चंद्रकांत मंडले : कवठे महांकाळ पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ९ ऑक्टोबर रोजी दुपारी साडे बारा वाजणेच्या सुमारास हत्तीचे दात विकण्यासाठी आलेल्या चौघांना कवठे महांकाळ पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून हत्तीचे दात,तीन मोटारसायकल आणि इतर साहित्य असा जवळपास वीस लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राहुल भीमराव रायकर ( वय२६,रा.-कसबा बावडा, कोल्हापूर),बालाजी हरिश्चंद्र बनसोडे( वय३०,रा.-विजयनगर,कोल्हापूर),कासिम शमशुद्दीन काझी( वय २०,रा.-मिरज) आणि हणमंत लक्ष्मण वाघमोडे,वय ३९, रा.-लोणारवाडी,कवठे महांकाळ)अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.हे चौघेजण खरशिंग ते दंडोबाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या मठासमोर झाडाझुडपात हत्ती या वन्य प्राण्यांचे हस्तिदंत सदृश्य दात विक्री करणेकरिता आले बाबत माहिती कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात मिळाली.त्यानुसार कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल आटपाडकर आणि पोलीस नाईक फकीर यांच्या पथकाने सापळा रचून या चौघांना अटक केली.
कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात या चौघा विरोधात वन्यजीव संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक फकीर करीत आहेत.