही रुग्णवाहिका येऊ शकणार नव्हती, ज्यामुळे रुग्णाच्या मृत्यूस हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आला. मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर हे २०० खाटांचे सामान्य रुग्णालय असून, येथे भिषक, शल्यचिकित्सक, इतर विशेषतज्ञ व अत्यावश्यक सोई सुविधा उपलब्ध असताना रुग्ण संदर्भित का केला याची चौकशी समितीने ठपका ठेवला आहे.
चौकशी समितीने केलेल्या चौकशीमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक यांनी खुलासा सादर केला आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, रुग्णावर उपचार सुरू होते. रुग्णाची प्रकृती खालावल्यामुळे कर्तव्यावर असलेल्या डीएमओ डॉ. श्रद्धा लाड यांनी रुग्णाला पुढील उपचारासाठी वरिष्ठ उपचार केंद्राकडे संदर्भित केले होते. रुग्णाच्या नातेवाईकांनी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमधील डॉ. अन्सारी यांना संपर्क साधला असता नातेवाईकांना डॉ.अन्सारी यांनी रुग्णवाहिका येण्यासाठी २ तास लागतील असे सांगितले होते. डॉ. श्रद्धा लाड यांनी रुग्णवाहिकेची उपलब्धता लक्षात घेता आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरासाठी रुग्णालयाकडे राखीव ठेवलेल्या १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचा संपर्क करून उपलब्ध करून देणे गरजेचे होते. मात्र, तसे केले नसल्याचे खुलासामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सांगितले आहे. रुग्णाची गंभीर परिस्थिती पाहता जिल्हा शल्य चिकित्सक दररोज राउंड घेतात त्यावेळी त्यांना सदरची परिस्थिती सांगणे गरजेचे होते, परंतु वैद्यकीय अधिकारी, डीएमओ तसेच कक्षामधील परिचर्या कर्मचारी यांनी तसे कोणतीही बाब जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या निदर्शनास आणून दिली नाही असे खुलासामध्ये सांगितले आहे.
डॉ. बनसोडे यांनी दिलेल्या खुलासामध्ये त्यांनी कोणतीही हलगर्जीपणा केला नसल्याचे सांगून सत्य परिस्थिती पाहता कोणतीही प्रशासकीय कारवाई करू नये असे सांगितले असताना त्यांच्यावर आयुक्तालयाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. चौकशी समितीचे ताशेरे आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांचा खुलासा पाहता प्रथमदर्शनी चोर सोडून संन्याशाला फाशी ? देण्याचा प्रकार झाल्याचे दिसत आहे.