Breaking : bolt
सिंधुदुर्गच्या आरोग्य यंत्रणेला मोठा धक्का !आरोग्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात औषधांचा दुष्काळ, तांत्रिक मान्यतेतील कथित त्रुटींमुळे प्रशासकीय मान्यता प्रस्तावाला ब्रेक..?फलटणच्या रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय ?रुग्णालये वाचवायची की फाईली ?औषधांकडे FDA चे लक्ष वळले… आता शासकीय रुग्णालयांतील औषधसाठ्याचीही ‘अग्निपरीक्षा’ झाली पाहिजे !चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर आयुक्तांना धारेवर धरले; आरोग्य विभागाची प्रतिष्ठा वाचणार की ‘सॉफ्ट टार्गेट’चा खेळ होणार ?नवीन इमारत, जुनीच चूक आणि तीन चिमुकल्यांचा अंत !अमरावतीत व्हेंटिलेटरच्या स्फोटानंतर NICU मध्ये भीषण आग, तीन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू तर सहा बालकांची प्रकृती गंभीरसेल काउंटरच्या खरेदीत ‘दराचा खेळ’, १,१११ मशीनच्या खरेदीत तब्बल १२.३५ कोटींचा फरक ?औषध खरेदीत पुरवठादारांची मक्तेदारी मोडा, शासनाने उत्पादकाकडून थेट खरेदी करावी !

जाहिरात

 

सिंधुदुर्गच्या आरोग्य यंत्रणेला मोठा धक्का !

schedule05 Sep 26 person by visibility 32 categoryमहाराष्ट्रकोल्हापूरसिंधुदुर्गआरोग्य विभाग

सुशांत पोवार (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शासकीय आरोग्य यंत्रणेत एक मोठी घडामोड समोर आली असून, सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी आपल्या शासकीय पदाचा राजीनामा दिला आहे. अनेक वर्षे सिंधुदुर्गच्या आरोग्य व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या डॉ. पाटील यांच्या राजीनाम्याने वैद्यकीय क्षेत्रासह जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत चर्चेला उधाण आले आहे.
          डॉ. श्रीपाद पाटील यांनी आपला राजीनामा शासनाकडे पाठवला असून, शासकीय सेवेतून मुक्त होण्याचा निर्णय ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, त्यांचे सध्याचे वय सुमारे 53 वर्षे 6 महिने असून, नियमानुसार सेवानिवृत्तीपर्यंत त्यांच्याकडे अजूनही सुमारे साडेपाच वर्षांचा कालावधी शिल्लक होता. त्यामुळे कार्यक्षम सेवाकाळ असतानाच त्यांनी घेतलेला हा निर्णय आरोग्य विभागासाठी निश्चितच महत्त्वाचा मानला जात आहे.

अनेक वर्षांची सिंधुदुर्गशी नाळ

         डॉ. श्रीपाद पाटील यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेवा काही महिन्यांची किंवा काही वर्षांची नाही. त्यांनी जिल्हा रुग्णालयात निवासी शल्य चिकित्सक म्हणून अनेक वर्षे सेवा बजावली. त्यानंतर गेल्या दोन-तीन वर्षांपासून ते जिल्हा शल्य चिकित्सक या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी सांभाळत होते. जिल्हा रुग्णालय हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्यसेवेचे प्रमुख केंद्र आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी सातत्याने संपर्क येणारे पद म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सक. या भूमिकेत डॉ. पाटील यांनी काम करताना जिल्ह्यातील विविध भागांतील नागरिक, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधींशी सातत्याने संपर्क ठेवला. त्यामुळे डॉ. पाटील यांच्या राजीनाम्याचा परिणाम केवळ एका अधिकाऱ्याच्या पदावर होणार नसून, जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासकीय आणि वैद्यकीय कामकाजावरही त्याची छाया पडणार का ? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

कार्यक्षम अधिकारी असताना राजीनामा का ?

