सुशांत पोवार (संपादकीय) - संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूरचे सांस्कृतिक वैभव अशी ओळख असलेल्या या नाट्यगृहाला गुरुवारी रात्री भीषण आग लागली. या आगीमध्ये हे नाट्यगृह पूर्णपणे भस्मसात झाले. केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या आदल्या रात्री हि घटना घडल्याने कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. १०० वर्षांपेक्षा जास्त सांस्कृतिक वारसा असलेले हे नाट्यगृह आगीमध्ये बेचीराग झाल्याने कलाकार आणि नाट्य रसिकांना अश्रू अनावर झाले. अनेक कलाकारांनी नाट्यगृहाच्या पुनर्निर्मानाची मागणी हि सरकारकडे केलेली असून त्यासाठी आपणसुद्धा हातभार लावायला तयार आहोत असा पुढाकार दर्शवला आहे. राज्य सरकारकडून सुद्धा नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी निधी जाहीर करण्यात आला आहे. सुदैवाने या आगीमध्ये जीवितहानी झाली नसली तरी कलाकारांचे कला वैभव एका रात्रीमध्ये उद्वस्थ झाल्याचे म्हंटले जात आहे. पण केशवराव भोसले नाट्यगृहाला आग नक्की कशी लागली ? ८ ऑगस्टच्या रात्री कोल्हापुरात काय घडले ? त्यावर निर्भीड पोलीस टाइम्सचे संपादक सुशांत पोवार यांनी टाकलेली संपादकीय एक नजर......
९ ऑगस्टला होणाऱ्या संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंती निमित्त कोल्हापुरात खासबाग परिसरातल्या केशवराव भोसले नाट्यगृहात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यसंचालनालयतर्फे हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी नाट्यगृहाच्या शेजारी मोठा मंडप आणि आणि काही सेटसुद्धा उभारण्यात आले होते. तसेच ९ ऑगस्टला सकाळी १० वाजता केशवराव भोसले यांच्या जीवनावरील छायाचित्रणाचे प्रकाशन हि होणार होते. त्यासाठी नाट्यगृहाच्या आवारात छायाचित्र हि लावण्यात आली होती. ८ ऑगस्टच्या संध्याकाळी सुद्धा ह्या नाट्यगृहात एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमावेळी नाट्यगृह प्रेक्षकांनी तुडुंब भरले होते. पण हा कार्यक्रम रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी संपला. त्यामुळे नाट्यगृह रात्री ९ पर्यंत रिकामी झाले होते. ह्या नाट्यगृहाला लागुनच कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेले खासबाग मैदान आहे. नाट्यगृहाच्या शेजारीच प्रसिध्द अशी खाऊ गल्ली आहे. त्यामुळे हा परिसर तसा गजबजलेला असतो. खाऊगल्लीतील प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साधारण ९ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास नाट्यगृहातून स्फोटाचा मोठा आवाज झाला. तेव्हा लोक नाट्यगृहाच्या दिशेने धावले. तेव्हा नाट्यगृहाच्या एसी युनिटमध्ये आग लागून त्यातून धूर येत होता. हि आग हळूहळू वाढायला लागली होती. तर काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे नाट्यगृहाच्या मागे असणाऱ्या जनरेटरमध्ये शोर्ट सर्किट झाल्यामुळे जनरेटरने पेट घेतला आणि या आगीने रौद्ररूप धारण केले. नाट्यगृहाचा बराचसा भाग लाकडी असल्यामुळे आग झपाट्याने वाढत गेली. नाट्यगृहाच्या गॅलरीत लागलेल्या आगीचे लोट अगदी छतापर्यंत पोहचले आणि हि आग संपूर्ण नाट्यगृहात पसरली. ह्या दुर्घटनेबद्दल तातडीने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. रात्री ९:४५ च्या सुमारास अग्निशामक दलाच्या ८ ते ९ गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या. पण तोपर्यंत फक्त १५ मिनिटात नाट्यगृहाचे छत, लाकडी रंगमंच, खुर्च्या या सगळ्यांनीच पेट घेतला होता. रात्री १० वाजता प्रेक्षक गॅलरीचे छत कोसळून आकाशात आगीचे मोठ - मोठे लोट दिसायला लागले. या आगीची धग २० ते २५ फुटांपर्यंत जाणवत होती असे सांगण्यात येत आहे. नाट्यगृहात जायचे दरवाजे बंद असल्यामुळे अग्नीशामक दलाच्या जवानांनी दारे खिडक्या उघडून आतल्या बाजूची आग विझवण्यासाठी प्रयत्न चालू केले. पण कार्यक्रमासाठी घालण्यात आलेल्या मंडपामुळे अग्निशामक दलाचे बंब हे आतपर्यंत पोहचायला अडथला येत होता. त्यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेरूनचं पाण्याचे फवारे मारायला सुरुवात केली. काही जवान हे स्टेजच्या बाजूने आत जाऊन आतील आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. पण धुरामुळे त्यांना आग विझवायला त्रास होत होता. संध्याकाळ नंतर पाऊस हि बंद झाल्यामुळे बंबंमधून पाणी मारणे चालू होते. पण आग क्षमण्याचे काही नाव घेत नव्हते. संपूर्ण केशवराव भोसले नाट्यगृह हे आगीच्या भक्ष्यस्थानी गेले हि आग पसरत मागे असलेल्या खासबाग कुस्ती मैदानापर्यंत सुद्धा पोहचली. तिथे असलेले लाकडी खांब एकामागोमाग एक कोसल्यामुळे इथल्या कमानी कोसळल्या. मैदानातल्या प्रेक्षक गॅलरीनी हि पेट घेतला सातत्याने पाण्याचा मारा करावा लागल्यामुळे महानगरपालिकाच्या अग्निशामक दलाचे बंबसुद्धा अपुरे पडायला लागले. तेव्हा प्रशासनाकडून तातडीने कागल, पेठवडगाव, जयसिंगपूर, हातकणंगले येथून अग्निशामक दलाचे बंब मागवण्यात आले. महानगरपलिकेचा टर्नटेबललँडर सुद्धा घटनास्थळी दाखल झाला. इतर बंबांचे पाणी टर्नटेबललँडरला जोडण्यात आले. हळूहळू ह्या टर्नटेबललँडरद्वारे नाट्यगृहाच्या छतावरून पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण पाण्याने पूर्ण भरलेला टर्नटेबललँडर ५ मिनिटात रिकामा झाला. तरी आग काही थांबली नाही. तेव्हा खाजगी टॅकर पुरवठाधारकांना सुद्धा टॅकर पुरवण्याची विनंती करण्यात आली. रात्री साधारण ११:३० वाजता कोल्हापूर विमानतळावरचा लँडर मागवण्यात आला. आमदार सतेज पाटील, सचिन चव्हाण यांनी मिळेल तेथून पाण्याचे टॅकर आणले.
या आगीची माहिती शहरामध्ये वाऱ्यासारखी पसरली होती आणि त्या ठिकाणी मोठी गर्दीसुद्धा उसळली होती. आसपासचे रस्ते, गल्ल्या, गर्दीने भरून गेल्या. आगीचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी लोकांनी गर्दी केल्यामुळे आग विझवण्यात अडचणी येत होत्या असे सांगण्यात येत आहे. तेव्हा जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज हि करावा लागला. अखेर तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर रात्री १२ वाजता आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले. पण तोपर्यंत या आगीमध्ये नाट्यगृह आणि कुस्ती मैदानासह तब्बल ५० कोटींचे नुकसान झाल्याची माहिती हि समोर आली आहे.
१०० वर्षांचा कलेचा वारसा काही तासांमध्ये उद्वस्त झाल्यामुळे कलाकारांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. नाट्यगृह नव्याने उभे करण्यासाठी सरकारकडे मागणी करण्याबरोबरचं कलाकारांनीसुद्धा त्यासाठी हातभार लावायला पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा नाट्यगृह पुन्हा उभारण्यासाठी तातडीने २० कोटींच्या निधीची घोषणा केली. पण या आगीसाठी आता प्रशासनालासुद्धा जबाबदार धरले जात आहे. हि आग प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आणि निकृष्ठ दर्जाच्या कामामुळेच लागली असा आरोप करण्यात येत आहे.
१९७९ पर्यंत या नाट्यगृहाचा ताबा राज्य सरकारकडे होता. त्यानंतर तो कोल्हापूरच्या महानगरपालिकेकडे देण्यात आला. १९८० ते १९८४ आणि २००३ ते २००५ या काळामध्ये नाट्यगृहाचे नुतनीकरण करण्यात आले होते. नाट्यगृहात लाकूड, प्लायवूड आणि फोमपासून तयार केलेल्या वस्तू असताना सुद्धा आग लागल्यावर ती नियंत्रणात आणण्यासाठी सक्षम यंत्रणा नाट्यगृहात नसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच एसी युनिट आणि इलेक्ट्रोनिक रूमचे नुतनीकरनानंतर फायर ऑडीटसुद्धा झाले नसल्याचे आरोप होत आहेत. या सुविधांसाठी महानगरपलिकेकडे पाठपुरावा करण्यात आला. पण निधी अभावी कामे लांबणीवर पडल्याचे मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी म्हंटले आहे. खासबाग मैदान आणि नाट्यगृहाच्या शताब्दी वेळी २०१५ मध्ये राज्य सरकारकडून नुतनीकरनासाठी मोठा निधी देण्यात आला होता. त्यातून फक्त पहिला टप्पा पूर्ण झालेला असून दुसऱ्या निधीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एकंदरीतचं नाट्यगृहातील व्यवस्थेबाबत हि प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
इतक्या वर्षात जे घडले नाही ते आताचं का घडले ? ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे हि सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे याबाबत समिती नेमून चौकशी करण्याची मागणी संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून करण्यात आली आहे. खरेतर संगीतसूर्य केशवराव भोसले या नाट्यगृहाला तब्बल १०९ वर्षाचा मोठा आणि वैभवशाली इतिहास आहे. कोल्हापुरात कुस्त्यांचे जंगी मैदान बांधल्यानंतर नाट्यकला रुजवण्यासाठी शाहू महाराजांनी मैदानाशेजारीच नाट्यगृह बांधण्याची योजना आखली होती. त्यासाठी रोम मधल्या नाट्यगृहाच्या बांधणीचा आभ्यास करून त्यानुसार कोल्हापुरात नाट्यगृह बांधण्याचे त्यांनी ठरवले होते. या नाट्यगृहाचे बांधकाम सुद्धा एका खास वैशिठ्याने करण्यात आले आहे. जेव्हा कोल्हापुरात वीज आली नव्हती तेव्हा फक्त गॅसबत्तीच्या दिव्यांच्या उजेडात आणि माईकशिवाय प्रेक्षकांना नाटक आणि नाट्यसंगीताचा आस्वाद घेता येईल असे या नाट्यगृहाचे बांधकाम करण्यात आले होते. १९१३ ते १९१५ या काळामध्ये नाट्यगृहाचे बांधकाम पूर्ण झाले होते. या नाट्यगृहाच्या रंगमंचाखाली १० फुट खड्डा असून ती आधी विहीर होती असे सांगितले जाते. गॅलरी आणि रंगमंचाचे बांधकाम सागवानी लाकडापासून करण्यात आले होते. ह्या नाट्यगृहाला पॅलेस थेटर असे नाव देण्यात आले होते. अनेक दिग्गज कलाकारांनी या रंगमंचावरून सुरुवात करून आपली कारकीर्द घडवली आहे. १९५७ मध्ये ह्या नाट्यगृहाचे नामांतर संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह असे करण्यात आले होते. कोल्हापुरात जन्म झालेल्या केशवराव यांनी वयाच्या ४ थ्या वर्षी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले. केशवरावांच्या अल्पशा कारकिर्दीत त्यांना शाहू महाराजांनी मोलाचे सहकार्य केले होते. विशेष म्हणजे ते शाहू महाराजांचे अत्यंत लाडके कलावंत होते. म्हणूनच ह्या नाट्यगृहाला केशवराव भोसले नाट्यगृह असे नाव देण्यात आले होते. ह्या नाट्यगृहाने अनेक स्थानिक कलावंतांना वाव दिला आहे. कोल्हापूरला नाट्य आणि कलेची पंढरी करण्यात ह्या नाट्यगृहाचा मोठा वाटा आहे. पण लोकांचे मनोरंजन करणारा, कलाकार घडवणारा आणि कलेचे वैभव टिकवणारा १०० वर्षाचा हा सांस्कृतिक वारसा एका रात्रीमध्ये डोळ्यांदेखत भस्मसात झाला. हि घटना घडायच्या तासभरापूर्वीच नाट्यगृह प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. पण सुदैवाने आगीच्या आधीच कार्यक्रम संपला होता. नाहीतर हि घटना किती भीषण असती याची कल्पना सुद्धा न केलेली बरी...