जमीर शेख : खासदार संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेना फुटली आहे. त्यामुळे त्यांना मी महत्त्व देत नाही. तर शरद पवार जे बोलतात ते कधीच खरे ठरत नाही, असा टोला लगावत या दोन्ही दिग्गज नेत्यांवर माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घणाघाती टीका केली आहे.
राज्यामध्ये बंड झाल्यानंतर यामध्ये शंभूराज देसाई यांनी शिवसेनेशी वैर घेत शिंदे गटांमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या पंधरा-वीस दिवसांमध्ये झालेल्या राजकीय घडामोडीनंतर आज आमदार शंभूराजे देसाई हे साताऱ्यात आले होते. त्यांनी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला. आपण शिवसेनेतून शिंदे गटामध्ये सामील का झालो? याबद्दलच्या अनेक घटना पत्रकारांना सांगितल्या. खासदार संजय राऊत यांनी पक्षांमध्ये वेळोवेळी केलेली ढवळाढवळ आणि आमदारांना दिलेली दुजाभावची वागणूक याच, घटनेला विरोध करत 40 आमदार शिवसेनेतून बाहेर पडले आहेत.
संजय राऊत यांनी पैसे घेतल्याचा पुरावा द्यावा राजकारण सोडून घरी बसेन, त्यामुळे आम्ही संजय राऊतांच्या कोणत्याही वक्तव्याला जास्त किंमत देणार नाही अशी टिका आमदार शंभूराज देसाई यांनी केली. राज्यांमध्ये मध्यवर्ती निवडणुका लागतील असं भाकीत करणाऱ्या खासदार शरद पवार यांचं भाकीत देखील सत्य नसून शरद पवार जे बोलतात ते कधीच पूर्ण होत नाही, हे अनेकदा अनुभवायला मिळालं आहे असं सांगत शंभूराज देसाई यांनी या दोन्ही नेत्यांवर टीका केली आहे.