        डॉ. श्रीपाद पाटील यांनी आपला राजीनामा वैयक्तिक कारणास्तव देत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या निर्णयामागे कोणतेही अन्य कारण असल्याचे त्यांनी सांगितलेले नाही. मात्र, एक प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो सेवानिवृत्तीला अजून साडेपाच वर्षांचा कालावधी असताना एका अनुभवी आणि जबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्याने शासकीय सेवेतून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला ? हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
         कारण शासकीय आरोग्य यंत्रणेत अनुभवी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असताना, वर्षानुवर्षे जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला जवळून जाणणारा अधिकारी स्वतःहून सेवेतून बाहेर पडत असेल, तर त्या निर्णयाकडे केवळ प्रशासकीय बाब म्हणून पाहून चालणार नाही. तथापि, डॉ. पाटील यांनी स्वतः वैयक्तिक कारण हेच राजीनाम्याचे कारण असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाबाबत कोणतेही तर्क-वितर्क किंवा अप्रमाणित कारणे जोडणे योग्य ठरणार नाही.

‘सरकारी सेवा सोडणार, पण वैद्यकीय सेवा नाही !’

         डॉ. श्रीपाद पाटील यांच्या राजीनाम्याच्या बातमीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ते वैद्यकीय क्षेत्रातून पूर्णपणे बाहेर जाणार नाहीत. सेवेतून मुक्त झाल्यानंतर काय करणार, असा प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्ट केले की, वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर वैद्यकीय सेवा देणार आहेत. म्हणजेच शासकीय सेवेचा अध्याय संपल्यानंतरही त्यांचा वैद्यकीय सेवेचा प्रवास सुरूच राहणार आहे. ही बाब महत्त्वाची आहे. कारण सरकारी सेवेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असला, तरी वैद्यकीय ज्ञान आणि अनुभवाचा उपयोग पुढेही रुग्णसेवेसाठी करण्याचा त्यांचा मानस असल्याचे यातून स्पष्ट होते.
         सिंधुदुर्ग हा भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक जिल्हा आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना उच्चस्तरीय उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत जिल्हा शल्य चिकित्सकाचे पद केवळ प्रशासकीय पद राहत नाही तर ते जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचे केंद्रबिंदू ठरते. अशा पदावर काम करण्यासाठी प्रशासकीय अनुभवासोबतच स्थानिक परिस्थितीची जाण, रुग्णालयातील मनुष्यबळाची माहिती, उपलब्ध वैद्यकीय सुविधा, विविध आरोग्य केंद्रांशी समन्वय आणि स्थानिक पातळीवरील प्रत्यक्ष अनुभव आवश्यक असतो.
        डॉ. पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीर्घकाळ सेवा बजावल्यामुळे या सर्व बाबींचा त्यांना अनुभव होता. त्यामुळे आता त्यांच्या राजीनाम्यानंतर या महत्त्वाच्या पदावर कोणाची नियुक्ती होते आणि नव्या अधिकाऱ्याला सिंधुदुर्गच्या आरोग्य व्यवस्थेशी जुळवून घेण्यासाठी किती वेळ लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजीनामा मंजूर झाल्यानंतर पुढील प्रक्रिया काय ?

