सुशांत पोवार (राजकीय संपादकीय) - एखाद्या चित्रपट दिग्दर्शकाला, निर्मात्याला आणि लेखकाला राजकीय सिनेमा काढू वाटावा असा मतदारसंघ म्हणजे "कोल्हापूर दक्षिण" होय.या मतदारसंघात राजकीय थरारपट आहे. राजकारणासाठी लागणारे सर्व काही आहे. दोन कुटुंबातील तेढ, जीवापाड मैत्रीचं नाते आणि नंतर पाडापाडीच्या राजकीय वैरात झालेले रुपांतर, राजकारणातील फुटील डाव, पक्षा पलीकडील व्यक्ती, आणि त्यांच्या गटाचे समीकरण....
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात राजकीय पक्षांना किंवा जातीपातीच्या राजकारणाला अर्थचं नाहीये. इथे सर्व मामला म्हणजे महाडिक विरुद्ध पाटील असाच आहे. यात पात्र बदलली मात्र गट तेच राहिले. मागच्या तीनही निवडणुकीमध्ये हे चित्र बघायला मिळाले. आता यंदा हि हेच चित्र बघायला मिळणार इतके तर नक्की आहे. तर या संपादकीयच्या माध्यमातून कोल्हापूर दक्षिणच्या राजकारणाचा उत्तरार्ध....
महाडिक विरुद्ध पाटील अशी या मतदारसंघाची ओळख आहे. २००९ मध्येच सतेज पाटील यांनी करवीर सोडून दक्षिणेमधून निवडणूक लढवायचे ठरवले आणि तेव्हा पासूनच महाडिक विरुद्ध पाटील हे समीकरण फिक्स झाले. या काळात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा अशा प्रत्येक निवडणुकीत पाटील विरुद्ध महाडिक हा वाद पाहायला मिळाला. या वादावर एक स्वतंत्र चित्रपट तयार होऊ शकतो. त्यामुळे सध्या आपण विधानसभेवरचं संपादकीयचा फोकस ठेऊया.
२००९ मध्ये सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक यांच्या राजकीय लढ्यात सतेज पाटील विजयी झाले. २०१४ मध्ये अमल महाडिक विरुद्ध सतेज पाटील यांच्यात अमल महाडिक विजयी झाले. तर २०१९ मध्ये पुन्हा ऋतुराज पाटील विरुद्ध अमल महाडिक यांच्यात ऋतुराज पाटील विजयी झाले. यानंतर या विधानसभा मतदारसंघात आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार सतेज पाटील यांनी विकासकामे, लोकसंपर्क आणि संघटन बांधणी करून या मतदारसंघावर आपली पकड पक्की केली. भाजपला अगदी येथे अस्थित्वहीन करून ठेवलं. ग्रामपंचायत निवडणुकीतहि कॉंग्रेसची सरशी झाली. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते हि अस्वस्थ झाले. पण २०२२ मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी बाजी मारली आणि कोल्हापुरात पुन्हा एकदा महाडिक यांचे वर्चस्व वाढू लागलं. अशातच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या दक्षिण मतदारसंघात पुन्हा एकदा अमल महाडिक आणि त्यांचे कार्यकर्ते सक्रीय झाले. त्यांनी शहरी भागात आणि गावोगावी असणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठ बांधली. मेळावे आणि घरोघरी संपर्क केला. कॉंग्रेसकडे असणाऱ्या या मतदारसंघातून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना मोठ मताधिक्क्य मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना केवळ सहाचं हजाराचे लीड मिळवता आले. याच तुलनेत करवीर, राधानगरी. चंदगड, आणि उत्तर विधानसभा मतदारसंघात अधिकचे मताधिक्क्य मिळाले. हि बाब कॉंग्रेस नेतृत्वाला विचार करायला लावणारी आहे तर भाजपला आशा देणारी गोष्ट आहे. त्यामुळे दक्षिण विधानसभा मतदारसंघात जरी कॉंग्रेसला मताधिक्क्य मिळाले असले तरी भाजपला हि विधानसभेची संधी मिळाल्याचे दिसून येतेय.
यंदा इथे भाजपकडून अमल महाडिक किंवा त्यांच्या पत्नी सौ.शौमिका महाडिक यांची नावे चर्चेत आहेत. तर कॉंग्रेसकडून ऋतुराज पाटील यांचे तिकीट फिक्स मानले जात आहे. सतेज पाटील यांनी जिल्ह्यात कॉंग्रेसला दिलेल्या नवसंजीवनीने हायकमांडकडून त्यांना दुखावले जाण्याची शक्यता अगदी ना के बराबरचं आहे.