        डॉ. पाटील यांनी शासनाकडे राजीनामा पाठवला आहे. आता शासनाच्या पातळीवर त्याबाबतची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. राजीनामा स्वीकारल्यानंतर त्यांना अधिकृतपणे शासकीय सेवेतून मुक्त केले जाईल. यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक पदाची जबाबदारी कोणाकडे सोपवायची, याबाबत आरोग्य विभागाकडून निर्णय घेतला जाईल. दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक पद रिक्त राहू नये आणि रुग्णालयाच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा कोणताही विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी शासनाने तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
        डॉ. श्रीपाद पाटील यांच्या राजीनाम्याची माहिती समोर आल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांसाठी हा निर्णय अनपेक्षित मानला जात आहे. कारण शासकीय सेवेत अजून साडेपाच वर्षांचा कालावधी शिल्लक असताना अनुभवी डॉक्टरने स्वेच्छेने सेवेतून बाहेर पडणे ही नेहमीची बाब नाही. विशेषतः जिल्हा रुग्णालयाच्या पातळीवर काम करताना अनेक वर्षांत निर्माण झालेला अनुभव, प्रशासकीय समन्वय आणि रुग्णसेवेची प्रत्यक्ष माहिती ही आरोग्य व्यवस्थेची मोठी ताकद असते. त्यामुळे एका अनुभवी अधिकाऱ्याची सेवा संपत असताना त्याच्या जागी येणारा अधिकारी त्या अनुभवाची उणीव कितपत भरून काढतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
        डॉ. श्रीपाद पाटील यांच्या राजीनाम्याचा निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्याबाबत त्यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाचा आदर करणे आवश्यक आहे. मात्र, त्याचवेळी सिंधुदुर्गच्या आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी शासनाची आहे. जिल्हा शल्य चिकित्सक हे पद रिक्त झाल्यानंतर त्यावर तातडीने सक्षम, अनुभवी आणि प्रशासन हाताळण्याची क्षमता असलेल्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाली पाहिजे. कारण प्रश्न केवळ एका अधिकाऱ्याच्या बदलीचा किंवा नियुक्तीचा नाही.
        जिल्हा रुग्णालयातील उपचार व्यवस्था, औषधसाठा, मनुष्यबळ, शस्त्रक्रिया, आपत्कालीन सेवा, विविध आरोग्य केंद्रांशी समन्वय आणि प्रशासकीय निर्णय या सर्वच बाबींवर जिल्हा शल्य चिकित्सकाची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे शासनाने या पदाकडे केवळ रिक्त जागा म्हणून न पाहता जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा म्हणून पाहणे गरजेचे आहे.

‘निर्भीड पोलीस टाइम्स’चा सवाल

       डॉ. श्रीपाद पाटील यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयामागे वेगळी कारणे असल्याचा दावा करण्याचे कोणतेही कारण नाही. परंतु एवढे मात्र नक्की सेवानिवृत्तीला साडेपाच वर्षे शिल्लक असताना एका अनुभवी जिल्हा शल्य चिकित्सकाने शासकीय सेवा सोडण्याचा निर्णय घेतला आहे, ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी नाही. या निर्णयामुळे सिंधुदुर्गच्या आरोग्य व्यवस्थेत निर्माण होणारी पोकळी तातडीने भरून काढणे आवश्यक आहे. अनुभवाची जागा केवळ पदभरतीने भरून निघत नाही.
अनुभवाला वर्षे लागतात आणि रुग्णसेवेत त्याची किंमत मोठी असते. डॉ. श्रीपाद पाटील यांनी शासकीय सेवेला निरोप देण्याचा निर्णय घेतला असला, तरी ते वैद्यकीय क्षेत्रातच कार्यरत राहणार आहेत, ही निश्चितच दिलासादायक बाब आहे. आता शासनाने पुढचा निर्णय घेताना एकच गोष्ट लक्षात ठेवावी सिंधुदुर्गच्या आरोग्य व्यवस्थेला ‘चार्ज घेणारा अधिकारी’ नको तर ‘जबाबदारी उचलणारा अनुभवी अधिकारी’ हवा ! कारण जिल्हा रुग्णालयात खुर्ची रिकामी राहणे ही प्रशासकीय बाब असू शकते पण त्या खुर्चीवर सक्षम नेतृत्वाचा अभाव निर्माण होणे हा थेट रुग्णसेवेचा प्रश्न आहे. डॉ. श्रीपाद पाटील यांच्या पुढील वैद्यकीय वाटचालीस शुभेच्छा आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर सिंधुदुर्गच्या आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर येणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes